प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीतील ‘प्रीती’ हा आध्यात्मिक गुण दर्शवणारे ग्रहयोग !
संतांमध्ये ‘प्रीती’ म्हणजे निरपेक्ष प्रेम असते. आकाशातून पडणारा पाऊस ज्याप्रमाणे पृथ्वीला शीतल जलाने न्हाऊ घालतो, त्याप्रमाणे संत सर्वांवर सारख्याच प्रमाणात त्यांच्या प्रीतीचा वर्षाव करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रीतीचे सागर आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ‘प्रीती’ या गुणाशी संबंधित ग्रहयोग आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मकुंडलीतील ‘प्रीती’ हा गुण दर्शवणारे ग्रहयोग यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.
१. ज्योतिषशास्त्रानुसार ‘प्रीती’ या दैवी गुणाशी संबंधित ग्रहयोग
प्रीती हा दैवी गुण ‘गुरु’ आणि ‘शुक्र’ या दोन ग्रहांशी संबंधित आहे. गुरु ग्रह आकाशतत्त्वाशी आणि शुक्र ग्रह जलतत्त्वाशी संबंधित आहेत. प्रेमाचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाला जेव्हा गुरु ग्रहाची जोड मिळते, तेव्हा प्रेमाचे रूपांतर प्रीतीमध्ये होते; कारण ‘व्यापकत्व’ आणि ‘सर्वांना सामावून घेणे’ ही गुरु ग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. गुरु आणि शुक्र हे ग्रह कुंडलीत शुभ स्थितीत असून त्यांच्यात शुभयोग असतो तेव्हा, तसेच कुंडली अध्यात्मासाठी पोषक असते, तेव्हा व्यक्तीमध्ये प्रीती गुणाचे दर्शन होते. प्रीती हा आध्यात्मिक गुण असल्याने तो संतांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मकुंडलीत गुरु आणि शुक्र या ग्रहांचा शुभयोग असून तो प्रीती गुणाच्या दृष्टीने अत्यंत पूरक असणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र या ग्रहांचा ‘अनोन्य’ नामक शुभयोग आहे. अनोन्य योगात दोन ग्रह एकमेकांच्या राशीत असतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत गुरु ग्रह ‘वृषभ’ या शुक्र ग्रहाच्या राशीत आणि शुक्र ग्रह ‘मीन’ या गुरु ग्रहाच्या राशीत आहे. त्यांच्या कुंडलीतील हा अनोन्य योग प्रीती गुणाच्या दृष्टीने अत्यंत पूरक आणि शुभफलदायी आहे. परात्पर गुरु डॉक्टरांमधील प्रीतीमुळे त्यांनी सर्व साधकांना जोडून ठेवले आहे. साधकात कितीही दोष असले, तरी ते त्याच्यावर निरपेक्षपणे प्रीतीचा वर्षाव करतात आणि त्याला त्याच्यातील दोष घालवण्यासाठी मार्गदर्शनही करतात. यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांच्यामध्ये अतूट नाते निर्माण झाले आहे.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांमध्ये शुभयोग असल्यामुळे त्यांची प्रीती ही असामान्य आणि अलौकिक असणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मीन राशीत आहे. मीन ही व्यापकत्व दर्शवणारी रास आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांमधील प्रेमभावात व्यापकत्व आहे. शुक्र ग्रहाचा चंद्र आणि नेपच्यून या दोन ग्रहांशी शुभयोग आहे. शुक्र ग्रहाला चंद्र आणि नेपच्यून या दोन्ही जलतत्त्वाच्या ग्रहांचे पाठबळ लाभल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीती ही असामान्य आणि अलौकिक आहे.
४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत गुरु ग्रह व्यय स्थानी असल्याने त्यांची संपूर्ण समाजावर प्रीती असणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत गुरु ग्रह व्यय (बाराव्या) स्थानात वृषभ राशीत आहे. व्यय स्थान समाजाशी संबंधित स्थान आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांची संपूर्ण समाजावर प्रीती आहे. त्यामुळे त्यांनी ‘जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे’ आणि ‘साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणे’, या उद्देशाने ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. सनातन संस्था सत्संग, बालसंस्कार वर्ग, नियतकालिके, ग्रंथ, संकेतस्थळ, दृक्-श्राव्य (audio-video) इत्यादी विविध माध्यमांतून अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करून आतापर्यंत एक सहस्रहून अधिक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत !
– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.५.२०२०)