सांगली महापालिका क्षेत्रात दळणवळण बंदीच्या पहाणीसाठी २३ पथके सिद्ध

सांगली-  २३ जुलैपासून महापालिका क्षेत्रात कडक दळणवळण बंदी चालू झाली आहे. ३० जुलैपर्यंत शहरातील बाजारपेठा, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स बंद रहाणार आहेत. कडक कार्यवाहीसाठी महापालिकेची २३ पथके सिद्ध केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे.

१. गेल्या मासापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात पुन्हा दळणवळण बंदीचा निर्णय झाला. त्यानुसार दूध वितरण, वैद्यकीय सेवा, औषधे, अधिकोष, सरकारी कार्यालये वगळता सर्व व्यवहार ३० जुलैपर्यंत बंद रहाणार आहेत.
२. प्रभागनिहाय २० समन्वयक अधिकारी नेमले आहेत. या सर्व प्रभागांचे नियंत्रण साहाय्यक आयुक्त आणि यंत्रणेवर देखरेख उपायुक्त करणार आहेत.
३. दुकाने चालू ठेवल्यास ती बंद करून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. शहरात बाहेरून येणार्‍यांना पूर्ण बंदी आहे.