सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्यामागील वस्तूनिष्ठ इतिहास
१३.५.२०२० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने…
‘क्रूरकर्मा महमंद गझनीने सोरटी सोमनाथाचे भव्य मंदिर उद्ध्वस्त केले. तेथील मूर्ती फोडल्या ! सोमनाथाचे लिंग फोडले !! या सोरटी सोमनाथाची प्रतिष्ठापना १३ मे १९६५ या दिवशी भव्य समारंभाद्वारे करण्यात आली, त्याची ही रोमहर्षक कहाणी !
परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराची पुन्हा उभारणी करणे स्वतंत्र हिंदुस्थानाच्या शासनाचे कर्तव्य ठरते ! १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देशाची दुर्दैवी फाळणी होऊन खंडित हिंदुस्थान स्वतंत्र झाला. ३१ ऑक्टोबर १९४७ या दिवशी तत्कालीन केंद्रीय मंत्री न.वि. गाडगीळ आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भग्न सोमनाथाच्या मंदिराला भेट देऊन मंदिराची पूर्ववत् उभारणी करण्याची घोषणा केली. हिंदुद्वेषी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मंदिर उभारणीला शक्य तितका विरोध केला. असे असले तरी अनेक अडचणींवर मात करून मंदिर उभारणीच्या विश्वस्त मंडळाने वर्ष १९६५ मध्ये बांधकाम पूर्ण केले. गुरुवार, १३ मे १९६५ या दिवशी सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना झाली. या रोमहर्षक प्रसंगाचा वस्तूनिष्ठ इतिहास स्वतः (कै.) न.वि. गाडगीळ यांनी १३ जून १९६५ च्या ‘दैनिक केसरी’मध्ये एक लेख लिहून प्रकाशित केला !
१. काठेवाडी कावेबाजपणा करत जुनागड हस्तगत केला जाणे
‘स्वातंत्र्यापूर्वी माऊंटबॅटनचा सल्ला न जुमानता जुनागडच्या नवाबाने गुप्तपणे पाकिस्तानला सामीलनामा लिहून दिला होता; तथापि त्याचे राज्य तिन्ही बाजूंनी भारतीय प्रदेशाने आणि दक्षिण बाजूने अरबी समुद्राने वेढले होते. ‘जलात राहून माशाशी वैर करणे’ त्याला शक्य नव्हते. शिवाय त्याच्या प्रजेमध्ये ९५ टक्क्यांंपेक्षा अधिक लोक हिंदु होते. जे काही मुसलमान होते, ते केवळ राजाश्रित होते. त्यांचा पराक्रम आणि त्यांची स्पर्धा नवाबाला नर्तकी पुरवण्यापुरतीच मर्यादित होती. असा हा नवाब कुत्र्याचा मोठा शौकीन; म्हणूनच नाना प्रकारचे कुत्रे आणि कुत्र्या यांचा अहेर नवाबाला देण्यामध्ये प्रजाजनांची अहम्हमिका लागे ! १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत नवाबाने सामीलनामा दिला नाही; म्हणून देहलीमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली होती. खलबते झाली आणि मुंबईला ‘ताजमहाल’ उपाहारगृहामध्ये सप्टेंबरच्या अखेर जुनागडचे एक कार्यकर्ते आणि मोहनदास गांधी यांचे पुतणे सामळदास गांधी अन् अन्य मंडळी, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे केंद्रीय राज्यखात्याचे चिटणीस श्री. व्ही.पी. मेनन यांच्यात विचारविनिमय होऊन एक योजना ठरली. मुंबईतील सुमारे २५ ते ३० काठीयावाडी कार्यकर्ते ऑक्टोबर १९४७ च्या पहिल्या आठवड्यात राजकोटला गेले आणि त्यांनी तेथे स्वतंत्र जुनागड शासन स्थापन केले. राजकोट येथे आलेल्या कार्यकर्त्यांनी जुनागडच्या नवाबाचे वसतीस्थान असलेल्या मोठ्या बंगल्यात सरळ प्रवेश करून तो कह्यात घेतला. तेथे स्वतंत्र जुनागड राज्याची स्थापना झाली ! ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास सुमारे सहस्र स्वयंसेवकांची टोळी सिद्ध झाली आणि त्यांनी सैनिकी थाटाने जुनागडकडे मोर्चा नेण्यास आरंभ केला. त्यांच्या साहाय्याला म्हणून नव्हे; पण त्या प्रदेशात गडबड होऊ नये; म्हणून भारताचे सैन्य सुमारे ६०० रणगाड्यांसह साथ देत होते. ही वार्ता कळताच जुनागडच्या नवाबाने लढण्यापेक्षा जुनागडचा त्याग पत्करला. मियाँभाई बढाईखोर असतात; पण प्रसंग पहाताच बाकेपणा सोडून नम्रपणा पत्करतात. येथेही तेच झाले.
