अन्नाची नासाडी टाळा आणि पर्यावरण वाचवा !

अन्न वाया घालवणे, ही उधळपट्टी !

१. एकीकडे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सुखसमृद्धी, तर दुसरीकडे दैन्य अन् उपासमार

आजच्या जगात एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सुखसमृद्धी आहे, तसेच दुसर्‍या बाजूला दैन्य, दु:ख आणि प्रचंड उपासमारही आहे.

अ. जगभरातील अन्नाच्या नासाडीचे एकूण प्रमाण : संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते. हे प्रमाण जगातील एकूण अन्न उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे. श्रीमंत देशांमधील लोक प्रतिवर्षी सुमारे २२ कोटी टन अन्न वाया घालवतात. सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे पसरलेल्या खंडात अन्नाचे जेवढे उत्पादन होते (२३ कोटी टन), जवळजवळ तेवढेच हे प्रमाण आहे. प्रतिवर्षी होणार्‍या अन्नाच्या नासाडीचे एकूण प्रमाण हे जगात प्रतिवर्षी पिकणार्‍या (तृण) धान्यांच्या एकूण पिकाच्या (वर्ष २००९-१० मध्ये २ अब्ज ३० कोटी टन) निम्म्याहून अधिक आहे.

आ. एक बाजूला अन्न वाया जाणे आणि दुसरीकडे बालके भूक अन् कुपोषण यांमुळे मृत्यू होणे : एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते, तर दुसरीकडे जगातील एक अब्ज माणसे प्रतिदिन रात्री उपाशी पोटी झोपतात. तितक्याच लोकांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही, म्हणजेच सुमारे २ अब्ज लोकांना त्यांच्या शरीराच्या पोषणाकरता जसा चौरस समतोल आहार मिळायला हवा, जितके उष्मांक आणि प्रथिने मिळायला हवीत, तितके त्यांना मिळतच नाहीत. ज्या वयामध्ये मुलांची वाढ होत असते, त्या वयामध्ये त्यांना भरपूर आणि सकस अन्न नित्यनेमाने मिळणे आवश्यक असते; परंतु ५ वर्षांच्या आतील सुमारे १८ कोटी बालकांना ते मिळत नाही. परिणामी त्यांची वाढ खुंटते. ती लहान चणीची होतात. विकसनशील देशांकडे दृष्टी टाकली, तर त्या देशांतील ५ वर्षांच्या आतील सुमारे १५ कोटी बालके वजनाने अगदीच कमी असल्याचे दिसते. खायला पुरेसे अन्न नाही, घालायला आवश्यक कपडे नाहीत आणि रहायला नीट घर नाही. अशा स्थितीत जगावे लागण्याचा परिणाम म्हणून अकाली मृत्यू होतो. सध्या ५ वर्षांखालील २० सहस्रांहून अधिक बालके भूक आणि कुपोषण यांमुळे प्रतिदिन मरत आहेत.

२. अन्नाची होणारी नासाडी

अ. अमेरिकेत ३० टक्के अन्न प्रतिवर्षी फेकून दिले जाणे : औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर झालेल्या इंग्लंड-अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांत अन्नाची नासाडी पुष्कळ मोठ्या प्रमाणावर होते. अमेरिकेत एकूण अन्नापैकी ३० टक्के अन्न प्रतिवर्षी फेकून दिले जाते. याचे मूल्य ४८ अब्ज ३ कोटी अमेरिकी डॉलर म्हणजे २ सहस्र ६०८ अब्ज रुपये (म्हणजे आताचे ३ सहस्र ६४६ अब्ज रुपये) इतके होते. हे अन्न बनवण्यासाठी लागणारे निम्मे पाणीही अक्षरशः फुकट जाते; कारण पाण्याचा सर्वाधिक वापर शेतीसाठीच होतो. अमेरिकेतील एकूण कचर्‍यापैकी दुसर्‍या क्रमांकाचा कचरा हा फेकून दिलेल्या अन्नाचा असतो.

आ. इंग्लंडमध्ये ६१ टक्के अन्न योग्य व्यवस्थापनाअभावी वाया जाणे : इंग्लंडमधील घरगुती अन्नवापरापैकी सुमारे ६७ लाख टन अन्न प्रतिवर्षी फुकट जाते. हे प्रमाण एकूण खरेदी केल्या जाणार्‍या अन्नाच्या (२ कोटी १७ लाख टन) सुमारे एक तृतीयांश इतके आहे, म्हणजेच विकत घेतलेल्या अन्नपदार्थांपैकी सुमारे ३२ टक्के अन्न खाल्लेच जात नाही; पण याविषयी झालेल्या जाणीव-जागृतीचा परिणाम म्हणून या अन्नापैकी ५९ लाख टन म्हणजे ८८ टक्के अन्न गोळा करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे असे लक्षात आले की, सुमारे ६१ टक्के अन्न हे योग्य व्यवस्थापनाअभावी वाया जाते.

