अवैध शस्त्र व्यापार आणि आतंकवाद्यांचे शस्त्र खरेदीचे आंतरराष्ट्रीय केंद्र : पाकिस्तानातील ‘दारा आदम खेल’ !

‘कोणत्याही देशात सामान्यतः व्यापाराचे केंद्र असलेले शहर, म्हणजे विद्युतदिव्यांची रोषणाई असलेली दुकाने, मालवाहू ट्रकची ये-जा, अधिकोषांच्या (बँकांच्या) शाखांची रेलचेल असे दृश्य डोळ्यांसमोर येते; पण वीजपुरवठा जवळ जवळ नसलेले, अधिकोषांच्या शाखा नसलेले, बंदुका, पिस्तुले आदींच्या आवाजाने दुमदुमलेले आणि अमेरिकन डॉलरमध्ये सर्व व्यवहार होणारे व्यापाराचे केंद्र अजबच म्हणावे लागेल. तसे एक केंद्र पाकिस्तानमध्ये वायव्य सीमा प्रांतात पेशावरच्या दक्षिणेला २५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे शस्त्रांचाच अवैध व्यापार उघडपणे चालतो आणि मध्य-पूर्वेतील आतंकवाद्यांपासून ते उत्तर आयर्लंडमधील आतंकवाद्यांपर्यंत अनेक देशी आणि विदेशी ग्राहक शस्त्र खरेदीसाठी येतात. त्या केंद्राचे नाव आहे ‘दारा आदम खेल’ ! वाळवंटी, रेताड भूमीवर वसलेले हे टोळीवाल्यांचे खेडे कमालीचे गचाळ आहे.

हे खेडे आंतरराष्ट्रीय आतंकवाद्यांसाठी शस्त्र खरेदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या खेड्यात एकच मुख्य रस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना (दुतर्फा) शस्त्र विक्रीची दुकाने म्हणजे खोपटी आहेत.

दारा आदम खेल येथील शस्त्रांचे एक दुकान (संदर्भ : संकेतस्थळ )

१. संपूर्ण जगातील छोटी आणि विदेशी बनावटीची शस्त्रे विकत मिळण्याचे ठिकाण

शस्त्र विक्री दुकानांचे बहिरंग आकर्षक नसले, तरी आतमध्ये मात्र जगभरातील छोटी शस्त्रे खच्चून भरलेली असतात. रशियन बनावटीच्या ‘कलानकॉव’, अमेरिकन ‘एम् -१६’, इटालियन ‘बेरेट्टा’, इस्रायलच्या ‘उझी’ या बंदुका आणि पिस्तुले, तसेच चालतांना हातात धरण्याच्या काठीत दडवलेले पिस्तुल, अगदी बॉलपॉईंट पेनमध्ये (लेखणीमध्ये) दडवलेले पिस्तुल अशी चमत्कृतीजन्य शस्त्रेही तेथे सर्रास उपलब्ध असतात. त्यापैकी काही अस्सल विदेशी बनावटीची असतात, तर काही त्या शस्त्रांची देशी नक्कल असतात.

२. जगभर शेकडो गॅलन रक्त सांडणार्‍या मृत्यूच्या भीषण गुन्ह्यांचा बाजार

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेजवळील हे खेडे पूर्वी सोव्हिएत फौजांविरुद्ध लढणार्‍या अफगाण मुजाहिद गनिमांचे शस्त्र खरेदीचे आगारच होते. आता त्याला आंतरराष्ट्रीय ‘शस्त्र व्यापाराचे केंद्र’ म्हणून मान्यता मिळाली आहे. गावातील मुख्य रस्त्याच्या मागे गल्लीबोळात विदेशी शस्त्रांची उत्तम नक्कल करणारे असंख्य ‘कुटीरोद्योग’ आहेत. एखादे शस्त्र पसंत पडले की, गिर्‍हाईक दुकानाबाहेर येऊन ते वारंवार झाडून त्याची चाचणी घेतो आणि मग व्यवहार पूर्ण होतो. प्रत्येकी २-३ मिनिटांनी कोणत्या तरी दुकानाबाहेर हवेत अशा फैरी झाडल्या जात असतात. या आवाजाची सर्वांना इतकी सवय झाली आहे की, झोपलेली कुत्रीही जागी होत नाहीत. जगभर शेकडो गॅलन (१ गॅलन = ३.७९ लिटर) रक्त सांडणार्‍या मृत्यूच्या भीषण गुन्ह्यांचा तो बाजार आहे.

