उपजतच देवाची आणि साधना करण्याची ओढ असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. करुणा मुळे (वय १५ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. करुणा मुळे ही एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. बालपण
अ. ‘करुणा जन्माला आल्यापासून घरातील वातावरण आनंदी आणि भक्तीमय झाले आहे.’- श्री. विक्रांत मुळे (कु. करुणाचे काका)
आ. ‘करुणाला मी आणि तिच्या आजीने (कै. (सौ.) लताने (करुणाच्या आईच्या आईने) ८ मासांपर्यंत सांभाळले. तिला वरचे दूध द्यावे लागायचे. ती केवळ भूक लागल्यावरच रडायची. तेव्हा तिची आजी तिला पावडरचे दूध करून पाजायची.
इ. ती पुष्कळ शांत आणि गोड होती.’
– श्री. सुधाकर हावळ (करुणाचे आजोबा, (आईचे वडील), पुणे
२. उपजतच देवाची ओढ असणे
२ अ. पलंगाखाली पडलेली ‘श्री गुरुदेव दत्त’ची लहान नामपट्टी आजीजवळ आणून देणे : करुणा १ वर्ष ४ मासांची असतांना एकदा ती खेळतांना पलंगाखाली गेली आणि ५ मिनिटांनी बाहेर आली. तिच्या हातात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ ही पिवळी लहान नामपट्टी होती. ती तिने आणून माझ्या हातात दिली. ‘ती नेमकी माझ्याजवळच कशी आली ?’, याचे आम्हाला पुष्कळ नवल वाटले.’ (‘आजी (श्रीमती जयश्री मुळे) या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते’, हे लहानग्या करुणाने ओळखले.’- संकलक) – श्रीमती जयश्री मुळे (कु. करुणा मुळे हिच्या वडिलांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ आ. एकाग्रतेने भजने ऐकणे : ‘मी देवाची धून असलेल्या ध्वनीचकती आणि भजने लावायचो. तेव्हा ती एकाग्रतेने ऐकत असे. तिला आम्ही चारचाकीने मंदिरात घेऊन जायचो. तेथेही ती पुष्कळ शांत राहून निरीक्षण करत असे.’ – श्री. सुधाकर हावळ
२ इ. सात्त्विक वस्तूंची आवड : ‘करुणा लहानपणी कधीच रडली नाही. उलट ‘तिच्या बाललीला पाहातच रहाव्या’, असे आम्हाला वाटायचे. ‘देवतांची चित्रे, सनातनचे ग्रंथ, सात्त्विक ध्वनीचित्र चकत्या आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने’, हेच तिचे विश्व होते. आमची आई नेहमी सांगायची, ‘तिला केवळ देवता, श्रीकृष्ण आणि रामायण यांच्याच ध्वनीचित्रचकत्या आणून द्या.’ – श्री. विक्रांत मुळे
२ ई. स्वतः पूर्वसिद्धता करून लक्ष्मीपूजन करणे : ‘ती अडीच वर्षांची असल्यापासून प्रत्येक दिवाळीला ध्वनीचित्रचकती पाहून पहाटे उठून सर्वांना उटणे लावायची आणि सर्वांना ओवाळायची. तिला लक्ष्मीपूजन फार आवडायचे. ती अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने पूर्वसिद्धता करून लक्ष्मीपूजन करत असे. ती थोडी मोठी झाल्यावर (ती ३ र्या इयत्तेत शिकत असल्यापासूनच) पूजा करत असे.’ – श्री. विक्रांत मुळे
२ उ. ‘सप्तशती’ आणि ‘देवी सहस्रनामावली’ हे ग्रंथ आवडीने वाचणे : करुणा ६ वर्षांची असतांना एकदा मला म्हणाली, ‘‘आपण नवरात्रात घट बसवूया आणि अखंड दिवा लावूया.’’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘अगं, आपल्याला ग्रंथप्रदर्शनावर जावे लागते. एवढे करायला आपल्याला जमणार नाही.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आपण ‘सप्तशती’ ग्रंथ आणूया आणि दिवाही लावूया.’’ ती ‘सप्तशती’ आणि ‘देवी सहस्रनामावली’ हे ग्रंथ घेऊन आली आणि वाचू लागली. तिला ते फार आवडले.
