शबरीसारखी उत्कट भक्ती करून आणि स्वतःतील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करून श्रीरामनवमीला अंतरात रामराज्य अनुभवूया !
चैत्र शुक्ल पक्ष नवमी (२ एप्रिल २०२०) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने …
१. परात्पर गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राचा, म्हणजेच आदर्श अशा रामराज्याचा संकल्प केला असून त्या रामराज्यात रहाता येण्यासाठी ते साधकांना पात्र बनवत असणे
प.पू. गुरुदेवांनी साधकांना साधना करत असतांना ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि समाजात धर्माची पुनर्स्थापना करणे, म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे’ ही २ ध्येये दिली आहेत.
त्यासाठी प.पू. गुरुदेव साधकांना दिशा देत आहेत. प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘हे हिंदु राष्ट्र आदर्श रामराज्याप्रमाणे असेल.’’ साक्षात् श्रीविष्णूंनी त्रेतायुगात धर्माच्या स्थापनेसाठी रामरूपाने अवतार घेतला आणि आदर्श रामराज्याची स्थापना करून मानवजातीसमोर सर्वार्थांनी आदर्श ठेवला. कलियुगातील श्रीविष्णूंचे श्रीरामस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉक्टर असेच रामराज्य आताच्या या कलियुगात आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत आणि सार्या साधकजनांना रामराज्यासाठी घडवत आहेत. त्यासाठी पात्र बनवत आहेत. आपणही आपली भक्ती आणि साधना वाढवून हिंदु राष्ट्ररूपी रामराज्यात रहाण्यासाठी पात्र बनूया. त्यासाठी श्रीरामाच्या भक्तांचा आदर्श घेऊया आणि येत्या रामनवमीला प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया.
२. प्रभु श्रीरामाचे तारक आणि मारक या स्तरांवरील कार्य
२ अ. दुष्टांचा संहार आणि भक्तांचा उद्धार : प्रभु श्रीरामाने पृथ्वीवर अवतार धारण केल्यावर ऋषींच्या यज्ञात विघ्ने आणणार्या अनेक दुष्ट राक्षसांचा, तसेच रावण, वाली अशा अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला. श्रीरामाने ज्याप्रमाणे मारक स्तरावर कार्य केले, त्याचप्रमाणे त्याने अनेक भक्तांचा उद्धार करून तारक स्तरावर कार्य केले. प्रभु श्रीरामाच्या तारक स्तरावरील कार्यातील काही उदाहरणे जाणून घेऊन आपण आपल्या मनात प्रभु श्रीरामाप्रती अपार भाव जागृत करूया, तसेच आपल्या साधनेच्या दृष्टीनेही त्या प्रसंगांचा लाभ करवून घेण्याचा प्रयत्न करूया.
२ अ १. प्रभु श्रीराम आणि शबरी : श्रीरामाचे असे काही भक्त आहेत, ज्यांनी उत्कट भक्तीने श्रीरामाची कृपा संपादन केली अन् श्रीरामभक्तीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. श्रीरामाच्या अशा भक्तांपैकी शबरीचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. श्रीरामाची परमभक्त शबरी, म्हणजे भाव, भक्ती आणि श्रद्धा यांसह दृढता, सातत्य अन् चिकाटी यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
२ अ १ अ. भिल्लीण असलेल्या शबरीने मतंगऋषींची मनापासून सेवा करून त्यांची कृपा संपादन करणे : मतंगऋषींच्या आश्रमात शबरी नावाची भिल्लीण प्रतिदिन भावपूर्ण सेवा करायची. आश्रमाची देखरेख करणे, आश्रमातील गायींची सेवा करणे, यांसह ती आश्रमातील अनेक सेवा अनेक वर्षे करायची. तिने केलेल्या भावपूर्ण सेवेमुळे मतंगऋषि तिच्या गुरुभक्तीवर प्रसन्न झाले. त्यांनी देहत्यागापूर्वी शबरीला आशीर्वाद दिला, ‘माझ्यानंतर तू या आश्रमाची देखरेख कर. प्रभु श्रीराम या आश्रमात आल्यावर तो तुझा उद्धार करील.’