२० ते २२ ऑक्टोबरला राज्यकारभाराचे हक्क एका इंग्लिश अधिकार्याच्या स्वाधीन करून जुनागडच्या नवाबाने त्याला कुलमुख्त्यारी दिली आणि विमानातून काही कुत्री अन् काही हुजरे एवढ्या लवाजम्यासह नवाबाने जुनागडच्या जनतेला वार्यावर सोडून कराचीकडे प्रयाण केले ! त्याने जातांना जेवढी ‘चलसंपत्ती’ नेता येईल, तेवढी नेली आणि जंगम वस्तूत कुत्री नेली. त्याच्या अनेक बेगमा होत्या; पण बहुतेकांना त्याने जुनागडमध्ये सोडले.
२६ ऑक्टोबरला सामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘प्रचंड’ सैन्यामुळे जुनागड शहरात प्रजा स्वतंत्र झाली आणि त्याच वेळी सामळदास गांधी यांनी केंद्रशासनाच्या सल्ल्याने तात्पुरत्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. सरदार वल्लभभाई यांनी स्वतः जुनागडला जाऊन तेथील जनतेला नंतर भेटण्याचे ठरवले होते. त्याचप्रमाणे ते आणि त्यांच्या सांगण्यावरून मी (न.वि. गाडगीळ) ३१ ऑक्टोबर १९४७ या दिवशी विमानाने राजकोट अन् तेथून केशोकला १ नोव्हेंबर १९४७ या दिवशी पहाटे निघून सोमनाथला मंदिराच्या आवाराला भेट दिली होती. मंदिर उद्ध्वस्त झाले होते आणि गर्भघरात आकाशातून सूर्यचंद्रांना मूर्तीविरहित असलेले ते स्थान जवळजवळ सहस्र वर्षांनी पहाण्याची संधी मिळत होती. अनंत विचार त्या वेळी माझ्या डोक्यात आले.
ब्राह्मणांनी आणि पुजार्यांनी लक्ष लक्ष रक्कम महंमद गझनीला देण्याची सिद्धता दाखवली होती; पण त्याने सांगितले की, ‘मी मूर्तीभंजक आहे. मी मूर्तीविक्रेता नाही.’ नंतर त्याने सोमनाथाचे लिंग फोडले आणि खालच्या तळघरातून कोट्यवधी रुपयांची जडजवाहिरे लुटून नेली. देवळातील अनेक रूपवान सेविकांना गुलाम करून नेले आणि मुलुख उद्ध्वस्त केला.
२. सोमनाथाच्या प्रतिष्ठापनेचा निर्णय
मी सरदारांना (सरदार वल्लभभाई पटेल यांना) म्हणालो, ‘‘हे सोमनाथाचे मंदिर ! आता भारत स्वतंत्र झाला आहे, म्हणून पुन्हा बांधावे. त्याचे पुनर्निर्माण व्हावे, राष्ट्राचे, नागरिकांचे, त्यांच्या आराध्य देवतांचे !’’
सरदार वल्लभभाई यांनी सांगितले, ‘‘पसंत आहे.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘मग घोषणा करू का ? तीही शासनाच्या वतीने करू का ?’’
