कोरोनाच्या वैश्विक संकटात दिसलेली दानशूरता !
सध्या ‘कोरोना’च्या रूपात आलेले संकट हे वैश्विक संकट म्हणून भारतियांसमोर आहे. ‘दातृत्व’ हा विशेष गुण भारतियांमध्ये आहे. तो या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.
या सदरात आज गोव्यातील एक पंचायत मंडळ आणि गुरुद्वार कसे साहाय्य करत आहेत, याचा वृत्तांत पाहूया ! कुंडई पंचायत मंडळाकडून साहाय्य आणि आवाहन !
फोंडा – कोविड-१९ विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आपल्याकडून सरकारला साहाय्य करता यावे, या दृष्टीकोनातून मासिक वेतनातील अर्धे वेतन सरकारकडे सुपुर्द करण्याचा निर्णय कुंडई पंचायत मंडळाने घेतला आहे, असे कुंडई पंचायतीचे सरपंच रामू नाईक यांनी सांगितले. (अशा प्रकारे कोट्यधीश असलेल्या किती राजकारण्यांनी आर्थिक साहाय्य केले, याचा विचार करावा ! ग्रामीण लोकांमध्ये असते, तशी दानशूरता शहरी लोकांमध्ये क्वचितच दिसून येते ! – संपादक) कोरोनामुळे विशेषतः आरोग्य अधिकारी, परिचारिका आणि रुग्णालये यांना साहाय्य पोचवणे आवश्यक आहे. प्रत्येकाने साहाय्य केल्यास कोरोनावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास कुंडई पंचायत मंडळाने व्यक्त केला. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर न पडता घरातच रहाणे आवश्यक आहे, याविषयी प्रत्येकाने सहकार्य करावे, असेही आवाहन सरपंच रामू नाईक यांनी केले आहे.
बेती येथील गुरुद्वारामधून प्रतिदिन ३०० गरजू लोकांच्या भोजनाची व्यवस्था !
फोंडा – बेती, पणजी येथे असलेल्या शिखांच्या गुरुद्वारामधून २२ मार्च २०२० पासून प्रतिदिन ३०० गरजू लोकांना अन्नदान करण्यात येत आहे. गुरुद्वारामध्ये हे अन्न तयार करून आसपासच्या भागातील लोकांना वितरित केले जाते. केवळ बेतीमध्येच नव्हे, तर पर्रा, काणका, कळंगुट, कांदोळी, पर्वरी, सुकूर, म्हापसा, आसगाव, अस्नोडा, नानोडा, मुळगाव, डिचोली, रायबंदर आणि ओल्ड गोवा या भागांत असलेल्या गुरुद्वारांमध्येही हे अन्नदान करण्यात येते. हे अन्न वाहनाद्वारे नेऊन वितरित करण्यात येत आहे. गुरुद्वाराचे अध्यक्ष सरदार हरविंदर सिंह धाम यांच्या नेतृत्वाखाली अन्नदानाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यांना अमरित दिनू, बंटी, भूपेंद्र सिंंह खेर, मनिंदरसिंह भाटीया या कार्यात साहाय्य करत आहेत.