तू भक्तवत्सल मन माझे चंचल । करी कृपा माय-बाप दे भक्ती अचल ॥
सद्गुरू, संत, साधक आणि हितचिंतक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीविषयी व्यक्त केलेले मनोगत !
गुरु हा सुखाचा सागरु । गुरु हा प्रेमाचा आगरु ।
सुलभ साधनामार्ग उपलब्ध करून देणार्या कृपाळू गुरुमाऊलीविषयी साधकांनी अंतरात कृतज्ञताभाव निर्माण करावा !
‘या चैतन्यदायी भारतभूमीला ईश्वरप्राप्तीसाठी ऊन-पाऊस आदींपैकी कोणत्याच अडथळ्याची तमा न बाळगता खडतर तपश्चर्या करणार्या ऋषीमुनींची परंपरा लाभली आहे. अनेक वर्षे कठोर साधना केल्यावरच ईश्वरप्राप्ती हे उच्च ध्येय त्यांना साध्य करता येत असे.
आपल्या दयाळू आणि सर्वज्ञ अशा प.पू. गुरुमाऊलीने घोर कलियुग असूनही आपल्याला झेपेल, असा सुलभ साधनामार्ग उपलब्ध करून दिला आहे अन् प.पू. गुरुमाऊलींच्या तळमळीमुळे साधक प्रगतीपथाकडे मार्गक्रमण करत आहेत. यासंदर्भात अंतरात कृतज्ञताभाव ठेवून साधकांनी प्रयत्नरत रहाणे अपेक्षित आहे.
– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
प्रत्येक क्षणाला इतरांना आनंद देण्यासाठी जगणारा देवाला आवडणार नाही का ?
‘इतरांना प्रेम देण्यास एक क्षणही पुरेसा असतो; पण तो क्षण आपल्याला टिपता आला पाहिजे. जवळ आलेल्या साधकाला कधी केवळ हाताला स्पर्श करून, तर कधी लांबून हसून, कधी लांब असणार्याकडे पाहून ‘अच्छा’ (‘टाटा’) केल्यासारखा हात हालवून, तर कधी लांबूनच इतरांकडे पाहून नमस्कार करूनही आपल्याला इतरांना आनंद देता येतो. हा आनंद शब्दांच्या पलीकडचा असतो. बर्याचदा केवळ आपला तोंडवळा प्रसन्न ठेवूनही तो आनंद आपल्याला इतरांना देता येतो. आनंदाचा प्रत्येक क्षण टिपून त्याला पूरक कृती केल्याने आपली साधना होते, तसेच समष्टीलाही आपलेसे करता येते. प्रत्येक क्षणाला इतरांना आनंद देण्यासाठी जगणारा देवाला नाही का आवडणार !’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१४.४.२०२०)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्णिलेली थोरवी !
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे कार्य यांचे वर्णिलेले काव्यात्मक माहात्म्य !
परम पूज्य दिग्गज जयंतराव ।
वंदितो तुमचे चरणरज । आत्यंतिक प्रेमाने ॥ १ ॥
आपुले ग्रामी कीर्तन केले । बहुत कौतुक जाहले ।
दृक्श्राव्य करून पाठवले । किती प्रेम वर्णावे ॥ २ ॥
बरोबर खाऊही धाडिला । माहेरपणाच अनुभवला ।
किती आनंद जाहला । वर्णावया शब्द नाही ॥ ३ ॥
बोबडे बोल मुलाचे । मायबाप कौतुक त्याचे ।
त्यापरी माझ्यावरचे । प्रेम मजला वाटले ॥ ४ ॥
एकदाच भेट झाली । आठवण तुम्ही ठेवली ।
मज त्याची प्रचीती आली । भाग्य माझे केवढे ॥ ५ ॥
– ह.भ.प. वेदमूर्ती पुं. वि. हळबेगुरुजी, पुणे
केवळ स्पर्शाने लोखंडाचे सोने करणार्या परिसाप्रमाणे चैतन्याचा स्रोत असलेले प.पू. डॉक्टर !
‘केवळ स्पर्शाने लोखंडाचे सोने करणार्या परिसाप्रमाणे चैतन्याचा स्रोत असलेले प.पू. डॉक्टर ! आमची गुरुमाऊली ! मृत्यूनंतरही साधकांची काळजी घेणारी, सतत साधकांच्या प्रगतीचा विचार करून साधकांना जीवनमुक्त करणारी, मानवजातीच्या कल्याणासाठी ग्रंथरूपाने अनमोल चैतन्याचे स्रोेत देणारी, संपूर्ण समाज आणि वातावरण यांतील रज-तमाचे आवरण दूर होण्यासाठी विविध सात्त्विक उत्पादने देणारी, अखंड विश्वातील साधकांना आणि हिंदुत्वनिष्ठांना एकत्र आणणारी, प्रत्येक धर्माभिमान्याच्या रक्तात धर्माप्रती प्रेम निर्माण करून हिंदुतेज जागवणारी, संपूर्ण ब्रह्मांडाचे आणि प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणारी, संपूर्ण ब्रह्मांडातील अनिष्ट शक्तींचा नाश करून रामराज्य देणारी, अशा आमच्या गुरुमाऊलीची थोरवी किती वर्णावी ?
अशी गुरुमाऊली आम्हाला दिल्यामुळे श्रीकृष्णाच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
– श्री. ज्ञानदेव पाटील, लोटे, जिल्हा रत्नागिरी. (१५.४.२०१६)
देवा तव प्रीतीची कशी होऊ मी उतराई ?
