‘ॐ’कार, त्याच्या मात्रा आणि ब्रह्माचे पाद
‘१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना उपहारस्वरूप पुढील लेख देत आहे.
१. ‘ॐ’चा अर्थ
‘ॐ’ ह्या एका अक्षराने, ‘ब्रह्म’ ह्या दोन अक्षरांनी, ‘प्रणव’ ह्या तीन अक्षरांनी एकच ‘ब्रह्म’ सांगितले जाते.
२. ‘ॐ’काराच्या मात्रा
साधारणत: ‘अ’ ‘उ’ ‘म’ ह्या प्रत्येकी एक मात्रा आणि चंद्रकोरीवर बिंदू ही अर्ध मात्रा; अशा प्रकारे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात.
३. मतांतरे
अ. ‘ॐ’ लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एक ‘ॐ’ आणि दुसरी – उकार दर्शवणार्या रेघेचे टोक खालच्या बाजूला नव्हे, तर वरच्या बाजूला वळलेले असणे.
आ. साधारणतः ‘ॐ’कार साडेतीन मात्रांचा मानला जातो. प्रश्नोपनिषद्, मुण्डकोपनिषद् आणि माण्डूक्योपनिषद् ह्या उपनिषदांमध्ये ‘ॐ’कार हा विषय सांगितलेला आहे अन् ‘ॐ’कार तीन मात्रांचा सांगितलेला आहे.
इ. एका मतानुसार ‘ॐ’ हा अनाहत नाद आहे. अन्य मतानुसार ‘सोऽहं’ हा अनाहत नाद आहे. आणखी एका मतानुसार ब्रह्मामध्ये कोणताही अनाहत नाद नसतो.
४. ‘ॐ’काराच्या मात्रांचे ब्रह्माच्या पादांच्या रूपाने प्रतिपादन
माण्डूक्योपनिषदामध्ये ब्रह्माला चार पादांचा सांगितले असून त्याच्या तीन मात्रा हे तीन पाद आणि चौथा मात्रारहित पाद, असे सांगितले आहे. ब्रह्माचे चार पाद हे चार विभाग नसून केवळ अवस्थांचे प्रतीक आहेत. माण्डूक्योपनिषदामध्ये प्रत्येक पाद सविस्तर सांगतांना त्यात असे अनेक शब्द आले आहेत, ज्यांचा अर्थ समजणे कठीण वाटू शकते. केवळ शब्दार्थ सांगूनही ते समजण्यासारखे नाहीत. प्रत्येक शब्द विस्ताराने समजवावा लागेल (टीप १). असे सर्व शब्द टाळूनसुद्धा ‘ॐ’कार आणि ‘ॐ’काराच्या मात्रा थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न ह्या लेखात केला आहे.
५. ‘ॐ’काराच्या मात्रा, ह्या आध्यात्मिक प्रगतीच्या टप्प्यांच्या सूचक असणे
५ अ. अवस्थालय
५ अ १. जाग्रत् : बाह्य भौतिक, ऐहिक गोष्टीत गुंतलेले असण्याच्या अवस्थेला ‘जाग्रत्’ अवस्था आणि ‘अ’मात्रा म्हटले आहे.
५ अ २. स्वप्न : ‘स्थुलातील, बाह्य व्यवहार थांबणे; पण त्यांचे विचार मनात येत राहणे’, अशा अवस्थेला ‘स्वप्नावस्था’ म्हटले आहे. हिचे प्रतीक ‘उ’ मात्रा आहे. स्वप्नातसुद्धा प्रत्यक्ष स्थुलातल्या घटना नसूनही त्या दिसत राहतात; म्हणून अशासारखी असणारी अवस्था, ही स्वप्नावस्था. प्रत्यक्ष व्यवहार थांबून ह्या अवस्थेत पोहोचले म्हणजे ‘अ’ मात्रेचा लय ‘उ’ मात्रेत झाला.
५ अ ३. सुषुप्ती : एखाद्या विचारात मग्न झाल्याने, चिंतनाच्या विषयात गढून गेल्याने, देहभान आणि इतर विषयांचे मनोभान राहत नाही. स्थूल क्रिया किंवा भोग नसतात आणि मनातसुद्धा क्रियांचे किंवा भोगांच्या विषयांचे विचार नसतात. गाढ झोपेत, म्हणजे सुषुप्तीतसुद्धा देहभान आणि मनोभान नसते; म्हणून हिला सुषुप्ती-अवस्था म्हटले आहे. ह्या अवस्थेला ‘म’ मात्रा म्हणतात. ‘उ’ मात्रेचा लय ‘म’ मात्रेमध्ये झाला.
५ अ ४. तुरीयावस्था : भौतिक घटनांनी सुख-दुःख होत नाही. त्यांच्याकडे तटस्थपणे पाहता येते, साक्षीभाव येतो. आनंदसुद्धा होतो. हा ‘म’काराचा लय अर्धमात्रेत झाला.
६. काही उपासना आणि ‘ॐ’काराच्या मात्रा
काही जण वेगवेगळ्या उपासनांमध्ये ‘ॐ’काराच्या मात्रा विशिष्ट स्थितीची प्रतीके म्हणून सांगतात. अशा उपासनांचा थोडक्यात उल्लेख पुढे केला आहे.
६ अ. दृष्टी आणि वर्णावर (रंगावर) आधारित : नासिकाग्र (भूचरी मुद्रा) किंवा भ्रू (खेचरी मुद्रा) मध्ये दृष्टीयोग (दृष्टी एकाग्र करणे)
१. आरंभी प्रकृतीचा अंधःकार दिसतो. पुढे स्थूल देहाशी संबद्ध पिवळसर प्रकाश दिसतो. ह्या स्थितीला ‘अ’ मात्रा म्हटले आहे.
२. नंतर स्थुलाचा लय सूक्ष्म देहात होतो आणि सूक्ष्म देहाशी संबद्ध आरक्त वर्ण दिसतो. म्हणजे ‘अ’ मात्रेचा लय ‘उ’ मात्रेत झाला.
३. पुढे सूक्ष्म देहाचा लय ‘कारण’ देहात होतो. श्वेत वर्ण दिसतो. म्हणजे ‘उ’ मात्रेचा लय ‘म’ मात्रेत झाला.
४. शेवटी कारणदेहाचा लय महाकारणदेहात होतो. तेव्हा नील बिंदूचे दर्शन होते. ह्याला ‘म’ मात्रेचा लय अर्धमात्रेत झाला’, असे म्हणतात. नील बिंदूच्या सतत ध्यानाने प्रकाशरूप अंगुष्ठमात्र साक्षी प्रत्यगात्म्याचे (साक्षीभाव असलेल्या आणि अंगठ्याएवढ्या आकाराच्या अंतरात्म्याचे) दर्शन होते. ह्याला ‘तुरीय अवस्था’ म्हणतात.
६ आ. वाणीलय
६ आ १. वैखरी : शब्दांच्या उच्चारासह जप करतो, तो वैखरी वाणीत. हिला ‘अ’ मात्रा मानले आहे.
६ आ २. मध्यमा : ते शब्द मनातल्या मनात म्हणणे (मतांतर – तोंडातल्या तोंडात पुटपुटणे) ही मध्यमा वाणी. इथे ‘अ’ मात्रेचा लय ‘उ’ मात्रेत झाला.
६ आ ३. पश्यन्ती : त्या जपाच्या शब्दांचा जो अर्थ, केवळ त्या अर्थाचे आकलन राहणे, ही पश्यन्ती वाणी. इथे ‘उ’ मात्रेचा लय ‘म’ मात्रेमध्ये झाला.
६ आ ४. परा : केवळ जाणिवेचे स्फुरण, ही परावाणी. ‘म’ मात्रेचा लय अर्धमात्रेत झाला.
६ इ. ध्यान-उपासना
१. सगुण मूर्ती डोळ्यांनी पाहून तिच्यावर ध्यान लावणे, ही ‘अ’ मात्रा.
२. वृत्ती अंतर्मुख करून मनात ध्यानमूर्ती आणणे, हा ‘अ’ मात्रेचा लय ‘उ’ मात्रेमध्ये.
३. चित्ताचे चांचल्य जाऊन वृत्ती शांत होणे, हा ‘उ’ मात्रेचा लय ‘म’ मात्रेमध्ये.
४. पुढे मूर्तीत चैतन्य मानून चैतन्यरूपी ध्यान-मूर्तीत मन स्थिरावणेे, हा ‘म’ मात्रेचा लय अर्धमात्रेत झाला. ह्या अवस्थेत विशिष्ट आनंदाचा अनुभव येतो.
६ ई. वृत्ती-निरोध आणि उपासना
१. वृत्ती, विचार येतात-जातात. ‘त्या अनित्य आहेत’, हे जाणून आत्म्याचे अनुसंधान चालू ठेवणे. वृत्तींमधले ‘मी’, ‘माझे’ इत्यादी विचार ही ‘अ’ मात्रा.
२. ह्या ‘मी’पणाच्या वृत्ती ओलांडल्या की, ‘अ’ मात्रेचा लय ‘उ’ मात्रेमध्ये; पण मनामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्वाची भावना राहते.
३. ‘मी कर्ता’, ‘मी भोक्ता’ ही अहंता गेली की, ‘उ’ मात्रेचा लय ‘म’ मात्रेमध्ये.
४. नंतर स्वरूपाचे ज्ञान होऊन ‘मी ब्रह्मच आहे’, ही जाणीवरूपी वृत्ती आणि साक्षीभाव आला म्हणजे ‘म’ मात्रेचा लय अर्ध मात्रेत झाला.
७. भगवद्गीता
अ. भगवद्गीतेतील अध्याय ८, श्लोक १२, १३ मध्ये थोडक्यात ‘ॐ’काराचा उल्लेख आहे. त्यात ‘सर्व इंद्रियांचा संयम करून, मनाला हृदयात निरुद्ध करून (मनात उठणारे विचार थांबवून), प्राणांना मस्तकात स्थापित करून योगधारणेत स्थिर व्हावे. मग ‘ॐ’ ह्या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत माझे (‘ॐ’च्या अर्थरूपी ईश्वराचे) स्मरण करत जो देहत्याग करून जातो, तो परमगतीला जातो’, असे भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे.
(टीप : प्रत्येक जण हे करू शकणार नाही. ज्यांना योगधारणा येते, तेच हे करू शकतील. – लेखक)
आ. भगवद्गीतेत अध्याय १७, श्लोक २३,२४ मध्ये ‘ॐ’विषयी सांगितलेले आहे. भगवान् श्रीकृष्ण सांगतात – ‘ॐ, तत्, सत्’ अशा तीन प्रकारे ब्रह्माचा उल्लेख आहे. त्यापासून पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ रचले गेले; म्हणून यज्ञ, दान अन् तप ह्या क्रियांचा आरंभ ‘ॐ’च्या उच्चाराने केला जातो.
८. समालोचन
अ. जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांमध्ये तत्त्वाचे अज्ञान असते, म्हणजे तत्त्व जाणलेले नसते.
आ. सूत्र ५ अ ४ आणि ६ इ मधील सूत्र ४ मध्ये सांगितलेला आनंद हा ब्रह्मानंद नसतो. संसारात, विश्वात गुंतण्याचे जे दुःख, त्या दुःखाच्या अभावाचा आनंद असतो.
इ. ‘ॐ’च्या ‘अ’,‘उ’,‘म’ ह्या मात्रा भौतिक अवस्थाच दर्शवतात; पण त्यांना ‘ॐ’ने निर्देशित ब्रह्माचाच पाद मानणे अयोग्य नाहीच. छान्दोग्योपनिषदात (अध्याय ३, खण्ड १४, मंत्र १) म्हटले आहे, ‘सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानिति –।’
अर्थ : हे सारे जग खरोखर ब्रह्मच आहे. त्यातूनच उत्पन्न होणारे आणि त्यातच विलीन होणारे आहे.
भगवद्गीतेत भगवान् श्रीकृष्ण सांगतात, ‘वासुदेवः सर्वं’ (अध्याय ७, श्लोक १९)
अर्थ : सर्वकाही वासुदेवच (ईश्वरच) आहे.
तात्पर्य हे आहे की, आधीचे पाद ओलांडत जाऊन शेवटचा पाद गाठायचा आहे.
ई. शेवटची अर्ध मात्रा किंवा ब्रह्माचा मात्रारहित चौथा पाद, हीसुद्धा सर्वोच्च अवस्था नाही; पण चौथ्या तुर्यावस्थेत स्थिरावलेला मनुष्य मृत्यूनंतर मुक्तच होतो.
उ. वरील विवेचनावरून ‘ॐ’कारावर आधारित साधना आपल्या आवाक्याच्या बाहेरची वाटण्याचे कारण नाही. आपण कोणत्याही मार्गाने साधना करीत असलो, ‘ॐ’चा अगदी उच्चारही करीत नसलो, तरी प्रगतीशील साधक पुढील टप्प्यांतून जात असतो.
१. आरंभी भौतिक, ऐहिक गोष्टींत रुची असणे (‘अ’ मात्रा)
२. भोग घेणे सोडणे; पण मनांत विषयांच्या भोगांचे आकर्षण असणे (‘उ’ मात्रा)
३. भोगांमध्ये आकर्षण न उरल्याने समाधानी वृत्ती; पण ईश्वराच्या किंवा ब्रह्माच्या स्वरूपाचे ज्ञान झालेले नसणे (‘म’ मात्रा)
४. ज्ञान होऊन सर्व घटनांकडे तटस्थतेने पाहिले जाऊ लागणे, म्हणजे साक्षीभाव येणे (मात्रारहित चौथा पाद. मतांतर – चंद्रकोरीवर बिंदू, ही अर्धमात्रा)
टीप १ – कठीण वाटू शकतील, असे काही शब्द हे आहेत – जागरितस्थान, बहिष्प्रज्ञ, अन्तःप्रज्ञ, स्थूलभुक्, वैश्वानर, स्वप्नस्थान, प्रविविक्तभुक्, तैजस, सुषुप्त, प्रज्ञानघन, प्राज्ञ, ईशान, तुर्य, अव्यपदेश्य, एकात्मप्रत्ययसार इत्यादी.
टीप २ – सूत्र ६ मधील सूत्रे ६ अ आणि ६ इ ही प्रणवोपासनेवरील श्री. श्री.म. वैद्य ह्यांच्या ग्रंथावर आधारित आहेत.’
– अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू, ढवळी, फोंडा, गोवा) (७.५.२०२०)
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