कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू
३ रुग्णालयांनी भरती करून घेण्यास दिला होता नकार
एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते ! या रुग्णालयांवर कर्नाटक सरकारने कारवाई करून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच अन्य रुग्णालयांवर वचक बसेल !
बेंगळुरू (कर्नाटक) – कोरोनाबाधितांवर उपचार करतांना त्याची लागण झालेले येथील डॉक्टर मंजुनाथ एस्.टी. यांचा मृत्यू झाला. डॉ. मंजुनाथ यांना कोरोनाची लागण झाल्यावर ३ रुग्णालयांनी त्यांना केवळ कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने उपचारार्थ भरती करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना रस्त्यावर बसावे लागले होते. नंतर त्यांना एका रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. कनकपुरा तालुक्यातील चिक्कमुडावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते कोरोनाबाधितांच्या उपचारार्थ कामावर असतांना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
१. डॉ. मंजुनाथ यांची प्रकृती ढासळल्यावर ते ‘व्हेंटिलेटरवर’ होते. तेव्हा त्यांना ‘फिजियोथेरपिस्ट’च्या साहाय्याची आवश्यकता होती; मात्र एकही ‘फिजियोथेरपिस्ट’ ‘पीपीई किट’ घालून अतीदक्षता विभागात येण्यास सिद्ध झाला नाही.
२. डॉ. मंजुनाथ यांच्या सासर्यांचाही काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तसेच आता त्यांचीा दंतवैद्य असणारी पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.