२ ऊ. देवतांच्या गोष्टी आवडणे : सौ. साधनाने (करुणाच्या आईने) कन्नड सिनेमांच्या ध्वनीचित्रचकत्या आणल्या होत्या. (देवी माँ, मंजुनाथ, सिद्धारूढ स्वामी, संत गोरा कुंभार अशा गाजलेल्या सिनेमांच्या ध्वनीचित्रचकत्या होत्या.) त्यात देवीची भक्तीरसपूर्ण माहिती होती. त्यांत हिंदीमध्ये वैष्णवीदेवी, ज्वाला माँ यांच्याही गोष्टी होत्या. करुणाला त्यातील सर्व गोष्टी आवडू लागल्या. ‘मंजुनाथ’ या चित्रपटातील महादेवावरील सर्व संस्कृतप्रचुर गाणी तिची पाठ झाली. ती अजूनही ती गाणी म्हणत असते.
२ ए. गणपतीला २१ मोदकांचा नेवैद्य दाखवणे : करुणा ५ वर्षांची असतांना एकदा संकष्टी चतुर्थीच्या वेळी ती मला म्हणाली, ‘‘आजी, मी २१ मोदक करून गणपतीला नैवेद्य दाखवते. ‘कसे करायचे ?’, ते मला सांग.’’ मी सांगितल्यानुसार तिने सर्व कृती केली आणि मोदक करून नैवेद्यही दाखवला.
२ ऐ. दूरदर्शनवरील अनेक धार्मिक कार्यक्रम आवडीने पहाणे : वर्ष २०१४ मध्ये ठाण्यात असतांना तिला दूरदर्शनवर ‘संस्कार’ या वाहिनीवर दुर्गादेवीची ३२ नामावली ऐकायला मिळाली. करुणाची तीही लगेच पाठ झाली. ‘आस्था’, ‘संस्कार’,‘ज्योतिष’ या वाहिन्यांवरील कार्यक्रमातून तिला पुष्कळ शिकायला मिळाले. तेव्हापासून ती तुळशी विवाहाची सिद्धता स्वतः करू लागली. तिची ‘देवीकवच’, ‘अर्गला स्तोत्र’ ही सप्तशतीतील स्तोत्रे पाठ झाली. ती ‘रामचरितमानस’, ‘सुंदरकांड’आणि ‘विष्णुपुराण’ या मालिका ‘यू ट्यूब’वर आणि ‘संस्कार वाहिनी’वर पहात असे. ती ‘जय जय बजरंग बली’ आणि ‘गणेशलीला’ या मालिकाही पहायची. त्यामुळे त्यातील सर्व तिला पुष्कळ पाठ झाले आहे.’
– श्रीमती जयश्री मुळे
२ ओ. ‘महाभारत’ आणि ‘रामचरित मानस’ हे ग्रंथ मागून घेणे : ‘ती लहानपणापासून शांत होती. तिने कधी हट्ट केला नाही. ती केवळ ग्रंथ मागून घ्यायची. करुणा ६ व्या इयत्तेत शिकत असतांना एकदा तिने मला गोरखपूर प्रेसच्या दुकानात नेले आणि ‘महाभारत’ अन् ‘रामचरित मानस’ हे ग्रंथ घेऊन द्या’, असे म्हणाली. ती आणि कल्याणी (करुणाची लहान बहीण) खंडोबाच्या गाण्याची ध्वनीचकती पाहून अन् गाणी म्हणून नाच करायच्या. हे पाहून मला आश्चर्य वाटायचे.’ – श्री. सुधाकर हावळ
२ औ. नवीन पुस्तके आणि वह्या आणल्यावर त्यांची पूजा करून त्यावर हळद-कुंकू यांनी स्वस्तिक काढणे, तसेच पहिल्या पानावर ‘श्री गणेशाय नमः ।’, ‘श्री सरस्वतीदेव्यै नमः ।’ आणि ‘श्री गुरवे नमः ।’ हे नामजप लिहिणे : करुणा स्वतःची लेखणी (पेन) आणि कंपासपेटी यांना देवतेची नामपट्टी लावत असे, तसेच कंपास पेटीमध्ये गणपतीचे चित्र ठेवत असे. ती पहिलीत गेल्यावर सर्व वह्या, पुस्तके आणि साहित्य (आकाशतत्त्वाचे उपाय होण्यासाठी) खोक्यात ठेवत असे. तिने अभ्यासाच्या खोलीत ‘अभ्यास करण्यापूर्वी काय करावे ?’ ही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली चौकट कापून चिकटवली होती. नवीन पुस्तके आणि वह्या आणल्यावर ती त्यांची पूजा करून त्यावर हळद-कुंकू यांनी स्वस्तिक काढत असे, तसेच ती पहिल्या पानावर ‘श्री गणेशाय नमः । श्री सरस्वतीदैव्ये नमः । आणि श्री गुरवे नमः ।’ हे नामजप आवर्जून लिहायची. एकदा शाळेतील शिक्षिकेने तिचे पुस्तक पाहिले. त्यांनी तिचे पुष्कळ कौतुक केले. ती शाळेत मधल्या सुटीत न खेळता अभ्यास पूर्ण करत असे.’
