पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सेवेसाठी गेल्यावर संभाजीनगर येथील अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना आलेल्या अनुभूती

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज नारळी पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यालयामध्ये सूक्ष्मातून आले आहेत’, असे वाटणे आणि त्या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू असणे

अधिवक्ता उमेश भडगांवकर

‘४.६.२०२० या दिवशी सकाळी १०.४५ वाजता मी सनातनचे संत पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सेवेसाठी गेलो होतो. पू. काका मला एका लेखाविषयी सूत्रे सांगत होते आणि मी टंकलेखन करत होतो. एक ते दीड घंट्यानंतर मला अकस्मात् ‘परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यालयामध्ये सूक्ष्मातून आले आहेत’, असे वाटले. तोपर्यंत माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होता.

२. पू. काका बसलेल्या आसंदीच्या मागे उभे राहिल्यावर अकस्मात् ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप चालू होणे

थोड्या वेळाने पू. काका त्यांच्या आसंदीवरून उठून लेख पडताळण्यासाठी माझ्या आसंदीवर येऊन बसले. मी पू. काका बसलेल्या आसंदीवर हात ठेवून त्यांच्या मागे डोळे बंद करून उभा राहिलो. त्या वेळी अकस्मात् माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप चालू झाला.

३. पू. काकांच्या आसंदीवर प.पू. गुरुदेव बसल्याचे अन् त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या असल्याचे दिसणे

डोळे बंद असतांना मला ‘प्रत्यक्ष प.पू. गुरुदेव पू. काकांच्या आसंदीवर बसलेले दिसले आणि श्रीसत्‌शक्‍ति  (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ दैवी रूपात प.पू. गुरुदेवांच्या अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूला उभ्या असलेल्या दिसल्या.’

४. त्या वेळी ‘पू. काकांकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’

– अधिवक्ता उमेश भडगांवकर, संभाजीनगर (४.६.२०२०)


सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक