देहली पोलीस पाकिस्तानी शरणार्थी हिंदु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार !
नवी देहली – कोरोनामुळे देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर काही जणांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासह गरजू व्यक्तींना साहाय्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उत्तर-पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या पथकाने येथील मजिलीस पार्क छावण्यांमध्ये आलेल्या २८० शरणार्थी हिंदु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे दायित्व घेतले आहे. हे शरणार्थी पाकच्या सिंध प्रांतातून आले आहेत. याविषयीचे वृत्त ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
आर्या पुढे म्हणाले, ‘‘दळणवळण बंदीच्या काळात या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाल्याने ते अडचणीत आहेत, असे आम्हाला समजले. पुढचे २१ दिवस आम्ही या शरणार्थींना ‘मास्क’, अन्न, औषध यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहोत.’’ छावणीमध्ये रहाणारे श्री. नेहरू लाल यांनी देहली पोलिसांचे आभार मानले आहेत.