गोवा विधानसभेच्या २७ जुलै या दिवशी होणार्या पावसाळी अधिवेशनात प्रवेशासाठी अनेक निर्बंध
मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांना मर्यादित स्वरूपात कर्मचारी न्यावे लागणार, तर नागरिकांना प्रवेशबंदी
२३ जुलै (वार्ता.) – गोवा विधानसभेचे एकदिवसीय पावसाळी अधिवेशन सोमवार, २७ जुलै या दिवशी होणार आहे. या दिवशी विधानसभेत प्रवेश करण्यासाठी विधानसभा सचिवांनी अनेक निर्बंध घातले आहेत, तसेच नागरिकांना विधानसभेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
विधानसभा सचिवांनी अधिवेशनाला अनुसरून प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासमवेत केवळ ४ वैयक्तिक कर्मचारी आणि ४ अधिकारी, मंत्र्यांना २ वैयक्तिक कर्मचारी अन् प्रत्येक आमदाराला १ वैयक्तिक कर्मचारी स्वत:समवेत विधानसभेत नेता येणार आहे. विधानसभेत कामकाजाच्या वेळी ज्या विषयावर चर्चा असेल, त्याच खात्यातील शासकीय अधिकार्यांना विधानसभेत प्रवेश दिला जाणार आहे. मास्क न घालणार्यांना प्रवेश दिला जाणार नाही, तसेच सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे कठोरतेने पालन करावे लागणार आहे.