दादर येथील भाजीबाजार बंद ठेवण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय
मुंबई, २८ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दादर (पश्चिम) रेल्वेस्थानकाच्या बाहेर भरणारा भाजीबाजार २९ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. तसा आदेश पालिकेकडून देण्यात आला आहे.
दादर येथील भाजीबाजारात नियमित सहस्रावधी लोक भाजी खरेदी करण्यासाठी येतात. दळणवळण बंदी घोषित केल्यानंतरही येथील वर्दळ कायम होती. यातून कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची असुविधा होऊ नये, यासाठी भाजी उपलब्ध होण्यासाठी विविध ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये सोमय्या मैदान, एम्.एम्.आर्.डी.ए. एक्झिबिशन मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका, सेनापती बापट मार्ग (दादर) या ठिकाणी भाजीपाला उपलब्ध होणार आहे.