चीनमध्ये कोरोनामुळे ५० टक्के डॉक्टरांना नैराश्य, तर ७१ टक्के दुःखी
डॉक्टरांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘थेरपी डॉग’चा केला जात आहे उपयोग !
न्यूयॉर्क – चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्या ३९ रुग्णालयांतील १ सहस्र २५७ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांची एक पहाणी करण्यात आली. त्यात ५० टक्के डॉक्टरांना नैराश्य (डिप्रेशन) आले असून, ४५ टक्के डॉक्टरांमध्ये चिडचिडेपणा वाढल्याचे, तर ३४ टक्के डॉक्टरांचा निद्रानाश झाला आहे. या पहाणीमध्ये ७१ टक्के डॉक्टर दुःखी असल्याचेही समोर आले आहे. अनेकांना ‘स्वतःच्या कुटुंबाला महामारीची झळ बसणार नाही ना’, अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे निराशेच्या आणि तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी चीनच्या डॉक्टरांनी अमेरिकेतील श्वानांचे साहाय्य घेतले आहे. अमेरिकेत ५० सहस्रांहून अधिक ‘थेरपी डॉग्ज’ आहेत. नॉर्वे आणि ब्राझिल आदी देशांत आता रुग्णांचा तणाव घालवण्यासाठी ‘थेरपी डॉग्ज’चा वापर केला जात आहे.
‘थेरपी डॉग’ म्हणजे काय ?
सुरक्षायंत्रणांकडील श्वान पथकातील श्वान आणि ‘थेरपी डॉग’ यांत भेद आहे. रुग्णालयात किंवा तणात असलेल्या लोकांना समाधान देणे, त्यांना प्रेम देणे यासाठी काही श्वानांना खास प्रशिक्षण दिले जाते. त्यांना ‘थेरपी डॉग’ असे म्हणतात. निराशेत किंवा तणावात असलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी, तसेच रुग्णांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी अशा श्वानांचा उपयोग केला जातो. अनेक विकसित देशात असे ‘थेरपी डॉग्ज’ वापरले जातात.