सर्वत्र वाढत चाललेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !
कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर
‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सर्वत्रचे जनजीवन विस्कळीत होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयप्रद वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकटीकरण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.
१. प्रसंग : ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती वाटणे
१ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती निर्माण होईल, त्या वेळी ‘मी आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे’, याची मला आठवण करून देईन आणि दिवसभरात अधिकाधिक वेळ नामजप अन् प्रार्थना करून मी सत्मध्ये राहीन.
२. प्रसंग : ‘मला कोरोना विषाणूची लागण झाल्यास माझा मृत्यू होईल’, अशी भीती वाटणे
२ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास माझा मृत्यू होईल’, असा विचार येईल, त्या वेळी ‘या विषाणूंची लागण झालेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये आजाराचे स्वरूप सौम्य असते’, याची मला जाणीव होऊन मी सकारात्मक राहीन आणि कुटुंबीय, हितचिंतक अन् सरकारी यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्याची योग्य ती काळजी घेईन.
३. प्रसंग : औषधोपचार करूनही मुलीची सर्दी / ताप उणावत नसल्याने तिची काळजी वाटणे
३ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी मुलीला बर्याच दिवसांपासून सर्दी / ताप असेल, त्या वेळी ‘प्रत्येक वेळी सर्दी / ताप हा कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे झालेला नसतो’, याची मला जाणीव होईल आणि देवावर श्रद्धा ठेवून मी आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार तिला औषधे देईन अन् तिची स्थिती वेळोवेळी त्यांना कळवीन.
४. प्रसंग : ‘कोरोना विषाणूंच्या साथीमुळे माझे कुटुंबीय मला भेटण्यासाठी प्रवास करू शकत नाहीत’, याची चिंता वाटणे
४ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘माझे कुटुंबीय मला भेटण्यासाठी प्रवास करू शकत नाहीत’, या विचाराने मला चिंता वाटत असेल, तेव्हा ‘साथीच्या काळात सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रवास न करणे हितकारक आहे. ही तत्कालिक स्थिती आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी ‘मला अन् कुटुंबियांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये’, यासाठी सरकारी यंत्रणेने सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्याची काळजी घेईन.
५. प्रसंग : सध्या दळणवळण बंदी असून सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंचा (दूध, अन्नधान्य, औषधे आदींचा) तुटवडा भासत असल्याने ‘मला त्या उपलब्ध होतील ना ?’, याची काळजी वाटणे
५ अ. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘सध्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असल्याने मला त्या वस्तू उपलब्ध होतील ना ?’, याची काळजी वाटत असेल, त्या वेळी ‘भारत सरकारने सर्व नागरिकांना या वस्तू मिळाव्यात’, यासाठी त्यांचे घरपोच वितरण करण्याची व्यवस्था केली आहे’, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी निश्चिंत राहून नामजप आणि प्रार्थना यांवर लक्ष केंद्रित करीन.
६. स्वयंसूचना देण्याची पद्धत
आपल्या मनात वरीलपैकी ज्या अयोग्य विचारांचा ताण किंवा काळजी असेल, त्या विचारांवर १५ दिवस अथवा विचार न्यून होईपर्यंत संबंधित स्वयंसूचना द्यावी. या स्वयंसूचनांची दिवसभरात ५ सत्रे करावीत. एका सत्राच्या वेळी ५ वेळा एक स्वयंसूचना अंतर्मनाला द्यावी.
७. मन एकाग्र करून स्वयंसूचना सत्रे करा आणि अल्पावधीत मनातील अयोग्य विचार न्यून झाल्याचे अनुभवा !
मन एकाग्र करून स्वयंसूचनांची सत्रे केल्यास सूचनांचा अंतर्मनावर संस्कार होऊन ‘मनातील ताण अथवा काळजी यांचे विचार अल्पावधीत उणावतात’, असे अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे मन एकाग्र करून स्वयंसूचना सत्रे करावीत. मनात येणार्या निरर्थक विचारांमुळे सत्र एकाग्रतेने होत नसल्यास थोड्या मोठ्या आवाजात (पुटपुटत) स्वयंसूचना सत्र करू शकतो किंवा कागदावर लिहिलेली स्वयंसूचना वाचू शकतो. यामुळे विचारांकडे लक्ष न जाता ते आपोआपच न्यून होतील आणि स्वयंसूचनेचे सत्र परिणामकारकरित्या होईल. मोठ्या आवाजात सत्र करतांना ‘इतरांना व्यत्यय येणार नाही’, याची काळजी घ्यावी.
वरीलप्रमाणे अन्य कोणत्या विचारामुळे ताण, तणाव, काळजी आदी निर्माण होत असेल, तर त्यासाठीही स्वयंसूचना घेऊ शकतो.
(मनाच्या समस्या दूर करण्यासाठी ‘मनाला योग्य स्वयंसूचना देणे’, हा स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचा एक भाग आहे. संपूर्ण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयीची माहिती सनातनची ग्रंथमालिका ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन (७ खंड)’ या ग्रंथांत दिली आहे.)
‘सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत देवच आपले रक्षण करणार आहे’, अशी श्रद्धा ठेवून साधना वाढवा !’
– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२०)