मातृवात्सल्याने साधकांची काळजी घेणारे आणि प्रत्येक क्षणी साधकांचाच विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
देवा हे प्रेम कसे । प्रीत लावून वेडे केले । मधुर वचने मज तोषवियेले । आपुले म्हणुनी त्वा संबोधियले । हे तत्त्व कसे ॥
‘भक्त देवाची सेवा करत नाहीत, तर देवच भक्तांची सेवा कशी करतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात ठायी ठायी दिसून येते. स्वतःच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोणतेही अवडंबर न करता साधकांमधीलच एक होऊन त्यांनी कधी स्वतःच साधकांना जेवण वाढले, सेवांच्या व्यस्ततेमुळे जागरण करणार्या साधकांसाठी अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था केली, वेळप्रसंगी साधकांच्या मुखात एक-एक घास भरवला, तर कधी अडचणीच्या वेळी स्वतःचे कपडेही घालायला दिले. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्राणशक्ती अत्यल्प असूनही ते त्यांच्या कक्षात सेवेला जाणार्या साधकांनाही साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचे कोणतेही वेगळे अस्तित्व न बाळगता अशा प्रकारे साधकांना सर्वतोपरी साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासातील हे प्रसंग नक्कीच आपल्या मनाचा ठाव घेतील ! त्यांच्या अशा सामान्यांहून सामान्य रहाण्यामुळेच ते ‘असमान्य’ आहेत, हे लक्षात येते ! स्वतःच्या कृतीतून साधकांना अशी अनमोल शिकवण देणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी वंदन !
गुरुदेवांनी साधकांची वाट पहात रात्री अडीच वाजेपर्यंत जागे राहून बाहेरून आलेल्या साधकांना स्वतःच जेवायला वाढणे
वर्ष १९९९ मध्ये गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आम्ही मुंबई येथे पुढील सेवा शिकण्यासाठी गेलो होतो. एकदा आम्हाला एका साधकाच्या घरून सेवा आटोपून सेवाकेंद्रात परतायला रात्रीचे अडीच वाजले. आम्ही सायंकाळी चहा आणि अल्पाहार घेतला होता अन् त्या साधकाकडे थोडा खाऊ खाल्ला होता. रात्री टॅक्सीतून उतरल्यावर आम्ही पाहिले, तर गुरुदेवांंच्या खोलीतील दिवा चालू होता आणि ते आमची वाट पहात जागे होते. आम्ही उद्वाहकातून (लिफ्टने) वर आलो. तेव्हा ते उद्वाहकापाशी येऊन थांबले होते. ते आम्हाला म्हणाले, ‘‘हात-पाय धुऊन जेवायला या.’’ तेव्हा आम्ही दोघांनी ‘आमचे जेवण झाले आहे’, असे खोटेच सांगितले. त्या वेळी आमचे काही न ऐकता ते आम्हाला स्वयंपाकघरात घेऊन गेले. तेथे पटलावर दोन ताटे वाढून ठेवली होती. गुरुदेवांनी आम्हाला बसायला सांगून स्वतःच जेवण वाढले. ‘‘आम्ही वाढून घेतो. तुम्ही झोपायला जा’’, असे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही प्रतिदिन जागरण करता. मी एक दिवस जागरण केले; म्हणून काय झाले ? स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधिकांना सकाळी लवकर उठून येथून नोकरीसाठी जाणार्या साधकांसाठी जेवणाचा डबा आणि अल्पाहार करावा लागतो. त्या दमतात; म्हणून मी त्यांना झोपायला सांगितले आणि मी थांबलो. आता उद्यापासून सायंकाळी जातांना समवेत जेवणाचा डबा घेऊन जा; म्हणजे असे खोटे बोलावे लागणार नाही.’’ तेव्हा आमच्या डोळ्यांत अश्रू आले. एवढे प्रेम आणि काळजी घरातीलही कुणी करणार नाहीत.’
– कु. शशिकला कृ. आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.११.२०१६)
पावसात भिजलेल्या साधकाला सभास्थानी जाण्यासाठी स्वतःची विजार (पॅन्ट) देऊ करणे
‘परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी जिल्ह्याजिल्ह्यांत ‘जाहीर सभा’ घेत असत. जत (जिल्हा सांगली) येथील सभेच्या एक घंटा आधी वारा-वादळ आणि पाऊस चालू झाल्यामुळे मैदानाऐवजी शाळेच्या सभागृहात सभा घेण्याचे ठरले. त्यामुळे व्यासपीठ, कापडी फलक आणि कनात इत्यादी काढतांना आम्ही आठ-दहा साधक पावसात नखशिखांत भिजलो होतो. शाळेच्या सभागृहात सभा चालू होण्यापूर्वी कपडे पालटण्यासाठी आम्ही श्री. होमकरकाका यांच्या घरी गेलो होतो. त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांनी दिलेला पायजमा मला पुष्कळ आखूड झाला होता. तेथे उपस्थित अन्य साधकांच्या हा भाग लक्षात आला नाही. त्यामुळे तो आखूड पायजमा घालून तसाच मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत गेलो. मला पहाताच परात्पर गुरु डॉक्टर पटकन उठले आणि माझ्या बाजूला उभे राहून हाताने त्यांची आणि माझी उंची मोजू लागले. ते काय करत आहेत, हे मला कळत नव्हते. नंतर ते म्हणाले, ‘‘हा पायजमा तुम्हाला पुष्कळ आखूड होतो. माझ्या पॅन्टची उंची तुम्हाला जुळेल, मी तुम्हाला घालायला माझी पॅन्ट देतो. असा आखूड पायजमा घालून सभेच्या ठिकाणी येऊ नका.’’ त्या वेळी तेथे त्यांचे वाहन चालवण्याची सेवा करणारे साधक श्री. प्रमोद बेंद्रे होते. ते पटकन म्हणाले, ‘‘नको, परात्पर गुरु डॉक्टर ! मी माझी पॅन्ट देतो, त्यांना होईल.’’ त्याप्रमाणे मी श्री. बेन्द्रे यांची पॅन्ट घातली. या छोट्याशा प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांचा कसा विचार करतात’, हे प्रत्यक्ष पहायला मिळाले.’- डॉ. चारुदत्त पिंगळे (आताचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे), राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
(५.४.२०१७)
साधकांवर उपचार करण्यास प्राधान्य देणे
‘कुडाळचे वैद्य सुविनय दामले उपचार करण्यासाठी आश्रमात आले होते. मला अनेक व्याधी असल्याने वैद्य मेघराज पराडकरने विचारले, ‘‘तुमच्यावरही उपचार करायला वैद्यांना सांगू का ?’’ तेव्हा माझ्याकडून सहजपणे बोलले गेले, ‘‘माझे आयुष्य संपत आल्यामुळे वैद्य दामले यांना साधकांवर उपचार करू दे. साधकांचे अजून पुष्कळ आयुष्य आहे. त्यांना उपचारांचा बरीच वर्षे लाभ होईल.’’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. चालक साधकाला स्वतःच्या हाताने घास भरवणारे परात्पर गुरु डॉक्टर !
‘मी परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत पुण्याला जात होतो. वेळेत पोचायचे असल्यामुळे जेवणाचा डबा मधेेच थांबून खाणे शक्य नव्हते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी एकेक घास मोडून देतो. तू खात खात गाडी चालव.’’ ते एकेक घास मोडून देत होते आणि मी खात खात गाडी चालवत होतो. मध्येच वाहतुकीची कोंडी झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पुष्कळ दाटी आहे. हात सोडू नकोस. तू तोंड उघड. मी घास घालतो.’’ प.पू. डॉक्टरांच्या हातून खल्लेला घास तो जीवनातील सवोर्र्च्च आनंदाचा क्षण बनून राहिला.’ – श्री. पाटील (२३.३.२००४)
२. सर्व साधक वातानुकूलित यंत्र वापरत नसल्याने स्वतःही उष्मा होत असूनही वातानुकूलन यंत्र न वापरणे
पुष्कळ उष्मा असूनही परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या निवासकक्षातील वातानुकूलित यंत्र (ए.सी.) वापरत नाहीत. त्या विषयी त्यांना विचारले असता ‘सवर्र् साधकांसाठी वातानुकूलित यंत्रे नाहीत; म्हणून मीही वापरत नाही’, असे त्यांनी सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलण्यातून त्यांची साधकांप्रती असलेली प्रीती कशी आहे, हे मला अनुभवता आले. विशेष म्हणजे ‘सुविधा असूनही साधकांच्या प्रेमापोटी, सर्वांनाच त्या मिळत नसल्याने त्या न वापरणे’, हा त्यांचा मोठेपणा आहे !’ – श्री. प्रकाश मराठे
३. साधकाच्या वेदनांची तीव्रता लक्षात येण्यासाठी स्वतः चिरे तासणे
‘वर्ष २००३ मध्ये एकदा बांधकाम विभागातील एका साधकाला चिरे तासण्यामुळे हाताला घट्टे पडले. त्या साधकाच्या हातावरील घट्टे पाहून प.पू. डॉक्टरांच्या नेत्रांमध्ये अश्रू आले. त्यानंतर त्यांनी स्वतः चिरे तासण्याची सेवा केली. त्यामुळे प.पू. डॉक्टरांच्या हातालाही घट्टे पडले. सहसाधकाला होणार्या वेदनेची तीव्रता लक्षात यावी; म्हणून स्वतः प.पू. डॉक्टरांनी ती सेवा करून पाहिली.’
– सौ. श्रद्धा, रामनाथी, गोवा. (२८.६.२०१४)
४. साधकांशी आदराने वागणे
‘साधक आश्रमातील मार्गिकेतून जात असतांना चुकून परात्पर गुरु डॉ. आठवले समोर आले, तर ते प्रथम साधकांना जाण्यासाठी आदराने मार्ग देतात. कक्षात या सर्व गोष्टींवरून ‘आपण त्यांना आदर देण्याऐवजी त्यांचाच आपल्याप्रतीचा आदरभाव पुष्कळ आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.’ – डॉ. अजय गणपतराव जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०१७)
ईश्वराचे त्याच्या भक्तांवर अलोट प्रेम असते. भक्तांच्या उद्धारासाठीच पुनःपुन्हा अवतार घेणारा तो भगवंत भक्ताच्या बंधनात आहे. संत जनाबाईंच्या घरी दळण दळणारा, संत एकनाथांच्या घरी पाणी भरणारा, भक्तांच्या हाकेला सत्वर ‘ओ’ देणारा करूणाकर ईश्वर स्वतःच भक्तांची सेवा करत असतो. जातीव्यवस्थेची बंधने अत्यंत कठोर असलेल्या काळात रणरणत्या उन्हात पाय भाजत असलेल्या एका मागासवर्गीय महिलेच्या मुलाला सवर्ण संत एकनाथ महाराजांनी कडेवर घेतले होते. रामेश्वरक्षेत्री नाथांनी तहानेने तळमळणार्या गाढवाला गंगाजल पाजले, आदी कथा सर्वश्रृत आहे. आता परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात त्या श्रीहरिचेच दर्शन होते ! खरेच भक्ताघरी राबणारा तो श्रीहरिच त्याच्या अवतारत्वाच्या विविध कला साधकांना गुरुरूपात दाखवत आहे. इतरांसाठी कसा त्याग करता आला पाहिजे, याची अप्रत्यक्ष शिकवणच जणू श्रीगुरूंनी त्यांच्या आचरणातून दिली आहे. श्रीगुरूंची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांच्या मनातील प्रत्येक विचार साधकांना कसे निरंतर शिकवत असतो, याची पदोपदी अनुभूती येते. शब्दातील आणि शब्दातीत, स्थुलातील आणि सूक्ष्मातील श्रीगुरूंची प्रत्येक कृती समष्टीला दिशादर्शक असते ! असे भक्तवत्सल श्रीगुरु आम्हाला लाभले, हे आम्हा साधकांचे थोर भाग्य आहे ! त्यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता ! |