तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा शासनाचा निर्णय
या केंद्रात सर्वांना आपापल्या कुलदेवतेचा नामजप करण्यास आणि साधना करण्यास सांगितल्यास तणावातून मुक्त होण्यास त्यांना साहाय्य होईल
पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा राज्य पायाभूत सुविधा महामंडळाची १७९ वी बैठक २३ जुलै या दिवशी झाली. यामध्ये तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या योजनेअंतर्गत हे केंद्र उभारले जाणार आहे. यामध्ये कौटुंबिक कलह, कामावरील तणाव आदींमुळे त्रस्त असलेल्या महिला आणि मुले यांना वैद्यकीय, कायदेविषयक, मानसोपचार अन् समुपदेशन आदी माध्यमांतून साहाय्य करण्यात येणार आहे.
बैठकीत यापुढे मे २०२१ पर्यंत नवीन प्रकल्प हाती न घेण्याचे निश्चित झाले. गोवा विधानसभा संकुलाला ७ कोटी रुपये खर्चून नवीन रूप देणे, बांबोळी येथील गोवा दंत महाविद्यालयाच्या इमारतीशी संबंधित सर्व कामांना संमती देणे आणि पुढील ६ मासांत ही कामे पूर्ण करणे, तसेच सांखळी, केपे आणि खांडोळा येथील शासकीय महाविद्यालयांसाठी वसतीगृह (होस्टेल) बांधणे आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.