… इष्टापत्तीत रूपांतर करा !
संपादकीय
सध्या कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानात १९५ हून अधिक राष्ट्रे बळी पडली असल्याने, जागतिक दळणवळण बंदी आणि त्यात लक्षावधी लोकांचे जात असलेले जीव यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. जागतिक दळणवळण बंदीनंतर या परिणामांचे गांभीर्य अधिक खोल होत जाऊन ‘लोक अन्नानदशेला येतील’, असे काही तज्ञ सांगत आहेत. या दोन मासांत जागतिक व्यापारातील उलाढाल १२ ते ३२ टक्क्यांनी न्यून झाली आहे. ‘जागतिक विकासदरात ३ टक्क्यांनी घट झाली आहे’, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. वर्ष २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची ७४ लाख कोटी रुपये हानी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मोठ्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती
आर्थिक महासत्ता आणि सर्वांत श्रीमंत अमेरिका जागतिक व्यापार संघटनेला ‘आम्हाला यापुढे विकसनशील म्हणा आणि चीनप्रमाणे व्यापारात आर्थिक लाभ द्या’, असे म्हणत आहे. कोरोनाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर किती खोल परिणाम केला आहे, हे समजण्यासाठी एवढे विधान पुरेसे आहे. तज्ञांच्या मतानुसार त्यांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटामुळे ३५ टक्के भगदाड पडेल. एकेकाळी असे म्हटले जायचे, ‘जर अमेरिका शिंकली, तर उर्वरित जगाला थंडी-तापाचा त्रास होतो.’ ही स्थिती आता पालटत आहे. आता हेच वाक्य चीनविषयी बोलले जात आहे. वर्ष २००२ मधील जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा ८ टक्क्यांवरून वाढून आज १९ टक्के झाला आहे. एका अभ्यासानुसार इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचेही कंबरडे कोरोनाने मोडले आहे. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लाखो लोक बेघर होत आहेत. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार इंग्लंडमधील २० लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.
भारतावरील आर्थिक परिणाम
भारतातील परिवहन, उत्पादन, विक्रीपासून ते किरकोळ विक्रेते, कोळसा अन् ऊर्जा यांसारख्या मुख्य क्षेत्रांवर अनेक पटींनी परिणाम झाला आहे. दळणवळण बंदीमुळे बहुतेक आस्थापने, उद्योग बंद पडले. घरबांधणी उद्योग संपूर्णपणे थंडावल्याने या क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळण्याची शक्यता आहे. भारताची ७० टक्के आर्थिक कामे थांबली. उड्डाण सेवा बंद झाल्या. जागतिक प्रवासी महसुलात एअरलाइन्सला ११३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तोटा होऊ शकतो, असा एक अहवाल आला आहे. ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंट’ (यू.एन्.सी.टी.ए.डी.)ने च्या अहवालानुसार चीनमधील उत्पादन घटल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला ३४८ दशलक्ष डॉलर्सपर्यंत हानी सहन करावी लागू शकते. दळणवळण बंदीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. २१ दिवसांच्या कालावधीत ‘जीडीपी’ची ७ ते ८ लाख कोटी रुपयांची हानी झाली. आंतरराष्ट्रीय ‘रेटिंग एजन्सी’नुसार १ एप्रिलपासून चालू होणार्या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर ५.२ टक्के इतका टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे. यापूर्वी विकासदर ६.५ टक्के होता आणि आगामी काळात तो ७ टक्के होण्याचा अंदाज होता. भारताचा ६० टक्के व्यापार पश्चिम आशिया, चीन, युरोपियन युनियन आणि अमेरिका या देशांशी असून तो थांबला आहे.
संकटाचा लाभ भारताने घ्यावा !
जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेची ही परिस्थिती किमान वर्षभर तरी चालेल, असा अंदाज आहे. आपत्ती या येणारच आहेत; पण आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करण्यात देशाचे पंतप्रधान माहीर आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना तेथे मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्या वेळी त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्था आणि योजना पुढे गुजरातच्या विकासात मोठ्या प्रमाणात उपयोगी पडल्या, असे म्हटले जाते. कोरोनाच्या अनुषंगाने जगावर आलेले आर्थिक संकट आणि आर्थिक घडामोडीत होत असलेली उलाढाल याचा लाभ भारताने करून घ्यायला हवा. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या दृष्टीने प्रयत्नही चालू असणार. आज भारताकडे मनुष्यबळ, अनुकूल वातावरण, बौद्धिक कौशल्य यांची न्यूनता नाही. पैसा आणि तंत्रज्ञान यांचे साहाय्य घेऊन भारतात चांगले उद्योग उभारण्याची हीच संधी आहे. एका वृत्तानुसार चीनमधील अंदाजे ८०० विदेशी उद्योग तेथून काढता पाय घेत आहेत, तर त्यांतील ३०० भारतात येण्याच्या सिद्धतेत आहेत. अमेरिकी आस्थापनेही चीनमधील त्यांचे उद्योग बंद करण्याच्या स्थितीत आहेत. ‘भारत त्यांना आपल्याकडे वळवून येथील बेरोजगारी न्यून करू शकतो’, असे अनेकांना वाटत आहे.
आज हीन दर्जाच्या उत्पादनामुळे चीनची विश्वासार्हता जागतिक बाजारपेठेत न्यून होत आहे, तसेच जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अन्य देश चीनशी व्यापारी संबंध वाढवण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सध्याच्या संकटकाळातही चीनने त्याची निकृष्ट माल खपवण्याची वृत्ती आणि व्यापारी धोरण सोडलेले नाही. दुसरीकडे भारताने स्वतःचा विचार न करता कोरोनावरील औषध विविध देशांना देऊन विश्वास वाढवला आहे. भारतात ‘ऑक्सफर्ड’च्या साहाय्याने कोरोनाच्या लसीवरील संशोधन आणि संभाव्य उत्पादन ‘सिरम इन्स्टिट्यूट’ करत असल्याचे वृत्त आहे. भारताकडे आयुर्वेदाचे अभ्यासक आणि उत्पादने यांची कमतरता नाही. कुठलाही असाध्य रोग टाळण्यासाठी, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेदाची उपयुक्तता जगभरात सर्वांना लक्षात येत आहे. त्या माध्यमातूनही मोठे व्यवसाय उभारता येऊ शकतात. थोडक्यात भारताने सध्याच्या विषाणू संसर्गाच्या आपत्तीला धैर्याने तोंड देतांना दूरदृष्टीने यातून शिकून आगामी काळातील आर्थिक स्थितीला सामोरे जाण्याची तरतूदही करायला हवी आणि या भयंकर आपत्तीचेही रूपांतर इष्टापत्तीत करायला हवे !