देवा तुझी ही प्रीती कशी होऊ मी उतराई ? ।
काहीच करत नसता आम्हा जवळी घेई ॥ १ ॥
अनुभवतो प्रतिदिन आम्ही तुझी निरपेक्ष प्रीती ।
येऊ दे करता आम्हालाही तुझ्यासम प्रीती ॥ २ ॥
कशी करू तुझी भक्ती, भक्तीला मर्यादा असे ।
देवा, तुझ्या निरपेक्ष प्रीतीला काहीच मर्यादा नसे ॥ ३ ॥
प्रीत तुझी ही युगायुगांची जगी कुठेच नसे ।
शतजन्मांची मजला तू किती ही साथ दिलीस ॥ ४ ॥
भगवतांच्या प्रीतीपुढे चारीधाम वैकुुंठही मागे पडे ।
देवा, तुझी ही प्रीती नेेईल मजला मोक्षप्राप्तीकडे ॥ ५ ॥
तुझ्या प्रीतीनेच साधनेतील पावले मी चालते ।
तुझ्यामधील प्रीतीमुळे तूच जगी सदा ठसे ॥ ६ ॥
साधकही उचलती पावले जाण्या मोक्षप्राप्तीकडे ।
देवा, तुझी प्रीती वर्णाया शब्दही मजला न उमगे ॥ ७ ॥
अपुर्या पडतील लेखण्या, असेल सागराएवढी शाई ।
तुझी प्रीती लिहिण्या हवा मनरूपी निर्मल कागदही ॥ ८ ॥
अनमोल क्षण टिपण्या लेखणी हवी सदगुणांचीही ।
आणि जिथे नसेल लवलेश अहंचाही, अहंचाही ॥ ९ ॥
देवा, तुझी प्रीती अनुभवल्यावर व्यक्त होते, ती केवळ कृतज्ञता आणि केवळ कृतज्ञता !’
– कु. वर्षा जाधव (आताच्या सौ. प्रचीती हळदणकर) (२५.७.२०१३))
सर्व साधकांना वैकुंठाला नेण्याची परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ !
‘आपले गुरु कसे आहेत, यासाठी एक दृष्टांत सांगावासा वाटतो. संत तुकाराम हे एकमेव संतश्रेष्ठ सदेह वैकुंठाला गेले. त्यांना नेण्यासाठी पुष्पक विमान आले होते. प.पू. डॉक्टर सांगतात, ‘समजा मला वैकुंठाला न्यायला देवाने पुष्पक विमान पाठवले, तर मी देवाला सांगीन, ‘सनातनचे यच्चयावत् साधक माझ्यासह वैकुंठाला घेऊन जायचे आहेत. ते सर्व जण प्रथम पुष्पकमध्ये बसतील आणि ते सर्व बसले आहेत, कुणी राहिले नाही ना, याची निश्चिती करून मगच मी विमानात प्रवेश करीन.’ असे आहेत आपले थोर परात्पर गुरु !
– पू. विनायक कर्वे, मंगळुरू, कर्नाटक
सर्वच जिवांच्या उद्धारासाठी स्वतः कष्ट घेण्याच्या सर्व सीमारेषा पार करणार्या हे गुरुमाऊली, तू जिंकलीस आणि आम्ही हरलो !
‘एका लेखात ‘साधना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणार्यांना आणि घरदार सोडून सनातनच्या आश्रमात येणार्यांना शेवटच्या श्वासापर्यंत साहाय्य करण्याची शक्ती दे’, अशी प.पू. डॉक्टरांनी भगवान श्रीकृष्णाला केलेली प्रार्थना वाचली अन् कृतज्ञतेने कंंठ दाटून आला.
सर्वच जिवांच्या उद्धारासाठी स्वतः कष्ट घेण्याच्या सर्व सीमारेषा पार करून साधकांना स्वतःच्या जिवापेक्षाही अधिक जपणारी गुरुमाऊली आम्हा साधकांना भेटली, जिच्यासाठी लक्षावधी वेळा मरण आले, तरी कणभरही कृतज्ञता व्यक्त होऊ शकत नाही; म्हणूनच हे गुरुमाऊली, तू जिंकलीस आणि तुझ्यापुढे कृतज्ञता व्यक्त करण्यात आम्ही हरलो !
साधकांना केवळ गुरुमाऊलीच्या आठवणीने, स्मरणाने आणि सत्संगाने प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जायला बळ मिळते. गुरुमाऊली साधकांच्या प्रतिकूल परिस्थितीत साधकांसाठी आधारवड बनून रहाते. तिच्या छायेमुळे प्रतिकूलतेतही अनुकूलता येऊन जाते. कितीही कठीण प्रसंग असला, तरी साधक तग धरून रहातो, तो गुरुमाऊलीच्या प्रीतीमुळेच !
समष्टीसाठी सतत कष्ट सोसणारी आणि कष्ट घेणारी, साधकांसाठी माता-पिता, बंधू आणि सखा असलेली, साधकांना सुख-दुःखाच्या पलिकडचा आनंद घ्यायला शिकवणारी, साधकांच्या प्रगतीसाठी आतुर असलेली, प्रत्येक जिवावर अमर्याद निरपेक्ष प्रेम करणारी अशी जननी गुरुमाऊली ! तिच्या छत्रछायेखाली परमेश्वराने ठेवले आहे. ही परमेश्वराची नितांत कृपा आम्हा सर्व साधकांवर निरंतर राहो, ही परमेश्वराच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना !’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक