श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघाचा १ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय
श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेविषयी मंदिर समितीच्या अधिकार्यांवर कारवाई केल्याचे प्रकरण
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २३ जुलै (वार्ता.) – श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेविषयी काही संघटनांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील द्वेषामुळे उलट-सुलट चर्चा चालू केली. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकार्यांनी अधिकार्यांना श्री विठ्ठलाच्या गाभार्यात प्रवेश नाकारला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून खात्री करून न घेता, तसेच वस्तूस्थितीची शहानिशा न करता ही कारवाई केली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कर्मचारी संघाने १ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेच्या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यावर गाभार्यात स्नान केल्याप्रकरणी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने जोशी, पुदलवाड यांच्यासह संबंधित कर्मचार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या गाभार्यात प्रवेश बंदीची कारवाई केली आहे.