वन्यजिवांचे रक्षण आणि संवर्धन
१. वन्यप्राणी वनांचे आणि वने प्राण्यांचे रक्षण करतात !
१ अ. महाभारतातील विराटपर्वानुसार : वाघासारखे वन्य प्राणी वनांचे रक्षण करतात आणि वने या प्राण्यांचे रक्षण करतात. वाघांविना वने कधीही वाढू शकत नाहीत आणि वाघांसारखे वन्य प्राणी हे वनांविना जगू शकत नाहीत.
सद्यःस्थिती : वर्ष १९०० मध्ये भारतात वाघांची संख्या ४० सहस्र होती आणि ४२ टक्के भूमी वनाच्छादित होती. आज हे वनक्षेत्र केवळ २० टक्के इतकेच शेष राहिले आहे. त्यामुळे वाघांची संख्या न्यून होऊन १ सहस्र ८०० पेक्षाही अल्प झाली आहे. गोरे इंग्रज येथे बंदुका घेऊन आले आणि त्यांनी सहस्रो वाघांना मारले. त्यांनी येथील वनांचाही नाश केला. आता आपल्याला वने विकसित करण्याची आणि वाघांंची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहेे.
२. हिंदु धर्म आणि अध्यात्म यांमध्ये वने, वृक्ष अन् वन्य प्राणी हेसुद्धा श्रद्धेचे विषय अन् आदरणीय आहेत !
वन्यजीवन हे आमच्या संस्कृतीचे साररूप आहे आणि त्याचप्रमाणे वन्य प्राणी हे आपल्या देवतांचे वाहन आहेत. त्यामुळे वने आणि वन्य प्राणी ही आमची श्रद्धास्थाने आहेत.
अ. वायुदेवतेचे वाहन : सहस्रो अश्व आणि सिंह
आ. वरुणदेवाचे वाहन : हंस आणि मकर
इ. पार्वतीदेवीचे वाहन (दुर्गा किंवा चंडी यांचे वाहन) : सिंह
ई. राहूचे वाहन : काळा सिंह
उ. केतूचे वाहन : गिधाड
ऊ. नृत्तीचे वाहन : गाढव, सिंह आणि मनुष्य
ए. गंगेचे वाहन : मकर
३. हिंदु धर्मातील सण-उत्सव, प्रथा, परंपरा यांना पर्यावरणविरोधी म्हणणारे, हे लक्षात घेतील का ?
वन्य जिवांना दिव्य आणि श्रद्धास्थाने मानण्यासाठी याहून अधिक चांगली परंपरा सांगितलेली नाही. ऋग्वेद, यजुर्वेद आणि चरकसंहिता यांमध्येही वृक्षांना वंदनीय मानले गेले आहे. चरकसंहितेत असे म्हटले आहे की, वृक्षतोड करू नका; कारण ते प्रदूषणाचे निवारण करतात. वृक्षाचा नाश हा एखाद्या राज्याचा विनाश करण्यासारखे आहे आणि वने वाढवणे, विकसित करणे हे जनकल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना करण्यासमान आहे. वन्यजिवांचे रक्षण करणे, हे पुण्यकार्य आहे.
४. ‘निसर्गासाठी जिवावर उदार झालेला एक तरी समाज हिंदु धर्माच्या व्यतिरिक्त अन्य पंथांत आहे का ?’, याचा विचार करा !
अ. वृक्ष आणि वन्यजीव यांची पूजा-उपासना यांसाठी बिश्नोई समाजाने दिलेल्या बलीदानाची सत्यघटना
राजस्थानातील बिश्नोई नावाचा एक लहानसा समाज आहे. जो ‘पर्यावरणाचे रक्षण’, हे स्वत:चे धार्मिक कर्तव्य समजतो. बिश्नोई संप्रदाय ही हिंदु धर्माचीच एक शाखा आहे. या संप्रदायाची स्थापना १५ व्या शतकात गुरु महाराज जंभेश्वर यांनी केली. त्यांचे असे मत होते की, जर वृक्ष सुरक्षित राहिले, तरच वन्यजीव सुरक्षित रहातील आणि त्यामुळेच समाज समृद्ध होईल. यासाठी त्यांनी स्वत:च्या समाजाच्या लोकांसाठी २९ आज्ञा सांगितल्या. या आज्ञांमध्ये कोणत्याही प्रकारचा हिरवा वृक्ष कधीही न तोडण्याच्या आणि कोणत्याही पशू-पक्षाची हत्या न करण्याच्या आज्ञांचा समावेश आहे.
आ. पर्यावरणाचे रक्षण करणार्यांसाठी प्रेरणास्रोत बनलेले खेजडी हत्याकांड !
जोधपूर येथील अमृतादेवी नावाची एक बिश्नोई महिला तिच्या ३ मुलींसह रहात असे. वर्ष १७३० मध्ये जोधपूर येथील महाराजांच्या आज्ञेने वृक्ष तोडणारे काहीजण खेजडी येथील वनातील वृक्ष तोडण्यासाठी येणार असल्याचे तिला समजले. महाराज त्यांच्या नव्या महालासाठी या वृक्षांच्या लाकडाचा वापर करणार होते. अमृतादेवीने तेथे जाऊन वृक्षतोड करण्यार्यांना अडवले. तेव्हा महाराजांच्या कार्यात अडथळा आणल्याच्या कारणावरून वृक्षतोड करणार्या माणसांनी अमृतादेवीसह तिच्या मुलींना ठार मारले.
ही बातमी पूर्ण बिश्नोई समाजात वार्यासारखी पसरली. तेव्हा या समाजाचे शेकडो लोक तेथे एकत्र आले. सर्वजण वृक्षांच्या रक्षणासाठी स्वत:चे प्राण देण्यासही सिद्ध होते. तेथे त्यांचा महाराजांच्या सेवकांशी संघर्ष झाला आणि त्यामध्ये या ३६३ लोकांनी स्वत:च्या प्राणांचे बलीदान दिले. ही घटना ‘खेजडी हत्याकांड’ या नावाने ओळखली जाते. महाराजांनी या क्रूर कृत्यासाठी क्षमायाचना केली. तेव्हापासून पर्यावरणाचे रक्षण करणार्यांसाठी हे हत्याकांड प्रेरणास्रोत बनले.
बिश्नोई समाजाला ‘निसर्गाचे रक्षक’ म्हणून व्यापक मान्यता आहे. जगात पर्यावरणाच्या रक्षणासाठी दिल्या गेलेल्या बलीदानांमध्ये, हे बलीदान अविस्मरणीय आहे.
लोक नदीला माता, भूमीला धरतीमाता, गायीला गोमाता आणि वृक्षाला कल्पवृक्ष मानतात. आपल्या परंपरांमध्ये पंचायतन, पंचवटी, स्मृतीवन इत्यादी संकल्पना आहेत. या सर्व संकल्पनांना आता पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे.
– सुरेशभैय्या जोशी, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
(संदर्भ : अज्ञात)