संततीच्या र्‍हासाला कारणीभूत असणारी व्यसनाधीनता !

१. रानटी मनुष्याचा वासनोद्भव तीव्र संवेगाचा, तर नागर (वरच्या वर्गातील) व्यक्तीमधील निरनिराळा असणे

‘समाजातील ज्यांना आपण वरच्या (उच्च) वर्गातील अर्थात पांढरपेशे म्हणतो, त्या वर्गातील स्त्रियांमध्ये बाळंतपणाच्या तक्रारी अधिक असतात आणि खालच्या (निम्न) वर्गातील स्त्रियांत बाळंतपण अधिक सुलभ होतांना आढळते, तसेच त्याचे दुष्परिणामही अल्प जाणवतात. कामवासनेसंबंधी असा एक नियम दिसून येतो की, मनुष्य जितका अधिक रानटी, तसा त्याचा वासनोद्भव तीव्र संवेगाचा; पण अधिक नियमित असतो आणि जसा मनुष्य अधिक नागर (वरच्या वर्गातील), तसतसा त्याचा वासनोद्भव अनियमित आणि म्हणूनच निरनिराळ्या संवेगाचा असतो.

२. आजकाल बाळंतपणाविषयी काही तक्रारी प्रामुख्याने ऐकू येत असणे

आजकाल बाळंतपणाविषयी ज्या काही तक्रारी ऐकू येतात, त्यात प्रामुख्याने ‘अकाली गर्भपात होणे, पूर्ण दिवस झाले असून आणि प्रसुतीची लक्षणे सामान्य (नॉर्मल) दिसत असूनही वेणा नसणे, प्रसुती झाल्यावर वार बाहेर पडण्यास त्रास होणे, प्रसुती सुखरूप होऊनही ५ ते ७ दिवसांनंतर अकस्मात ताप येणे, शरीर दूषित (सेप्टीक) होणे आणि बाळंतपणानंतर शरिराचे सौंदर्य न्यून होणे, त्याचा जोम नाहीसा होणे’, या आहेत.

३. वर्ष १८७३ ते १८९७ या काळात जन्मलेल्या व्यक्तींच्या कुंडलींमध्ये काही व्यसनाधीनता आढळणे आणि त्याचा परिणाम संततींवर झालेला असणे

मी स्वत: मागील अनुमाने ७५ वर्षांत सहस्रो व्यक्तींच्या कुंडल्या पाहून आणि त्यांपैकी अनेक लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करून काही अनुमाने बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून माझे स्वत:चे मत असे झाले आहे की, असे र्‍हास होण्यास बाह्य कारणांइतकीच अंतःकारणेही कारणीभूत आहेत. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, शके १७९५ पासून १८१९ पर्यंतच्या काळात (वर्ष १८७३ ते १८९७) जन्मलेल्या व्यक्तींच्या बहुतेक कुंडलींमध्ये मुष्टीमैथुन, अनैसर्गिक समागम, वेश्यागमन, परदारागमन आणि मद्यपानाची आवड यांपैकी काही व्यसनाधीनता आढळून आल्या. या व्यसनांचे परिणाम प्रत्यक्ष त्यांच्यावर न होता त्यांच्या संततीवर झाले.

४. भर्तृहरीने मनुष्याच्या सुखाविषयी केलेले भाष्य

‘सुख म्हणून काही वस्तू आहे, असे नाही, कासाविस होऊन ती नाहिशी झाली, म्हणजे त्यालाच लोक ‘सुख’ असे म्हणतात,’ असे संस्कृत ग्रंथकार भर्तृहरीने मनुष्याच्या सर्वच सुखाविषयी म्हटले आहे.

प्रतीकारं व्याधे: सुखमिति विपर्यस्यति जनः ।

– भर्तृहरि (वैराग्यशतक, श्‍लोक १९)

अर्थ : व्याधीचा प्रतिकार म्हणजे सुख असा विपर्यास काही माणसे करतात.

५. लैंगिक प्रवृत्तींना अनिवारपणे खवळवून सोडण्याची पाशवी वृत्ती पशूपणाची मूर्तीमंत साक्ष असणे

एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे, ‘खरे पाहिले तर आजकाल संभोगेच्छेच्या आवश्यकतेपेक्षा लैंगिक विचारांच्या आणि चिंतनाच्याच वावटळीत जग अधिक प्रमाणात सापडलेले दिसते. लैंगिक विचारांचा मारा एकसारखा होत असतो आणि त्यामुळे हेही कळेनासे होते की, संभोगाच्या नैसर्गिक आवश्यकतेमुळे आपण जर्जर होत आहोत कि सभोवतालच्या लैंगिक वावटळीत सापडल्याने तसे होते आहे ? लैंगिक प्रवृत्तींना अनिवारपणे खवळवून सोडण्याची ही हीन पाशवी प्रवृत्तीही तिच्या पशूपणाची मूर्तीमंत साक्ष आहे !’

लेखक – कै. अप्रबुद्ध

(संदर्भ : मासिक ‘प्रज्ञालोक’, डिसेंबर २०१४)