इ. प्रगत देशांमध्ये अन्नाविषयी ‘वापरा, नाहीतर फेका’ अशी भूमिका असणे : इतरही प्रगत देशांमधील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. महत्त्वाचे म्हणजे या देशांमध्ये होणारी अन्नाची नासाडी ही अन्न खाणार्‍यांकडूनच होते. ‘वापरा आणि फेका’ (यूज अँड थ्रो) हेच जगण्याचे तत्त्व असलेल्या या देशांमध्ये अन्नाविषयी ‘वापरा, नाहीतर फेका’ अशीच भूमिका असते. त्यांना ना अन्नासाठी केलेल्या व्ययाची तमा असते, ना त्यामागे असणाच्या श्रमांची जाणीव, ना पर्यावरणाची चिंता, ना नको असलेल्या अन्नाचा योग्य विनियोग करण्याचा विवेक !

ई. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये अन्न वाया जाण्याची कारणे : गरीब आणि विकसनशील देशांमध्ये अन्न या प्रकारे वाया जाऊ शकत नाही; कारण बहुधा खाण्याच्या तोंडांच्या प्रमाणात पुरेसे अन्नच उपलब्ध नसते. इथे अन्न वाया जाते, ते अपुरा पैसा, व्यवस्थापनातील त्रुटी आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादा या कारणांमुळे ! आधीच्या टप्प्यात पिके घेण्याच्या पद्धती, त्यांची साठवण आणि टिकवण्याच्या सोयींमधील कमतरता यांमुळे अन्न वाया जाते. शेतकर्‍यांचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अन्न साठवणे-टिकवणे यांमध्ये आर्थिक गुंतवणूक याद्वारे पुरवठा साखळी मजबूत करणे, हे या देशांतील अन्न वाचवण्याचे मार्ग आहेत.

३. पर्यावरणावर होणारा परिणाम

अ. अन्न वाया जाण्यामध्ये अन्य संसाधने वाया घालवणे : अन्न वाया जाण्यामुळे होणारे परिणाम केवळ आर्थिक नाहीत. पिके आणि इतर खाद्यपदार्थ बनवतांना पाणी, भूमी, ऊर्जा, श्रम आणि भांडवल ही संसाधने वापरली जातात. अन्न वाया जाणे, म्हणजे अन्न उत्पादनाच्या क्रियेत वापरली गेलेली वरील संसाधने वाया घालवणे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास १ लिटर दूध सिद्ध होण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे १ सहस्र लिटर पाणी वापरले जाते. आज दुधापासून बनलेले लोणी, पनीर, चीज यांसारख्या चरबीयुक्त पदार्थांची रेलचेल आहे. यांपैकी काहीही वाया गेले, तर त्याचा परिणाम किती प्रचंड होतो, हे लक्षात येईल. तसेच असे पदार्थ अतिरेकी खाणे आणि नंतर कोलेस्टेरॉलच्या किंवा लठ्ठपणाच्या भीतीने व्यायाम करून वाढलेले वजन न्यून करणे, हाही खाल्लेले अन्न वाया घालवण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.

आ. जगभरात होणार्‍या अन्नाच्या उत्पादनासाठी २५ टक्के मानवी वस्तीला योग्य अशी भूमी आणि ७० टक्के ताजे पाणी वापरले जाते. जगभर होणार्‍या जंगलतोडीपैकी ८० टक्के जंगलतोड ही अन्न उत्पादनासाठी होते. हरितगृह (ग्रीन हाऊस) वायूंपैकी ३० टक्के वायू निवळ अन्न उत्पादनाच्या प्रक्रियेतून बाहेर पडतात. आज जैविक विविधता मोठ्या प्रमाणावर न्यून होण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे अन्न उत्पादनासाठी होणारा भूमीचा वापर.

इ. अन्न वाया घालवणे, म्हणजे महत्त्वाच्या संसाधनांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी ! : अन्नाच्या उत्पादन प्रक्रियेत खते आणि किटकनाशकांसारखी वापरली जाणारी रसायने बनवतांना काही प्रमाणात तरी हवा, पाणी, भूमी, ध्वनी यांचे प्रदूषण होतच असते. अन्नावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांतही ते होण्याची शक्यता असते. शेती-बागायतीसाठी लागणार्‍या बियाणांपासून ते पिकांच्या किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी इंधनाचा वापर होत असतो. ही इंधने सिद्ध करण्याची प्रकिया आणि वाहनांमध्ये ती वापरणे यांतूनही प्रदूषण होतेच. या सर्व कामांमध्ये मानवी श्रम आणि पैसा यांची गुंतवणूकही प्रचंड असते. त्यामुळे अन्न वाया घालवणे, म्हणजे या महत्त्वाच्या संसाधनांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी आणि पर्यावरणाचा नाश !