२ अ १ आ. मतंगऋषींचे आज्ञापालन करत शबरीने अनेक वर्षे आश्रमाची देखरेख करणे आणि श्रीराम येणार; म्हणून प्रतिदिन त्याच्या स्वागताची भावपूर्ण सिद्धता करणे : त्या दिवसापासून शबरी प्रतिदिन प्रातःकाळी उठून आश्रमाची स्वच्छता करायची. ती अनेक सुंदर रानफुले आणून आश्रम आणि आश्रमाजवळचा मार्ग फुलांनी सजवायची. प्रभु श्रीरामाला प्रसाद देण्यासाठी ती रानातील अनेक फळे तोडून आणायची. ‘प्रभु श्रीराम आश्रमात कधी येणार ?’, हे तिला ठाऊक नव्हते. ‘मतंगऋषींनी सांगितले आहे, तर आज ना उद्या प्रभु श्रीराम येणारच आहे’, या श्रद्धेने ती प्रतिदिन तेवढ्याच भावाने त्याच्या स्वागताची सिद्धता करत असे.
२ अ १ इ. श्रीराम आणि शबरी यांची भावभेट ! : एक दिवस प्रभु श्रीराम सीतेच्या शोधार्थ फिरत फिरत या आश्रमाजवळ आला. श्रीरामाला पहाताच शबरीने त्याचे चरण धरले. तिने मोठ्या भक्तीभावाने त्याला आश्रमात बोलावले. तिने त्याचे स्वागत आणि आदरातिथ्य केले. त्या दिवशी तिने श्रीरामासाठी काही बोरे प्रसाद म्हणून आणली होती. प्रभु श्रीरामाला बोरे देतांना तिने प्रत्येक बोर ‘ते गोड आहे का ?’, हे पहाण्यासाठी चाखून बघितले. तिने गोड बोरे भावभक्तीने श्रीरामाला दिली. प्रभु श्रीरामानेही त्या उष्ट्या बोरांमधील शबरीचा भाव आणि प्रेम पाहून ती आनंदाने ग्रहण केली.
शबरी प्रभु श्रीरामाला म्हणाली, ‘‘तुझ्या दर्शनामुळे आज माझ्या तपाची सिद्धी मला प्राप्त झाली. आज माझ्या जीवनाचे सार्थक झाले.’ श्रीरामाच्या दर्शनाने आणि सेवेने शबरीला मोक्षप्राप्ती झाली.
२ अ १ ई. बोध
२ अ १ ई १. दृढ श्रद्धा : ‘मतंगऋषींनी सांगितले आहे, तर प्रभु श्रीराम येणारच आहे’, या दृढ श्रद्धेमुळे तिला सेवेचा कधीच कंटाळा आला नाही. आत्मस्फूर्तीने चालू असलेली तिची ही सेवा तिच्या कुटीला प्रभु श्रीरामाचे चरणस्पर्श होईपर्यंत अविरत आणि अनेक वर्षे चालू होती. तिच्या दृढ श्रद्धेचे फळ तिला मिळाले. तिला श्रीरामाचे दर्शन झाले आणि श्रीरामाशी एकरूप होण्याचे ध्येय तिने साध्य केले. आपणही श्री गुरूंच्या शब्दांवर दृढ श्रद्धा ठेवूया.
२ अ १ ई २. सातत्य आणि चिकाटी : प्रयत्नांमध्ये सातत्य राहिले, तरच ध्येयप्राप्ती होते. येत्या श्रीरामनवमीनिमित्त व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य रहाण्यासाठी आपण सर्वांनी शबरीचे आदर्श उदाहरण डोळ्यांसमोर ठेवूया. ती जशी उत्साहाने श्रीरामाच्या आगमनासाठी आतुर होऊन सेवारत राहिली, त्याप्रमाणे आपल्याला ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी साधनेच्या अंतर्गत प्रत्येक प्रयत्न सातत्याने करणे, अनिवार्यच आहे. त्यासाठी आपण आपल्या अंतरातील दृढ श्रद्धा जागृत करूया आणि आत्मस्फूर्तीने सातत्याने प्रयत्न करून त्यामधील आनंद घेऊया.
२ अ १ ई ३. निरपेक्ष आणि शुद्ध भाव : शबरीचा निरपेक्ष आणि शुद्ध भाव देवाला भावला. तिने प्रभु श्रीरामाला उष्टी बोरे दिली; पण त्यामागे तिचा ‘श्रीरामाला प्रत्येक बोर चांगले आणि गोडच मिळावे’, हा शुद्ध भाव होता; म्हणून श्रीरामानेही तिने दिलेली उष्टी बोरे मोठ्या प्रेमाने ग्रहण केली. तो शबरीवर प्रसन्न झाला. त्याप्रमाणे ‘आपली प्रत्येक कृती पाहून भगवंत प्रसन्न झाला पाहिजे’, या भावानेच प्रत्येक कृती करूया. ‘भगवंताला आपल्याकडे यावेसे वाटावे’, अशी आपली प्रत्येक कृती भावपूर्ण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी शबरीचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्व साधकांनी प्रयत्न करूया.
२ अ २. अहिल्या उद्धार
२ अ २ अ. गौतमऋषींनी अहिल्येला शाप देणे : ‘इंद्र गौतमऋषींचा वेष करून अहिल्येकडे आला. तेव्हा अहिल्येने त्याला ओळखले नाही. त्याने अहिल्येशी दुर्व्यवहार केला. त्यामुळे गौतमऋषींनी अहिल्येला शाप दिला, ‘कोणत्याही प्रकारचा आहार न करता तू केवळ वायूभक्षण करून आणि भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप करत रहाशील. सहस्रो वर्षे कुणाही प्राण्याच्या दृष्टीस न पडता तू येथेच आश्रमात वास करशील. दशरथपुत्र श्रीराम या घोर वनात आल्यावर तू त्याचे आदरातिथ्य केल्याने शुद्ध होशील आणि पूर्ववत शरीर धारण करशील.’
– संदर्भग्रंथ ‘श्रीराम’ (लेखक : प्रा. श्री. मा. कुलकर्णी)
२ अ २ आ. विश्वामित्रऋषींनी श्रीरामाला गौतमऋषींच्या आश्रमात नेणे आणि अहिल्येला शापापासून मुक्ती मिळवून देणे : अहिल्या सहस्रो वर्षांपासून हा शाप भोगत होती. एकदा विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना त्या वनातील गौतमऋषींच्या आश्रमात नेले. त्यांनी श्रीरामाला अहिल्येला मिळालेल्या शापाविषयी सांगून ते श्रीरामाला म्हणाले, ‘‘हे महातेजस्वी श्रीरामा, तू पुण्यकर्मा गौतमाच्या आश्रमात चल आणि देवस्वरूप अशा अहिल्येचा उद्धार कर.’’ तेव्हा प्रभु श्रीराम लक्ष्मणासह गौतमऋषींच्या आश्रमात गेले. अहिल्येने केलेल्या सहस्रो वर्षांच्या तपाच्या योगाने तिची प्रभा चारही दिशांना पसरली होती. अशी महाभाग्यवती अहिल्येचे श्रीरामाने अवलोकन केले.
२ अ २ इ. अहिल्येचा उद्धार : गौतमऋषींच्या आज्ञेवरून अहिल्या श्रीरामाचे दर्शन होईपर्यंत कोणाच्याही दृष्टीस पडली नाही. आता शापमुक्त होण्याची वेळ आल्याने ती त्या तिघांच्या दृष्टीस पडली. अहिल्या दृष्टीस पडल्यावर श्रीरामाने आनंदाने तिच्या पायांना स्पर्श करून तिला वंदन केले. गौतमऋषींच्या वचनांचे स्मरण येऊन अहिल्येनेही आदरपूर्वक अंतःकरणाने त्याचे आतिथ्य केले आणि श्रीरामानेही त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारे श्रीरामकृपेने अहिल्या शापमुक्त, म्हणजे पापमुक्त झाली.
हा रोमहर्षक प्रसंग पाहून देवांनीही दुंदुभी वाजवल्या आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. गौतमऋषींच्या आज्ञेनुसार वागून तपोबलाने शरीरशुद्धी झालेल्या अहिल्येची देवतांनी प्रशंसा केली.
२ अ २ ई. बोध : अहिल्येची कथा मोठी उद्बोधक आहे. अहिल्येकडून झालेल्या एका चुकीमुळे तिला शाप मिळाला आणि तिने सहस्रो वर्षे शाप भोगला. तिने सहस्रो वर्षे केवळ वायूभक्षण करून तप करून पापक्षालन केले. तेव्हा भगवंताने तिच्यावर कृपा करून तिचा उद्धार केला.
३. साधकांकडून ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन करवून घेऊन त्यांचे पापक्षालन करवून घेणारे श्रीरामस्वरूप प.पू. गुरुदेव !