३. काश्मीरवर आक्रमणेे करण्यासाठी आतंकवाद्यांनी ‘दारा’मधूनच शस्त्रांची खरेदी करणे, तसेच छोट्या तोफांसह अमेरिकन बनावटीचे ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्रही तेथे विकत मिळणे

स्वतः पाकिस्तानही या बाजाराच्या तडाख्यातून सुटलेला नाही. एकट्या कराचीत ‘दारा’मधून खरेदी केलेल्या ७ सहस्र ‘एके-४७’ रायफली आतंकवाद्यांच्या हातात आहेत. पंजाब आणि सिंधमध्ये ‘रक्ताचे पाट वहावणार्‍या’ शस्त्रांचा उगम ‘दारा आदम खेल’ आहे. काश्मीरमध्ये भारतीय नागरिक आणि सुरक्षादले यांच्यावर आक्रमणेे करण्यासाठीही काश्मिरी आतंकवादी ‘दारा’मधूनच शस्त्रे खरेदी करतात. ‘कोणत्याही शस्त्राची २ ते ३ आठवड्यांत ‘कार्यक्षम’ अशी देशी नक्कल सिद्ध करू शकतो’, असा ‘दारा’तील दुकानदारांचा दावा आहे आणि तो खरा आहे. तेथील दुकानदार छोट्या शस्त्रांच्या निर्मितीतच अडकून पडलेले नाहीत. त्यांनी स्वतःचा अवैध धंदा बहुपैलू केला आहे. ते दुकानदार आता छोट्या तोफा, विमानवेधी तोफा आणि हँडग्रेनेड तर विकतातच; पण अमेरिकन बनावटीची ‘स्टिंगर’ विमानवेधी क्षेपणास्त्रेही विकतात. त्या खोपट्यांना ‘एशिया आर्म्स स्टोअर्स’ आदी भारदस्त नावेही आहेत आणि त्यांचे मालक ग्राहकांना प्रचार म्हणून ‘व्हिजिटिंग कार्ड’वजा माहितीपत्रकेही देतात.

या शस्त्र विक्रीतून प्रतिवर्षी सहस्रो निरपराध लोक प्राणास मुकतात, याची खंत त्या दुकानदारांना वाटत नाही का ? मुळीच नाही. सामान्यतः एक दुकानदार वर्षभरात सरासरी १ सहस्र बंदुका विकतो. मूळ स्वरूपातील (ओरिजिनल) ‘एके-४७’ (ज्या सोव्हिएत मृत सैनिकांकडून काढून घेतल्या होत्या) ही अनुमाने ३२० अमेरिकन डॉलरला विकली जाते. तिची ‘दारा’मध्येच सिद्ध केलेली ‘कार्यक्षम’ नक्कल केवळ ५० डॉलरला विकली जाते. खरेदी-विक्री सर्व अमेरिकन डॉलरमध्येच केली जाते. ग्राहकाकडे इतर कोणते चलन असेल, तर काळ्या बाजारात मिळेल, त्या भावाने त्याचे डॉलरमध्ये परिवर्तन करून देणारे ‘फोरेक्स डिलर्स’ म्हणजे परकीय चलनाचे व्यापारीही तेथे आहेत. ते व्यापारीही अवैध असतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

४. बंदुका आणि पिस्तुले हीच ‘दारा’च्या रहिवाशांची ‘आभूषणे’ आणि प्रत्यक्षात झोपड्यात रहाणार्‍या दारावासियांच्या गादीखाली अमेरिकन डॉलरच्या नोटांच्या थप्प्या असणे

