येणार्या काळात एन्.जी.ओ.ना मोठ्या संधी असणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
एन्.जी.ओ. फेडरेशनच्या वतीने ऑनलाईन संवाद
पुणे – केंद्रशासनाने घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामध्ये एन्.जी.ओ.ना (स्वयंसेवी संस्था) मोठ्या संधी असणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. आयात प्रतिस्थापन औद्योगिकरण (Import Substitution) यावर अधिक भर असणार आहेे. महाराष्ट्र्रात आजपर्यंत ५ सहस्र कोटी रुपयांचे वाटप झाले आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते महा एन्.जी.ओ. फेेडरेशन, पुणे यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत अभियान ही संकल्पना म्हणजे नेमके काय या विषयावरील आयोजित संवादामध्ये बोलत होते. फेडरेशनचे संस्थापक श्री. शेखर मुंदडा यांनी श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑनलाईन संवाद केला. या वेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सद्यकाळात फेडरेशनने केलेल्या कामाचे अभिनंदन केले.
श्री. शेखर मुंदडा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेेडरेशनने नुकत्याच केलेल्या १८ सहस्र किटचे वाटप, अन्नदान आणि रक्तदान उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच फेेडरेशनच्या वतीने ग्रामीण भागात १ लाख लोकांना रोजगार हमी देणार असल्याची माहिती सांगितली. एन्.जी.ओ.चे श्री. विजय वरुडकर यांनी आभार प्रदर्शन केले.
महा एन्.जी.ओ. फेेडरेशन ही शिखर संस्था असून त्याला सध्या १ सहस्र ५०० छोट्या मोठ्या एन्.जी.ओ. जोडल्या आहेत. या कार्यक्रमाला यापैकी ४०० एन्.जी.ओ.ची उपस्थिती होती.