इस्रायल आणि भारत यांतील भेद

१. भारतियांना राष्ट्रीय स्वार्थ न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय राजकारणी

‘पॅन इस्लाम’चा धोका ज्या देशांना सर्वांत अधिक आहे, असे २ देश म्हणजे इस्रायल आणि भारत. मुंबईपेक्षा छोटा इस्रायल देश चारही बाजूंनी इस्लामी देशांनी घेरलेला आहे. भारताच्याही दोन बाजूंना इस्लामी देश आहेत. खाली बौद्ध श्रीलंका आणि वर साम्यवादी चीन आहे. दोन्ही देशांत लोकशाही नांदते. दोन्ही देशांचे रहिवासी मोठ्या संख्येने अमेरिकेत वस्ती करून रहातात आणि ते संपन्न आहेत. भारतात गुलामीमुळे लोकांना त्यांचा स्वार्थ वा हित कळत नाही.‘देशाचा स्वार्थ आधी मग स्वत:चा स्वार्थ’, असे जगात सर्वत्र धोरण दिसते. ते पद्धतशीरपणे जोपासले गेले आहे. आपल्याकडे मात्र कोणत्याही नेत्यास लोकांना राष्ट्रीय स्वार्थ शिकवण्यास अजून वेळच मिळाला नाही.

२. लोकप्रतिनिधींची वैचारिक मानसिकता

समाजवादी आणि साम्यवादी यांच्या मनामध्ये भीती आहे की, भाजप राष्ट्रवादी असल्यामुळे तो आपल्या पक्षास खाऊन टाकेल. आपल्या अस्तित्वालाच धोका आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ हीच मुळी मोदी यांची घोषणा असल्यामुळे ते लोक भाजपला पाण्यात पहातात. या सार्‍या गुलामी मानसिकतेमुळे मोरारजी आणि वाजपेयी यांच्याप्रमाणेच मोदी यांना जेमतेम एखादी टर्मच (ठराविक कालावधी) राज्य करायला मिळणार कि काय ? अशी सतत धास्ती वाटत होती. याउलट इस्रायलची स्थिती आहे. भारताची ‘संसद’, अमेरिकेत ‘सिनेट’ तशी इस्रायलमध्ये ‘नेसेट’ आहे. तेथे झालेल्या निवडणुकीत तेथील राष्ट्रवादी भाजप म्हणजे ‘लिकुड पक्ष’ निवडून आला. त्यांचे मोदी म्हणजे बेंजामिन नेतान्याहू चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. भारताप्रमाणे तेथेही आघाडीचे राजकारण आहे. युतीविना गती नाही. तेथेही काँग्रेसप्रमाणे मवाळ पक्ष आहे आणि तो तोडातोडी करून इतरांशी तडजोड करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत असतो. तेथील लिकुड पक्ष हा राष्ट्रवादी आणि आक्रमक पक्ष आहे. हिंसा त्यांना वर्ज्य नाही. हिब्रू भाषेत लिकुड या शब्दाचा अर्थ ‘जिद्दी’ किंवा ‘दृढ’ असे आहे. या पक्षामुळे इस्रायलची ओळख जिद्दी देश म्हणूनच आहे. ‘आपण आक्रमक राहिलो नाही, तर ही मुसलमान राष्ट्रे आपल्याला खाऊन टाकतील’, असे या पक्षाचे म्हणणे आहे. आपण हिंदू भारतात गेली सहस्रो वर्षे टिकून आहोत, हे आपले सुदैव आहे.

३. शत्रूराष्ट्राला साहाय्य करतो; म्हणून अमेरिकेला खडसावणारा बाणेदार इस्रायल

२ सहस्र ५०० वर्षांनंतर इस्रायललाही राष्ट्र म्हणून एकत्र येण्याची संधी मिळाली आणि ती त्याला स्वत:च्या हातातून घालवायची नव्हती. अमेरिकेतील ज्यू लॉबी (कायदेमंडळातील सदस्यांवर दबाव आणू पहाणार्‍यांचा गट) सक्षम आणि संपन्न आहे. तेलाचे उत्खनन करणारे क्षेत्र (ऑईल ड्रिलींग सेक्टर), वित्त (बँकींग आणि फायनान्स), तसेच साखळी पद्धतीतील किरकोळ व्यवसाय (रिटेल चेन बिझनेस) सर्व ज्यूंच्या हातात आहे. या गटाचे इस्रायलवर सतत लक्ष असते. एकदा नेतान्याहू अमेरिकेत गेले, तेव्हा त्यांनी ‘अमेरिका अणूबॉम्ब निर्माण करू पहाणार्‍या इराणला साहाय्य करत आहे’, या सूत्रावरुन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना खडसावले.

अमेरिकन भूमीवर येऊन अमेरिकन अध्यक्षास धमकी द्यायला स्वत:त ‘दम’ असावा लागतो आणि तो या चिमुकल्या देशाच्या पंतप्रधानात पुष्कळ आहे. ‘इराणजवळ अणुबॉम्ब आला, तर तो केव्हाही इस्रायलला जगाच्या नकाशावरून नष्ट करू शकेल’, असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवण्यामागे त्या नेत्यास त्याच्या जनतेचा पूर्ण पाठिंबा असावा लागतो.

४. राष्ट्ररक्षणार्थ सदैव सज्ज असलेले इस्रायलमधील तरुण

आपण अजूनही आपले ‘राष्ट्रीय धोरण’ कोणते ?, ते ठरवलेले नाही. त्यामुळे गोहत्येचा प्रश्‍न येताच काँग्रेसमधील नेते धर्मांधांची बाजू घेऊन भांडतात. या दुर्दैवाला काय म्हणायचे ? याउलट ६ दिवसांच्या लढाईत जिंकलेल्या ‘वेस्ट बॅक’च्या भूभागावर भलेही यूनोने ‘येथे अरबांना वसवा’, असे सांगितले, तरी इस्त्रायलने तो भूभाग पचवून टाकला आहे. अरब तेथे सतत आक्रमणे करतात; पण इस्रायलच्या सैन्यासमोर त्यांची डाळ काही केल्या शिजत नाही. वेस्ट बॅक येथील गरीब ज्यू मुले-मुली येथून गायब झाली होती. या विभागात पॅलेस्टिनी आणि ज्यू यांच्यात रॉकेट युद्ध खेळले जात होते. हेब्रम विभागात अरब आणि ज्यू यांची संमिश्र वस्ती आहे. इस्रायलमधील प्रत्येक तरुण-तरुणी सैनिकीदृष्ट्या प्रशिक्षित आहे. जरा संकटाची चाहूल लागली, तर हे तरुण सज्ज होऊन मायभूमीच्या संरक्षणार्थ पुढे येतात आणि गाझापट्टीत घुसून शत्रूला ठोकून बाहेर काढतात.

– दादुमिया (संदर्भ : ‘धर्मभास्कर’, एप्रिल २०१५)