वस्तूसंग्रहालय आणि त्याची उद्दिष्टे
१८ मे या दिवशी असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालयदिना’च्या निमित्ताने…
‘१८ मे हा जागतिक आणि ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालयदिन’ आहे. संग्रहालयांचे महत्त्व, त्यांची ओळख यांविषयी लोकजागृती व्हावी, या उद्देशाने हा दिन आयोजित केला जातो. या विषयासंबंधी ज्ञान देणारा लेखप्रपंच…
१. वस्तूंचा संग्रह, ही सहज मानवी प्रवृत्ती !
‘वस्तूंचा संग्रह करणे, तो वाढवणे आणि जपणे, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्यातही छंद किंवा आवड म्हणून जमवलेल्या वस्तूंची जपणूक करण्यात आणि त्या उत्साहाने दुसर्याला दाखवण्यात त्या माणसाला वेगळाच आनंद लाभत असतो. माणसातील या उपजत वृत्तीला स्थळ, काळ यांचे बंधन नसते. भारतीय प्राचीन वाङ्मयात आढळणारा विधी, चित्रशाला, आलेख्यगृह इत्यादींचा उल्लेख हेच दर्शवतो की, ही ठिकाणे म्हणजे राजे-धनिक यांच्या स्वामित्वाच्या (मालकीच्या) कलात्मक वस्तू, चित्रे यांचा संग्रह आणि मांडणी केलेली दालने होती.
२. स्थानिक संस्कृती आणि इतिहास यांचे जतन करण्याविषयीची जागृती होऊन शासन अथवा वैयक्तिक संस्थांच्या पुढाकाराने संग्रहालयाची झालेली स्थापना !
एखादी वैशिष्ट्यपूर्ण वस्तू पद्धतशीररीत्या जमवून त्यांचे योग्य वर्गीकरण आणि आकर्षक मांडणी करून सर्व लोकांना त्या पहाण्यासाठी उपलब्ध करून देणे, ही जी आधुनिक संग्रहालयाची कल्पना आहे, तिचा उगम अठराव्या शतकात झाला. जगातील पहिल्या राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना ब्रिटनमध्ये ख्रिस्ताब्द १७५३ मध्ये झाली. भारतात २८.११.१८१४ या दिवशी कोलकाता येथे स्थापन झालेल्या वस्तूसंग्रहालयामुळे या क्षेत्राचा परिचय झाला आणि संग्रहालय चळवळीला चालना मिळाली. स्थानिक संस्कृती आणि इतिहास यांचे जतन करण्याविषयीची जागृती जनमानसात वाढू लागल्यावर प्रत्येक राज्य, प्रांत यांमध्ये संग्रहालयाची शासन अथवा वैयक्तिक संस्थांच्या पुढाकाराने स्थापना होऊ लागली.
३. वस्तूसंग्रहालयासाठी आखलेली ध्येय-धोरणे
अ. संग्रहालय हे केवळ मनोरंजन वा करमणूक यांचे ठिकाण न रहाता ते माहिती आणि ज्ञानवर्धन यांचे परिपूर्ण केंद्र होण्यासाठी प्रयत्न चालू झाले.
आ. कुठलेही वस्तूसंग्रहालय हे केवळ वस्तू साठवण्याचे कोेठार नसून, त्याच्या स्थापनेमागे काही ध्येेय-धोरणे असतात. त्याची उद्दिष्टे आणि मूलभूत कार्ये असतात. तेथील सर्व कारभार हा विशिष्ट पद्धतीने चालतो.
इ. संग्रहालयासाठी वस्तू जमवणे, हे महत्त्वाचे कार्य होय. या वस्तू एखादी व्यक्ती / संस्थेकडून कधी दान म्हणून कधी विकत घेऊन, उसनवार घेऊन अथवा विधिवत प्राप्त करून घेतल्या जातात.
ई. संग्रहालयात येणार्या वस्तू नेहमीच सुस्थितीत असतात, असे नाही. ऐतिहासिक अथवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तू बहुतेक वेळा मोडलेल्या, तुटलेल्या, मळलेल्या, विद्रूप झालेल्या असतात. त्यांच्या जतनासाठी त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची आवश्यकता असते. अशा वस्तू संग्रहालयातील प्रयोगशाळेत स्वच्छ करून, त्यांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय पद्धतीने योग्य उपचार केला जातो.
उ. संग्रहालयात आलेल्या प्रत्येक वस्तूची पद्धतशीर नोंदणी, हे महत्त्वाचे कार्य होय. या नोंदणीत वस्तू सापडण्याचे ठिकाण, ती कोणत्या पदार्थापासून बनलेेली आहे, तिचा काळ, स्वरूप, वर्णन, उपयुक्तता, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ यांसारख्या गोष्टींचा अंतर्भाव असतो.
ऊ. संंग्रहालयातील कोणत्या वस्तूंच्या गटात नवीन आलेली वस्तू समाविष्ट करता येईल, याचा शोध घेऊन, तिचे महत्त्व ठरवून योग्य दालनात तिचे प्रदर्शन मांडले जाते.
ए. मांडणी करतांना वस्तूंचा ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या आणि दालनाच्या विशिष्ट विषयानुरूप अग्रक्रम ठरवणे महत्त्वाचे असते.
ऐ. मांडणी कलात्मक, आकर्षक, आशयसंपन्न आणि एकूणच प्रभावी कशी बनेल, याकडेही लक्ष द्यावे लागते.
ओ. वस्तूंसाठीच्या बैठका, काचेच्या पेट्या, कपाटे, रंग-संगती, प्रकाशयोजना अशा अनेक गोष्टींचे विचारपूर्वक आयोजन करावे लागते.
औ. संपूर्ण दालनातील प्रदर्शित वस्तूंजवळ थोडक्यात माहिती देणारी खूणचिठ्ठी लावणे महत्त्वाचे असते.
क. संग्रहालयातील वस्तूंविषयीची योग्य माहिती, ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे, हे दायित्व महत्त्वाचे आहे.
ख. एखाद्या वस्तूच्या जडणघडणीआधीची ऐेतिहासिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक संदर्भ, मानवी जीवनातील तिचे स्थान, उपयोग, कलात्मकदृष्ट्या तिचे मूल्यमापन अशा विविध पैलूंवर संशोधनाद्वारे प्रकाश टाकणे आणि हे ज्ञान तेथे भेट देणार्यांना उपलब्ध करून देणे, हे संग्रहालय स्थापनेमागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.’
– श्रीमती राधा भावे, संचालक, गोवा राज्य वस्तू संग्रहालय. (‘दैनिक गोमंतक’, ७.१.२००६)