पोलिसांना ठार केल्यावर त्यांचे मृतदेह जाळणार होतो ! – विकास दुबे याची स्वीकृती

  • चौबेपूर (उत्तरप्रदेश) येथील ८ पोलिसांच्या हत्याकांडाचे प्रकरण

  • पोलीस धाड घालणार असल्याची माहिती पोलिसांकडूनच मिळाली होती !

विकास दुबे

उज्जैन (मध्यप्रदेश) – पोलीस धाड घालण्यासाठी येणार आहेत, याची माहिती पोलिसांकडून मला मिळाली होती. ते सकाळी येणार अशी माहिती होती; मात्र पोलीस रात्रीच पोचले. आम्ही जेवणही केले नव्हते. ‘पोलीस चकमकीत ठार मारतील’ या भीतीने त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह जाळण्याचाही आमचा प्रयत्न होता. ५ पोलिसांच्या मृतदेहांना एकावर एक ठेवून त्यांना जाळणार होतो. त्यासाठी आमच्याकडे तेलही उपलब्ध होते; मात्र आग लावण्यासाठी वेळ न मिळाल्याने आम्हाला पलायन करावे लागले. मी माझ्या साथीदारांना स्वतंत्रपणे पळण्यास सांगितले होते, अशी स्वीकृती विकास दुबे यांनी उज्जैन पोलिसांच्या चौकशीत दिली.

दुबे याने पुढे सांगितले की, ‘केवळ चौबेपूर पोलीस ठाणेच नाही, तर जवळच्या सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस मला साहाय्य करत होते. दळणवळण बंदीच्या काळात चौबेपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांची मी चांगल्या प्रकारे काळजी घेतली होती. त्यांना खाण्यापिण्यासाठी आणि अन्यही साहाय्य केले होते.’