‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘स्मार्टफोन’ न मिळाल्याने नैराश्यातून एकोशी (गोवा) येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या
- अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !
- सध्याची शिक्षणपद्धत विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीला कसे सामोरे जावे, याचे शिक्षण देऊ शकत नाही, हेही यातून स्पष्ट होते !
- पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीत केवळ पुस्तकी शिक्षण न देता ‘जीवन कसे जगायचे ?’ याचे परिपूर्ण शिक्षण दिले जात असे. आताच्या शिक्षणात अशा प्रकारचा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे !
म्हापसा, ९ जुलै (वार्ता.) – ‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी भ्रमणभाष (स्मार्टफोन) न मिळाल्याने नैराश्यातून दहावी इयत्तेत शिकणार्या एकोशी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
मूळचे झारखंड येथील कुटुंब गेली १५ ते २० वर्षे एकोशी येथे रहात होते. त्यांचा मुलगा पोंबुर्फा येथील एका विद्यालयात शिकत होता. त्याला २ भाऊ असून ते पोंबुर्फा येथील इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकतात. या मुलांचे पालक रोजंदारीवर काम करतात आणि घरची परिस्थिती गरिबीची आहे. कोरोना महामारीमुळे सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. शाळा कधी चालू होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना भ्रमणभाषची (स्मार्टफोनची) आवश्यकता आहे. घरातील गरीब परिस्थितीमुळे मयत विद्यार्थ्याला पालकांकडून भ्रमणभाष मिळू शकला नाही. त्यामुळे शाळेतून मिळणार्या ‘ऑनलाईन’ शिक्षणापासून तो वंचित राहू लागला. यामुळे तो चिंतेत होता. यामुळे नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती पर्वरी पोलिसांना मिळाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता मोरजकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना धक्का बसला. हा मयत विद्यार्थी शांत स्वभावाचा होता आणि अभ्यासात हुशार होता. त्याच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने वास्तविक ‘ऑनलाईन’ शिक्षण सक्तीचे केलेले नाही. सधन पालक पाल्याला शिक्षणासाठी भ्रमणभाष घेऊन देण्याची इच्छा पूर्ण करू शकतात; मात्र आर्थिक कमकुवत घटकांना हे शक्य होत नाही. विद्यार्थी एकमेकांचे मित्र असतात आणि ‘दुसर्याला भ्रमणभाष मिळाला आणि मला नाही’, अशा विचाराने मुले अस्वस्थ होतात. ही परिस्थिती ओढवू नये, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हा ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा बळी ! – विजय सरदेसाई, ‘गोवा फॉरवर्ड’
एकोशी येथील विद्यार्थ्याने ‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी भ्रमणभाष न मिळाल्याने केलेली आत्महत्या म्हणजे ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा बळी आहे. शिक्षण क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाकडे क्षमता नाही, अशी टीका ‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई यांनी केली आहे.