सरदार वल्लभभाई यांनी सांगितले, ‘‘कर.’’ मग देवळाच्या पडक्या महाद्वाराजवळ आलो. त्या महाद्वाराची चौकट उभी होती. अन्य सर्व नष्ट झाले होते आणि शे-दीडशे माणसे त्या ठिकाणी जमली होती. दरवाज्यातील उंबरठ्यावर उभा राहिलो आणि हिंदीत म्हणालो, ‘‘भारत अनेक शतकांनंतर स्वतंत्र झाला आहे. लोकांचे राज्य आले आहे. आम्ही विनाशासाठी सत्ता घेतली नाही. निर्मितीसाठी सत्ता घेतली आहे. ‘भारत शासनाने हे मंदिर पुन्हा बांधण्याचे ठरवले आहे’, असे भारत शासनाच्या वतीने मी घोषित करत आहे.’’ टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘जय सोमनाथ’ या आवाजाने सारे आवार निनादले. या वेळी आमच्यासह यदुवंशीय जामसाहेब होते. त्यांनी घोषित केले, ‘‘या कामी मी १ लाख रुपये देत आहे !’’
तेथून मग फर्लांगाच्या अंतरावर असलेल्या अहल्याबाईंनी बांधलेल्या सोमनाथ मंदिराच्या आवारात गेलो. तेथे सभा होती. त्याला सहस्त्रावर (१ सहस्रहून अधिक) माणसे जमली होती. वल्लभभाई यांनी तेथे घोषित केले, ‘‘या मंगलप्रभाती काकांच्या मनात एक शुभविचार आला आहे. मलाही तो पटला आहे. या मंदिराचे पुनरुत्थान, पुनर्निर्माण आम्ही करणार आहोत. लोकांनीही त्याला साहाय्य करावे.’’ पुन्हा ‘जय सोमनाथ’च्या घोषणा झाल्या आणि १५ मिनिटांच्या आत ३ लाख रुपयांच्या देणग्या घोषित झाल्या.
३. मंदिर उभारणीस कुणी आणि कसे फाटे फोडले ?
तेथून पुढे देहलीत आलो. मंत्रीमंडळापुढे योजना ठेवली. तिचा स्वीकार झाला. मरहूम मौलाना आझाद यांची इच्छा ‘देवळाची डागडुजी करावी, नवे बांधू नये’, अशी होती. ‘जुने भग्न ठेवण्यात प्रक्षुब्धता निर्माण करणारी घोषणा ठरील; म्हणून पूर्वी जसे होते, तसेच बांधू. हुबेहूब बांधू.’, असे मी आश्वासन दिले. पुढे पाकिस्तानी वर्तमानपत्रांत मियाँभाईंनी घोषणा केल्या, ‘आम्ही बांधू देणार नाही. पाडून टाकू ! आमच्यात अनेक महंमद गझनी आहेत.’ त्यानंतर नेहरू यांनी गांधी यांची भेट घेतली. गांधी यांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘लोकांनी यात भाग घ्यावा, असे तुला वाटते ना ! मग सारे कार्य शासकीय स्तरावर न ठेवता, ते जनतेने करावे, असे मला वाटते.’’
त्यानंतर आम्ही एक विश्वस्त मंडळ नेमले. त्यात मी, जामसाहेब, बिर्लाजी, सौराष्ट्र शासनाचा एक प्रतिनिधी, मुनशी आणि जुनागडचा एक प्रतिनिधी असे सभासद झालो. सरदार (पटेल) जिवंत असेपर्यंत म्हणजे डिसेंबर १९५० पर्यंत आम्ही ४० लाख रुपये गोळा केले. शिल्पासंबंधी सल्लागार समिती नेमण्यात आली आणि ती भारत सरकारच्या नियंत्रणाखाली होती. मी भारत शासनाचा (सरकारचा) प्रतिनिधी म्हणून विश्वस्त मंडळात होतो अन् मंत्रीपद संपल्यावर मी त्यागपत्र दिले; पण भारत सरकारने मलाच प्रतिनिधी म्हणून रहाण्यास सांगितले; म्हणून आजही मी प्रतिनिधी म्हणून विश्वस्त मंडळात आहे.
