सौ. रंजना गडेकर यांना त्यांची आत्या सौ. रोशनी बुडगे यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे
१. जीवनात पुष्कळ त्रास भोगलेल्या आत्याला पंढरपूरला जाण्याची ओढ असणे आणि तिच्याकडून अधूनमधून विठ्ठलाचे स्मरण होणे
‘माझी आत्या (सौ. रोशनी (ललिता) बुडगे (वय ५९ वर्षे) (ओटवणे, सावंतवाडी) हिचे ७.१२.२०१९ या दिवशी निधन झाले. माझ्या आत्याने जीवनात पुष्कळ त्रास भोगला आहे. ३५ वर्षांपासून तिला मानसिक त्रास होता. तिचा हा जन्म जणू त्रासदायक प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठीच झाला होता. तिचे जीवन त्रासदायक आणि दुःखद प्रसंगांनी भरलेले आहे. तिला पुष्कळ यातना होत होत्या, तरी तिची देवावर श्रद्धा होती. तिच्याकडून अधूनमधून विठ्ठलाचे स्मरण होत होते, हे तिच्या बोलण्यातून लक्षात येत असे. तिला पंढरपूरला जाण्याची ओढ होती. ती अनेकदा म्हणायची, ‘‘मला पंढरपूरला जायचे आहे.’’
२. मनोरुग्ण असूनही आत्याने सनातनच्या आश्रमासाठी अर्पण स्वरूपात फळे किंवा पैसे देणे आणि जिज्ञासेने आश्रम अन् सनातन संस्था यांविषयी जाणून घेणे
आत्या मनोरुग्ण असूनही सनातनच्या आश्रमासाठी अर्पण स्वरूपात फळे किंवा पैसे देत असे. ती रहात असलेल्या ठिकाणी आंब्यांची बाग होती. एकदा तिने एका काकूंचे साहाय्य घेऊन तेथील आंबे काढून ते आश्रमासाठी दिले. नातेवाइकांनी तिला दिलेले पैसे ती साठवायची आणि मी भेटल्यावर माझ्याजवळ सनातन संस्थेसाठी अर्पण करण्यास द्यायची. काही वर्षांपूर्वी ती गोव्यात आली असता तिने जिज्ञासेने आश्रम आणि सनातन संस्था यांविषयी जाणून घेतले. त्या वेळी माझ्या मनात विचार येत असत, ‘शहाण्या माणसालाही सनातनचे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे महत्त्व लक्षात येत नाही; परंतु ती मनोरुग्ण असूनही तिला हे लक्षात आले होते.’
३. ‘आत्या विठ्ठलभक्त असल्याने देवाने एकादशीच्या दिवशीच तिचा परलोकाचा प्रवास ठरवला’, असे काकांनी तिच्या मृत्यूविषयी सांगणे
माझे काका मला म्हणाले, ‘‘तिचे देहावसान एकादशीच्या दिवशी झाले. ती विठ्ठलभक्त असल्याने देवाने एकादशीच्या दिवशीच तिचा पुढचा परलोकाचा प्रवास ठरवला. ती जातांना तिच्या तोंडवळ्यावरील भावही चांगले आणि आनंदी होते.’’ हे ऐकल्यावर तिचा पुढील प्रवासही चांगला होत असल्याचे मला जाणवले.
४. आत्याची प्रगती होणार असल्याचे एका संतांनी सांगणे
५ वर्षांपूर्वी तिच्याविषयी एका संतांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तिचीही प्रगती होईल.’’ त्या दिवसापासून तिचा तोंडवळा पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ आनंदी दिसत होता आणि तिच्या शेवटच्या क्षणीही तशीच प्रचीती आली.
५. आत्याला मृत्यूविषयी आधीच कळले असल्याचे एका संतांनी सांगणे
आत्याचे देहावसान होण्याअगोदर आठवडाभर ती रहात असलेल्या परिसरातून बाहेर पडली नाही (एरव्ही तिला गावातील लोकांकडे किंवा शेजार्यांकडे जायची सवय होती.) ८ – ९ दिवसांपासून ती सगळ्यांना म्हणत होती, ‘‘मला काही खायला नको आहे. आता मला जगण्याची इच्छा नाही.’’ शेवटच्या दिवशी तिला माझ्या एक काकू भेटल्या. माझे वडील (आत्याचे मोठे भाऊ) रुग्णाईत असल्याविषयी तिला कळले होते. तिने काकूंनाही तिला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आणि म्हणाली, ‘‘देवा, मला घेऊन जा आणि माझ्या भावाला बरे कर.’’ त्यानंतर २ घंट्यांनी तिने प्राण सोडल्याचे त्यांना कळले. हे मी एका संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘ती जाणार आहे, हे तिला अगोदरच कळले होते.’’
६. इतरांविषयी पुष्कळ प्रेम आणि आपुलकी असल्याने आत्याने सगळ्यांची चौकशी करणे
आत्याची मानसिक स्थिती चांगली नसली, तरी तिला इतरांविषयी पुष्कळ प्रेम आणि आपुलकी होती. ज्या वेळी माझ्या वडिलांचा अपघात झाल्याचे आत्याला कळले, तेव्हापासूनच ती म्हणत होती, ‘‘देवा, तू मला घेऊन जा आणि माझ्या भावाला बरे कर.’’ ती सगळ्यांचीच चौकशी करत असे. (ती गेल्यावर तिच्या शेजारी रहाणार्या एक वृद्ध स्त्रीला वाईट वाटल्याने ती रडत होती.)
