कोरोनामुळे झालेली परिस्थिती आता सुधारेल ! – नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट
चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीविषयीही वर्तवले होता अचूक अंदाज
नवी देहली – कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.
जगभरातील तज्ञांकडून ‘चीनमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्यास वेळ लागेल’, असे सांगण्यात येत होते; पण त्याच वेळी लॅविट यांनी मात्र ‘चीनमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या न्यून होऊन परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल’, असे ठामपणे सांगितले होते. इतकेच नव्हे, तर लॅविट यांनी ‘चीनमध्ये ८० सहस्र लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते आणि ३ सहस्र २५० जणांचा मृत्यू होऊ शकतो’, असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षातही २४ मार्चपर्यंत चीनमध्ये ८१ सहस्र १७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३ सहस्र २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘सामाजिक विलगीकरण’ अर्थात् ‘सोशल आयसोलेशन’द्वारेच कोरोनावर मात करता येऊ शकते’, असेही मायकल लॅविट यांनी सांगितले.