४. मंदिराचे बांधकाम चालू होऊन ते पूर्ण होणे
मंदिर जुन्या शिल्पाप्रमाणे बांधावयाचे; म्हणून सोमनाथ गावातील सोमपुरा जातीतील मंडळींनी ‘जसेच्या तसे बांधून देऊ’ म्हणून कळवले आणि भग्न मंदिराचा नकाशा ‘शंकर प्रासाद’ या नमुन्याचा आहे अन् त्यात भग्न मंदिराच्या आवारात कुठे खणले असता ? काय सापडेल ? याचा अंदाज दिला. तो खरा ठरला. मग त्याच जातीतील एक अभियंता होते. त्यांना सल्लागार नेमले आणि त्यांच्या सल्ल्याने सारे काम चालू झाले.
वर्ष १९५१ मध्ये चबुतरा, गर्भगृह बांधून झाले आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. ९ फूट लांब आणि ६ फूट घेर असलेले असे शिवलिंग सिद्ध करण्यात आले आणि ‘त्याची प्रतिष्ठापना राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून व्हावी’, असे ठरले. त्या प्रतिष्ठापनेच्या समारंभासाठी भारताबाहेरील अनेक नद्यांचे पाणी आणि मृत्तिकाही मागवण्यात आली होती. मुनशी यांनी चीनमधील नद्यांचे पाणी आणि मृत्तिका मागवली. ती डॉ. पण्णीकर यांनी धाडली.
५. सोमनाथाचे मंदिर बांधल्याचे कळताच नेहरूंना राग येणे
हे सर्व पाहून नेहरू संतापले आणि त्यांचा निधर्मी आत्मा कोपला ! मुनशींना त्यांनी पत्र लिहिले अन् खुलासा मागितला. मुनशींनी मला विचारले. मी त्यांना सांगितले की, ‘तुम्ही पंडितजींना लिहा की, हे सर्व गाडगीळ यांचे प्रकरण आहे. मग मी त्यांना उत्तर देईन !’ राजेंद्रबाबूंना (तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद) मी निमंत्रण देऊन चुकलो होतो आणि त्यांच्या माहितीसाठी एक टिपणही करून दिले होते. मंत्रीमंडळाची संमती होती. पुढे मंत्रीमंडळाच्या सभेत नेहरूंनी मला विचारले. मी मंत्रीमंडळाच्या सभेत मूळ वृत्तांत वाचून दाखवला. त्यानंतर ‘बांधकामाची प्रगती कशी होत गेली’, याच्या साप्ताहिक खाते नोंदी (वीकली नोट) टिपणातून वाचून दाखवल्या. मौलानाही म्हणाले की, ‘गाडगीळ म्हणतात, ते योग्य आहे.’ जगजीवनरामही म्हणाले, ‘‘मम.’’ (बरोबर आहे.) मग नेहरूंच्या रागाचा समंध शांत झाला !
६. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निष्ठा
यानंतर नेहरू यांनी निदान राष्ट्रपतींनी प्राणप्रतिष्ठा करू नये, असा प्रयत्न केला; पण राजेंद्रबाबूंनी सांगितले की, ‘मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे करीन. तुम्ही म्हणत असाल, तर राष्ट्रपतीपदाचे त्यागपत्र देईन.’
मी त्यांना (नेहरूंना) दिलेल्या निवेदनात ‘अजमेरचा ख्वाजासाहेबचा दर्गा’ याला सरकार साहाय्य करते. तिथे कधीही निधर्मीपणाचा प्रश्न कुणी केला नाही. सरकार भारतातील सार्या प्राचीन मशिदींना साहाय्य करते. राज्य निधर्मी म्हणजे सर्वधर्मसहिष्णु होय !’, असे नमूद केले. परिणामतः नेहरू स्वस्थ बसले.
पाकिस्तानातील वृत्तपत्रातून मंदिर भंग करण्याच्या घोषणा येतच होत्या आणि एका हिंदी वृत्तपत्राने लिहिले की, ‘नया गझनी आयेगा, तो भारतमें नये गाडगीळ भी होंगे !’ तात्पर्य कुठल्याही प्रचाराला बळी न पडता राजेंद्र प्रसाद आले अन् प्राणप्रतिष्ठा झाली. १ नोव्हेंबर १९४७ या दिवशी भारत सरकारच्या वतीने दिलेले आश्वासन आता पूर्ण झाले होते.’
लेखक : न.वि. गाडगीळ
(संदर्भ : ‘प्रज्वलंत’, दिवाळी १९८९)