ई. शिवाय टाकून दिलेल्या अन्नावर कुणी प्रक्रिया करायला जात नाही. परिणामी ते सडते. अन्न सडण्याच्या क्रियेतून मिथेन हा वायू सिद्ध होतो. मिथेन हा हरितगृह वायूंपैकी एक महत्त्वाचा वायू आहे. हरितगृह परिणाम घडवून आणणार्‍या कार्बन डायऑक्साईडपेक्षा तो २३ पटीने घातक आहे. त्यामुळे अर्थातच वातावरणाचे तापमान वाढते, म्हणजेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला हातभार लागतो आणि हवामानात विपरीत पालट घडून येतात.

४. लोकांचा सहभाग

अ. पृथ्वीवरची एकेकाळी अक्षय्य मानली गेलेली संसाधने नष्ट होण्याच्या मार्गावर : वाढत्या लोकसंख्येच्या आवश्यकता भागवण्याच्या परिस्थितीत नैसर्गिक संसाधनांचा हावरटासारखा फडशा पाडला जात आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधने पूर्वीसारखी विपुल प्रमाणात राहिलेली नाहीत. पृथ्वीवरची एकेकाळी अक्षय्य मानली गेलेली पाणी, लाकूड किंवा मासे ही संसाधनेही आता वेगाने नष्ट होत चालली आहेत. आपण आता अशा टप्प्यावर येऊन पोचलो आहोत की, हवा आणि पाणी यांचा दर्जा सुधारणे, उत्पादनाची पातळी संतुलित करणे आणि कचरा न्यून करणे, यांवाचून पर्यायच राहिलेला नाही.

आ. प्रदूषण आणि संसाधनांचा अतिरेकी वापर : प्रदूषण आणि संसाधनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतातच, तसेच जैविक विविधतेच्या र्‍हासालाही हातभार लागतो.

औद्योगिकरण होण्यापूर्वीच्या काळाच्या तुलनेत १०० पटींनी पक्षी, सस्तन आणि उभयचर प्राणी नामशेष होत आहेत, असा अंदाज सांगितला जातो. अशा पालटांचे परिणाम गरीब लोकांना सर्वाधिक भोगावे लागतात; कारण ते त्यांच्या उपजीविकेसाठी थेटपणे मासे, शेती आणि जंगले या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. तेव्हा मनुष्याची सध्याची वाटचाल ही मानवजातीसाठी आणि एकंदरच पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आत्मघातकी आहे. पुढील पिढ्यांना नैसर्गिक संसाधनांचा त्यांचा आणि न्याय्य वाटा मिळावा, यासाठी अधिक शाश्‍वत जीवनशैलीकडे आपले संक्रमण व्हायला हवे.

इ. अन्न वाया जाणे, याचे पर्यावरणावर आणि पर्यायाने मानवी विकासावर होणारे परिणाम गंभीर आहेत. यावरील सोपा उपाय म्हणजे अन्न वाचवणे आणि कोणते अन्नधान्य खायचे, याचा निर्णय जागरूकपणे घेणे.

ई. अन्न वाचवण्याचा प्रारंभ अर्थातच स्वत:पासून करणे आवश्यक ! : अन्न वाचवण्याचा प्रारंभ अर्थातच स्वत:च्या घरापासून करायचा. इतरांनाही याविषयी सांगायला हवे. सर्वांनीच स्वत:च्या व्यवहारात सुधारणा केली, तर त्याचा एकत्रित परिणाम मोठा होतोच. अन्नाची नासाडी थांबली, तर पैसाही वाचेल. पर्यावरणावर होणारे वाईट परिणाम न्यून होण्यासह अन्न उत्पादनाची प्रक्रियाही अधिक कार्यक्षम होतील.

उ. सेंद्रिय शेतीचा पुरस्कार : अन्नाविषयी जागरूकपणे निर्णय घेणे म्हणजे पर्यावरणावर न्यूनतम परिणाम होईल, असे पदार्थ अन्न म्हणून आवर्जून निवडणे. उदाहरणार्थ, ज्याच्या उत्पादन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची रसायने वापरली जात नाहीत, असे अन्न खाणे. म्हणूनच सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला पाहिजे. तसेच भाजीपाला घेतांना शक्यतो आसपासच्या भागात पिकणाराच घ्यावा. तसेच तयार खाद्यपदार्थांविषयीही हे धोरण अवलंबायला हवे; कारण लांबच्या प्रदेशातून येणारा भाजीपाला किंवा तयार खाद्यपदार्थ वापरणे यांत वाहतूक येते आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते.

तेव्हा (खाण्यापूर्वी) विचार करा, (आवश्यक तेवढेच) खा, अन्न आणि पर्यायाने पर्यावरण वाचवा !

(संदर्भ : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, जून २०१३)

हिंदु धर्मात ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटले आहे. त्यामुळेच हिंदु धर्मीय अन्न ग्रहण करण्यापूर्वी श्री अन्नपूर्णादेवी यांना प्रार्थना करून ते तिचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात आणि अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही, यासाठी प्रयत्नरत असतात. असे जरी असले, तरी भारतात अर्ध्याहून अधिक जनता एकभुक्त रहात आहे आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी भारतियांना धर्मशिक्षण द्यायला हवे ! – संपादक