खैबर खिंडीजवळच्या ‘दारा’ खेड्याचा इतिहास शेकडो वर्षांच्या टोळीवाल्यांच्या यादवी युद्धातील रक्ताच्या सड्याने शिंपलेला आहे. तेथे केवळ टोळीनायकांचे राज्य चालते. प्रांंतिक अथवा राष्ट्रीय सरकारच्या अस्तित्वाची तेथे नामोनिशाणीही नाही. पाकिस्तानची राज्यघटना, कायदे, न्यायव्यवस्था तेथे चालत नाही. पारंपरिक मुसलमान टोळीवाल्यांच्या पद्धतीने न्यायनिवाडा केला जातो. आश्‍चर्य म्हणजे शस्त्रांचे एवढे मोठे भांडार असूनही गावातील लोक क्वचितच मारामारी करतात; कारण प्रत्येकाजवळच शस्त्र असते आणि ‘गोळीला गोळीनेच उत्तर मिळेल’, हे स्पष्ट असते. सर्व प्रकारचे तडीपार गुंड आणि गुन्हेगार तेथे मोकळेपणाने वावरत असतात. सलवार कमीज हा खास पठाणी पोशाख केलेले गावकरी खांद्यावर २-३ बंदुका अडकवून फिरत असतात. काही ‘दादा’ दोन्ही हातांमध्ये पिस्तुले रोखूनच फिरत असतात; पण त्या वातावरणात छोटी मुले शस्त्रांचे सुटे भाग इकडून तिकडे वाहून नेत असतात. तेथील शस्त्र कारखान्यात बालमजुरी उघडपणे चालते. बंदुका, पिस्तुले हीच दाराच्या रहिवाशांची ‘आभूषणे’ होत. त्या गावात प्रतिवर्षी सरासरी १८ सहस्र बंदुका, पिस्तुले विकली जातात. यासमवेत ‘हेरॉईन’ या अमली पदार्थाची तस्करीही चालते. परिणामी ‘दारा’मधील गावकरी झोपड्यांत रहात असले, तरी त्यांच्या गादीखाली अमेरिकन डॉलरच्या नोटांच्या थप्प्या असतात.

५. ‘दारा’मधील नवीन पिढीने ‘कलेचा’ वारसा जोपासणे आणि दारावासियांनी नवीन शस्त्रांचा शोध लावणे

‘दारा’मधील दुकानदार स्वतःकडील ‘कलेचा’ वारसा आपल्या मुलांकडे प्रेमाने सोपवत असतात. या व्यतिरिक्त ते ‘शोध’ही लावत असतात. हाजी वारिस या ६० वर्षांच्या कारागिराने ‘रिव्हॉल्वर’सारखी चालणारी बंदूक सिद्ध केली आहे. या बंदुकीचा एकदा चाप ओढला की, त्यातील सहाच्या सहा गोळ्या एकामागून एक वेगाने बाहेर पडतात. त्या शोधाचे ‘पेटंट’ही (स्वामित्व हक्क) त्याच्याकडे आहे. तशा प्रकारची बंदूक बनवणार्‍याने वारिसचे नाव नळीवर बारीक कोरले पाहिजे आणि वारिसला विक्रीची एकदशांश म्हणजे १० टक्के रक्कम घरी आणून दिली पाहिजे. या ‘पेटंट’ कायद्याचा कोणी भंग केला की, गावचे लोक त्याला यमसदनालाच धाडतात.

दारामधील व्यापार्‍यांचा मंत्र आहे, ‘जेवढे सरकार अस्थिर तेवढा धंदा उत्तम !’ हे रानटी व्यापारी केंद्र उखडून टाकण्याचा पाकिस्तानचे सरकार प्रयत्नही करत नाही.’

– युद्ध पत्रकार कै. मिलिंद गाडगीळ (संदर्भ : ‘प्रज्वलंत’ मासिक, नोव्हेंबर १९९९)

(वर्ष १९९९ नंतर आता २१ वर्षांनंतर ही परिस्थिती आणखी भीषण झाली असणार, हेही तितकेच निश्‍चित ! यावरून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते, ती म्हणजे आतंकवादी आणि त्यांना अवैधरित्या मिळवता येणारी अद्ययावत शस्त्रांच्या उत्पादनाचे अन् विक्रीचे केंद्र पाकिस्तानमध्येच आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानच आतंकवाद्यांचे उगमस्थान असून भारतासह जगभरात शांतता नांदवायची असेल, तर पाकलाच नष्ट करायला हवे ! – संपादक)