७. आत्याचे अस्तित्व रामनाथी आश्रमात जाणवणे आणि तिचा सूक्ष्मातील प्रवास चांगला होत असल्याचे लक्षात येणे
१५ आणि १६.१२.२०१९ या दिवशी मला आत्याचे अस्तित्व रामनाथी आश्रमात सूक्ष्मातून जाणवले. मला ती थोडी त्रासदायक आणि कृश दिसत होती. त्या वेळी ती मला म्हणाली, ‘तू माझ्या १२ व्या दिवसाच्या कार्याला ये.’ त्यानंतर ती मला १७.१२.२०१९ या दिवशी मी आश्रमात रहात असलेल्या खोलीत दिसली. त्या वेळी आजच्या तिच्या रूपात कालच्यापेक्षा पुष्कळ पालट जाणवत होता. काल ती पुष्कळ कृश दिसत होती, तर आज ती अंगाने भरलेली दिसली. ती निळसर साडी नेसली होती. तिने हातांत निळ्या बांगड्या घातल्या होत्या आणि ती पुष्कळ स्थिर वाटत होती. त्या वेळी ती मला म्हणाली, ‘तू आश्रमात सेवाच कर. तू माझ्या कार्याला (दिवसांना) येऊ नकोस.’
मी तिचे हे बोलणे एका संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘आता तिने इथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे.’ मला दिसलेले सूक्ष्मातील दृश्य खरे असल्याची त्यांनी निश्चिती दिली. त्यामुळे तिचा सूक्ष्मातील प्रवास चांगला होत असल्याचे मला जाणवले.
८. आत्या आश्रमाच्या सभोवतालच्या परिसरात वावरत असल्याचे सूक्ष्मातून दिसणे आणि तिच्या मानसिकतेत पालट होत असल्याचे जाणवणे
त्यानंतर एकदा मला आत्या आश्रमाच्या बाहेर कट्ट्यावर सूक्ष्मातून दिसली. तिचे वावरणे आश्रमाच्या सभोवतालच्या परिसरात होत असतांना दिसले. मी काही वेळाने आरतीला गेले. त्या वेळी ती आरतीलाही उपस्थित असल्याचे जाणवले. ती काही वेळ उभी रहायची, तर कधी खाली बसत होती. नंतर हे तिला जाणवले आणि ती पुन्हा नीट उभी राहिली. त्यामुळे तिच्या मानसिकतेत पालट होत असल्याचे मला जाणवले.
९. आत्याचे मृत्यूत्तर विधी होत असलेल्या ठिकाणचे वातावरण त्रासदायक नसणे
मी तिच्या बाराव्या दिवसाच्या विधींसाठी गेले होते. तेव्हा तेथील वातावरण त्रासदायक वाटत नव्हते.
(आम्हा सर्व कुटुंबियांसाठी देवाने दिलेला हा उपहारच आहे. मला त्रास देणार्या वाईट शक्तीला याचा त्रास होत होता. ही आनंदाची गोष्ट न आवडल्याने तिला पुष्कळ राग येत होता आणि तिचा अहंकार या चांगल्या घटनेमुळे डिवचला जात असल्याचे मला जाणवले.)
१०. तीव्र प्रारब्धभोग भोगून संपवल्यामुळे आत्याचा शेवट गोड केल्याची देवाने परात्पर गुरुदेवांच्या माध्यमातून पोचपावती देणे
परात्पर गुरु डॉक्टर साधकांची काळजी घेतच आहेत; परंतु ते साधकांच्या नातेवाइकांचीही त्यांच्या मृत्यूनंतर काळजी वहात आहेत. त्यामुळे माझ्या माहेरच्या कुटुंबियांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव आणि देवावरची श्रद्धा वाढली. एवढी वर्षे आत्याने तीव्र प्रारब्धभोग भोगून संपवले; परंतु देवाने तिचा शेवट गोड केला. तिच्यातील देवाविषयीचा भाव आणि तिच्यातील प्रेमभाव यांमुळे देवानेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून याविषयी पोचपावती दिली.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (डिसेंबर २०१९)
११. ‘देवाने आत्याची काळजी घेऊन सगळ्यांना चिंतामुक्त केले आहे’, असे वाटणे
‘आत्या गेल्यानंतर तिचा कुणालाही त्रास झाला नाही. ‘ती त्रासदायक योनीत गेली’, असे कुणालाही वाटत नाही. त्यामुळेच ती रहात असलेल्या वास्तूत जाण्यास इतरांना भीती वाटत नाही. सर्व जण तिच्याविषयी चांगलेच बोलतात. देवानेच तिची काळजी घेऊन सगळ्यांना चिंतामुक्त केले.’ – सौ. शांती नांदोडकर (वहिनी), मणेरी, दोडामार्ग. (डिसेंबर २०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक