‘रेड झोन’मध्ये आंब्यांची विक्री करून येणारे चालक आणि त्यांचे सहकारी यांना वेगळे ठेवण्यात येणार
आंबा बागायतदार आणि पोलीस यांच्या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय
उशिरा सुचलेले शहाणपण !
रत्नागिरी – कोरोनाचा संसर्ग असलेल्या अतीसंवेदनशील क्षेत्रामध्ये (रेड झोनमध्ये) आंबा विक्री करून येणारे वाहनचालक आणि त्यांचे सहकारी यांना गोदामात किंवा अन्य वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. आंब्याचा हंगाम संपल्यानंतर चालक आणि सहकारी यांची तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात येईल. या वेळी त्यांची निवासाची व्यवस्था बागायतदार करणार आहेत, असा महत्त्वाचा निर्णय येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि आंबा बागायतदार यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई आणि पुणे येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या शहरांतील अनेक ठिकाणी रेड झोन घोषित करण्यात आला आहे. कोरोनामुळे आंबा बागायतदारांची आर्थिक हानी होऊ नये, यासाठी शेतमाल वाहतूक आणि आंबा विक्री चालू करण्यात आली आहे. आंबा वाहतूक करणारे या अतीसंवेदनशील क्षेत्रात आंबा पोचवत आहेत; मात्र ही वाहने परत येतांना त्यांमधून मुंबईकर कोकणात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचेही लक्षात येत आहे. त्यामुळे आंबा वाहतूकदारांच्या गाड्या परजिल्ह्यांतून रत्नागिरीत आल्यावर चालक आणि त्यांचे सहकारी यांनी सरसकट लोकांमध्ये मिसळू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार आहे.