– श्री. सुजीत मुळे (करुणाचे वडील)
३. कुशाग्र बुद्धीमत्ता
३ अ. ‘ती बुद्धीमान असल्याने ती शाळेतील सर्व शिक्षिकांची आवडती होती. तिचे संस्कृत उच्चार फार स्पष्ट असायचे.
३ आ. ‘ती तिसर्या इयत्तेत शिकत असतांना एका दिवसात संगणकावर मराठी टंकलेखन शिकली’, याचे मला पुष्कळ नवल वाटले.’
– श्री. विक्रांत मुळे
३ इ. ‘गीतापठण’स्पर्धेत प्रथम क्रमांक येऊन प्रमाणपत्र मिळणे : ‘वर्ष २०१४ मध्ये करुणा ५ व्या इयत्तेत शिकत होती. तेव्हा ‘चिन्मय मिशन’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थांकडून ‘गीता’ या ग्रंथातील एका अध्यायाचे पाठांतर करवून घेऊन त्याच्या स्पर्धा घेत असत. त्यात तिचा वर्ष २०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये प्रथम क्रमांक येऊन तिला प्रमाणपत्र मिळाले होते.’ – श्रीमती जयश्री मुळे
४. धर्माचरण करणे
अ. ‘तिला लहानपणापासूनच धर्माचरणाची आवड आहे. तिला कुंकू लावणे, बांगड्या घालणे, सात्त्विक पोशाख घालणे, तसेच सात्त्विक रंगाचे कपडे घालणे, यांची आवड होती.
आ. तिला वेळ वाया घालवायला आवडत नसे.’
– श्री. सुजीत मुळे (करुणाचे वडील)
इ. ‘करुणा स्वतःचा वाढदिवसही तिथीप्रमाणे देवांना अभिषेक करून साधेपणाने करायची. ती वाढदिवसाची पूर्वसिद्धता स्वतःच करत असे.’ – श्री. विक्रांत मुळे
५. सेवेची आवड
५ अ. आजीला सेवेत साहाय्य करणे : ‘वर्ष २०१७ मध्ये संभाजीनगर येथील सौ. अंजू सहानीभाभींनी तिला विज्ञापनांची संरचना करायला शिकवलेे. ती ते लगेच शिकली. ती गुरुपौर्णिमेला बालकक्षात सेवा करत असे. ती ग्रंथप्रदर्शनावरही माझ्यासमवेत चलन बनवणे, वितरणाचा हिशोब करणे, वितरणाची नोंद ठेवणे, या सेवांत साहाय्य करत असे.’ – श्रीमती जयश्री मुळे
५ आ. आश्रमात राहून साधना करू लागणे : वर्ष २०१७ मध्ये तिला रामनाथी आश्रमात पाठवण्यापूर्वी ५ दिवस आधी आम्ही तिची नवग्रह शांती करवून घेतली. पुरोहित श्री. श्रीपाद जोशी यांनी ‘करुणाची पत्रिका अध्यात्माला पूरक आहे’, असे सांगितले होते. ‘तिची सनातन संस्थेत जाऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असा त्यांच्याकडूनच विधी आणि संकल्प करून घेतला. साक्षात् देवच हे सर्व सुचवत होता; कारण त्यानंतर करुणा आश्रमात राहून साधना करू लागली.’ – श्रीमती जयश्री मुळे
५ इ. रामनाथी आश्रमात जातांना दगदगीचा आणि दूरचा प्रवास करायची सवय नसतांनाही एवढ्या लांबचा प्रवास उत्साहात आणि आनंदात करणे : ‘आश्रमात जातांना करुणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. ती २० दिवस आश्रमात राहिली. मी तिला घरी न्यायला आल्यावर तिला पुष्कळ वाईट वाटत होते. नंतर एक वर्षाने ती पुन्हा रामनाथी आश्रमात आली. तेव्हा ती आश्रमात राहून साधना करण्याचा निश्चय करूनच आली. तिला कधीच एवढा दगदगीचा प्रवास करायची सवय नव्हती; पण तिने जराही कुरकुर केली नाही. तिने उत्साहात आणि आनंदात एवढ्या लांबचा प्रवास केला. हे पाहून आम्ही थक्कच झालो. तेव्हा ती केवळ १२ वर्षांची होती. – श्री. सुजीत मुळे
६. अन्य सूत्रे
६ अ. सर्वांना हवीहवीशी वाटणे : ‘तिच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ मार्दव आणि नम्रता आहे. तिचा आवाज गोड आहे. ती घरात सर्वांनाच हवीहवीशी वाटतेे. तिचे विचार लहान वयातच प्रगल्भ आहेत.’ – श्री. विक्रांत मुळे, ठाणे
६ आ. ‘तिला लहानपणापासून स्वयंपाकाचीही आवड आहे. तिच्या आवडी-निवडी आणि सवयी पाहिल्यावर अन्य मुलांपेक्षा ती वेगळी आहे’, असे वाटते.’ – श्री. सुधाकर हावळ
६ इ. संगीताची उपजत आवड असणे : ‘करुणाला संगीताची उपजत आवड आहे’, हे सौ. सीमंतिनी बोर्डे यांनी ओळखले. त्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदार होत्या आणि त्या सेवाही करत होत्या. त्यांचे शास्त्रीय संगीताचे वर्ग होते. जून २०१५ मध्ये सौ. सीमंतिनीताईंनी तिचे निरीक्षण केले. त्या म्हणाल्या, ‘‘तिच्यात उपजतच संगीतकला आहे. मी तिला संगीताच्या दुसर्या परिक्षेला बसवते.’’ करुणा संगीताची दुसरी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. वर्ष २०१६ मध्ये तिचा संगीताच्या तिसर्या परिक्षेचा अभ्यास झाला होता आणि एप्रिल २०१७ मध्ये ती सनातनच्या रामनाथी आश्रमात गेली.
७. करुणा ३ वर्षांची असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्यासाठी खाऊ पाठवणे
वर्ष २००८ मध्ये करुणा ३ वर्षांची होती. तेव्हा पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी रामनाथी आश्रमात गेले होते. त्या वेळी त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्यांनी पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांना सांगितले, ‘‘मुळेबाईंची नात आपली बालसाधिका आहे. तिला खाऊ द्या.’’ पू. कुलकर्णीकाकांनी घरी आल्यावर आम्हाला भ्रमणभाष करून सर्व सांगितले. तेव्हा परात्पर गरु डॉक्टरांनी १० वर्षांपूर्वी करुणाला जवळ घेऊन सांगितलेले वचन खरे ठरल्याचे सिद्ध झाले. देवाचे सगळीकडे लक्ष आहे’, याचीही अनुभूती आली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– श्रीमती जयश्री मुळे
आता तिला आश्रमात राहून काही सेवांमध्ये साहाय्य करतांना पाहून ‘खरेच तिचे हेच मनोरथ होते’, असे वाटते. ‘देवाने तिला तिच्या मनासारखे दिले’, हे पाहून धन्यता वाटते. ‘तिची सेवेत आणि साधनेत प्रगती होवो. गुरुमाऊलीच तिचा सांभाळ करणार आहेत.’ देवाने आम्हाला अशी मुलगी दिली. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला आमच्याजवळ शब्दच नाहीत. देवा, कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्री. सुजीत मुळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.११.२०१९)