३ अ. मनुष्य संचित आणि प्रारब्ध यांचे गाठोडे समवेत घेऊन जन्माला येणे, मिळालेल्या मनुष्य जन्मात त्याच्याकडून पुन्हा अनेक अपराध घडणे अन् होणार्या चुकांचे परिमार्जन न केल्यामुळे तो जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकणे : मनुष्य पूर्वजन्मांचे संचित आणि प्रारब्ध (पाप) यांचे गाठोडे घेऊनच जन्माला येतो. ते त्याला या जन्मात भोगायचे असते; पण त्याला मिळालेल्या या मनुष्य जन्मातही त्याच्याकडून दिवसभरात कळत-नकळत सहस्रो अपराध घडतात. त्या अपराधांचे त्याला पापही लागते. त्या पापांचे वेळोवेळी क्षालन केले नाही, तर ते पापक्षालन करण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आतापर्यंत पापक्षालन न केल्यामुळे आणि प्रत्येक जन्मात नवीन पापे करत असल्यामुळे त्याचे पापाचे गाठोडे वाढतच रहाते. त्यामुळे अनेक जन्म घेऊनही तो भगवंतापासून दूरच रहातो. आपणही जन्माला येतांना आपल्या पूर्वजन्मांच्या संचित आणि पाप यांचे गाठोडे घेऊनच जन्माला आलो आहोत. ते संचित भोगण्यासाठी भगवंताने आतापर्यंत आपल्या जीवनात अनेक प्रसंग घडवले. वाईट कर्मांचे फळ भोगण्यासाठी कठीण प्रसंग आपल्या जीवनात आणले, तर चांगल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी चांगले आणि आनंददायी प्रसंग आपल्या जीवनात आणले. आपण कर्मफलन्यायानुसार सर्व भोगत होतो; परंतु आपल्याकडून पापक्षालन होत नसल्यामुळे प्रत्येक जन्मात आपले पापाचे गाठोडे संपतच नव्हते. त्यामुळे चांगले कर्मफल भोगतांनाही आपल्या जीवनात आनंद नव्हता.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून साधकांच्या अनेक जन्मांतील पापांचे क्षालन करवून घेणे : भगवंत हा दयाळू आणि कृपाळू आहे. त्यामुळेच त्याने आपल्याला हा मनुष्य जन्म दिला आहे. हा मनुष्य जन्म इतका अमूल्य आहे की, याच जन्मात आपल्याला आपल्याकडून झालेल्या चुकांचे पापक्षालन करता येते. ‘ही पापक्षालनाची प्रक्रिया कशी करायची ?’, हे आपल्याला परात्पर गुरु डॉक्टर शिकवत आहेत. हे शिकवण्यासाठीच अहिल्येचा उद्धार करणारा श्रीराम परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्यासाठी पुन्हा पृथ्वीवर अवतरला आहे. आपल्याला ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून तो आपल्या केवळ याच जन्मातील नव्हे, तर आतापर्यंतच्या लक्षावधी जन्मांतील चुकांचे पापक्षालन करवून घेत आहे. केवढी ही श्रीरामाची कृपा आहे ! आपण आपल्या कर्मफळानुसार चांगले आणि वाईट प्रसंग भोगत असतांना भगवंत आपल्या समवेत राहून पदोपदी आपली काळजी घेत होता; पण आतापर्यंत आपण भगवंताची ही लीला समजू शकलो नाही. आपली सर्व पापे याच जन्मात संपावी आणि याच जन्मात आपण आनंदप्राप्ती, म्हणजे ईश्वरप्राप्ती करावी, यासाठीच परात्पर गुरुरायांच्या रूपाने प्रभु श्रीराम आपल्या जीवनात आला आहे आणि आपल्याला ही ‘स्वभावदोष आणि अहं’ निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून त्याने आपल्याला पापक्षालनाचा सोपा मार्ग दाखवला आहे.
३ इ. चुकीची खंत वाटून दोन्ही कान पकडून क्षमायाचना करतांना गुरुतत्त्व कार्यरत होणे आणि गुरुतत्त्वाच्या स्पर्शामुळे उद्धार होणे : आपण ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करत असतांना गुरुदेव आपला उद्धार करतात. एखाद्या प्रसंगात आपल्याकडून चूक होते आणि त्या चुकीविषयी आपल्याला खंत वाटून आपण क्षमायाचना करतो. ज्या क्षणी क्षमायाचनेसाठी आपण आपले कान पकडतो, त्याच क्षणी तेथे गुरुतत्त्व कार्यरत होते. ‘आपल्याला झालेली चुकीची जाणीव आणि त्यासाठी वाटलेली खंत’ हे पाहून श्री गुरु सूक्ष्मातून आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्या त्या पापाचे क्षालन करतात. श्रीरामाने अहिल्येचा उद्धार केला. त्याचप्रमाणेे परात्पर गुरुदेवही साधकांकडून ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करवून घेऊन साधकांचे पापक्षालन करवून घेऊन त्यांचा उद्धार करत आहेत.
३ ई. श्रीरामरूपी गुरुरायांनी या जन्मात पापक्षालनाची अपूर्व संधी दिली असून त्यांच्या कृपेने आपला या जन्मातच उद्धार होत असणे : अहिल्येने सहस्रो वर्षे शाप भोगल्यावर श्रीरामाने तिचा उद्धार केला; मात्र परात्पर गुरुमाऊलीची आपल्यावर अगाध कृपा आहे. आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होऊन आपण पापक्षालनाची प्रक्रिया केल्यावर त्यांच्या कृपेने लगेचच आपले पापक्षालन होते. अशीच कृपा आपण व्यष्टी साधनेअंतर्गत प्रत्येक प्रयत्न करत असतांना श्री गुरु आपल्यावर करतात. जे केवळ आपल्या दृष्टीक्षेपातून जिवांचे पापक्षालन करतात आणि ज्यांच्या केवळ दर्शनानेच जन्मोजन्मीच्या पापांच्या राशी जळून जातात, अशा श्रीरामस्वरूप गुरुरायांनी आपले पापक्षालन करवून घेऊन आपल्याला उद्धाराच्या दिशेने नेले आहे. त्यासाठी आपण प.पू. गुरुदेवांप्रती आणि या उद्धारक प्रक्रियेविषयी अखंड कृतज्ञ राहूया.
४. श्रीरामनवमीच्या निमित्ताने आपल्या अंतरात रामराज्य येण्यासाठी शुभसंकल्प करूया !
४ अ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून स्वतःचा उद्धार करून घेऊया : ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत प्रत्येक प्रयत्न करत असतांना आपण श्री गुरुरायांची ही कृपा अनुभवण्याचा प्रयत्न करूया, उदा. ‘चूक सांगून क्षमायाचना करतांना, फलकावर चुका लिहितांना, सारणीत चुका लिहितांना, स्वयंसूचना सत्र करतांना अशा प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी आपल्या चुका आणि दोष यांचेे पापक्षालन करण्यासाठी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांनी आपल्या मस्तकावर हात ठेवला आहे अन् त्या प्रयत्नांच्या माध्यमातून ते आपला उद्धार करत आहेत’, हे अनुभवण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या अंतरात रामराज्य येण्यासाठी आपण शुभसंकल्प करूया.
४ आ. खरे रामराज्य : आपली पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्यावर हृदयातील श्रीरामाचे, म्हणजे आत्मारामाचे राज्य असणे, हेच खरे रामराज्य आहे. त्यासाठी आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे अडथळे दूर करूया. आपण पापक्षालन करून आपले अंतकरण शुद्ध करूया. आपल्याला अंतरात रामरायाचे अस्तित्व अनुभवायचे आहे. त्यासाठी रामनवमीच्या दिवशी गुणरूपी श्रीरामरायाचा अंतरात जन्म होतांनाचा आनंददायी क्षण अनुभवूया.
५. कृतज्ञता
प्रभु श्रीराम आणि प.पू. गुरुदेव हे एकच आहेत. त्यांनी मानवजातीला साधनेसाठी ही अमूल्य शिकवण दिली आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !
६. प्रार्थना
‘हे प्रभु श्रीरामा, जसे शापमुक्त होण्याची वाट पहाणार्या अहिल्येचा तू तुझ्या चरणस्पर्शाने उद्धार केलास, तसा तू आमचाही उद्धार निश्चित करणार आहेस’, ही दृढ श्रद्धा आमच्या मनात अखंड जागृत राहू दे. रामराज्याच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तूच आम्हाला बळ दे. आमच्यामध्ये तुझ्या या व्यापक कार्यात सहभागी होण्याची क्षमता नाही; परंतु आम्हाला आपल्या क्षमतेप्रमाणे त्यातील स्वतःचा वाटा उचलणारी खारूताई बनव’, अशी तुझ्या चरणी आर्त प्रार्थना करतो.’
– कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक