सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध चालू गावच्या सीमा बंद करणार्यांवर गुन्हे नोंद होणार ! – जिल्हा पोलीस
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे २६ मार्चला स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे देशात दळणवळण बंद करण्यात आल्याने कामासाठी किंवा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर असलेले अनेक जण अडकून पडले आहेत. आता जिल्ह्याबाहेर असलेल्यांना जिल्ह्यात आणण्याची मागणी केली जात आहे, तर काहींनी ‘जेथे आहेत, तेथेच त्यांना राहू दे’, असेही मत व्यक्त केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न चालू झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्वांनी स्वत:च्या घरात राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध चालू
२६ मार्चला सापडलेल्या जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्याच्या घरापासून ३ किलोमीटरच्या अंतरामध्ये प्रत्येक घरी जाऊन वैद्यकीय साहाय्यक, आशा वर्कर्स आणि आरोग्य सेवक यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात आलेल्या २० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांपैकी १० रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. विलगीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या १० रुग्णांवर उपचार चालू आहेत.
गोवा राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील तरुण-तरुणींना पुन्हा जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न चालू
देशात दळणवळण बंद झाल्याने अनेक ठिकाणी कामावर गेलेले, तेथेच अडकून पडले आहेत. सिंधुदुर्गातील अनेक युवक युवती गोव्यात नोकरी करत आहेत. त्यांना सिंधुदुर्गात लवकर आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न चालू आहेत; मात्र हा प्रश्न २ राज्यांतील सीमा बंद झाल्याने उद्भवला असून तो घाईत सुटणारा नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील जे युवक-युवती गोवा येथे अडकले आहेत, त्यांनी साहाय्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन गोवा शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर गोव्यात अडकलेल्या युवक-युवतींविषयी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना गोवा राज्याच्या संबंधित अधिकार्यांशी बोलण्यास सांगितले आहे, तसेच या युवक-युवतींना जिल्ह्याच्या सीमेवर ‘क्वारंटाईन’ करता येईल का ? हे पहावे, अशा सूचना दिल्या.
कणकवली तालुक्यात दळणवळण बंदीची काटेकोर कार्यवाही
तालुक्यात २६ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पोलिसांनी २७ मार्चला सकाळपासूनच कणकवली दळणवळण बंदची कडक कार्यवाही करण्यास प्रारंभ केला आहे. मुख्य चौकात दंगल नियंत्रण पथक आणि वाहतूक पोलीस कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
खासगी डॉक्टरांनी त्यांची सेवा चालू ठेवावी !
कोरोनामुळे दोडामार्ग येथे खासगी डॉक्टरांनी त्यांची सेवा खंडित केलेली आहे. तालुक्यात आधीच आरोग्य सेवेची परिस्थिती नाजूक आहे. त्यात आता खासगी डॉक्टरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा खंडित केल्यामुळे सर्व भार दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयावर पडत आहे. या ठिकाणीही डॉक्टरांसह अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे जनतेला बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून खासगी डॉक्टरांनी त्यांची सेवा सुरळीत चालू करावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे; मात्र आवश्यक ते सुरक्षेचे उपाय उपलब्ध झाल्याशिवाय सेवा चालू करणे धोकादायक असल्याचे काही खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मालवण येथील हॉटेल चैतन्यकडून अन्नछत्र
सध्या दळणवळण बंद झाल्याने अनेक गरजू आणि गरीब लोकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीर मालवण येथील हॉटेल चैतन्यचे मालक नितीन वाळके यांनी गरजू व्यक्तींसाठी अन्नछत्र चालू केले आहे.
जिल्ह्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा चालू ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना अत्यावश्यक सेवा अन् जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा, या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा अन् वस्तू यांचा पुरवठा चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
साहित्य घरपोच देणे आणि आंबा वाहतूक यांसाठी विशेष योजना
सर्व घाऊक विक्रेत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना घरपोच सेवा द्यावी, त्यासाठी उपप्रादेशिक परिहवन अधिकारी (RTO) यांच्याकडून प्रत्येकाने अनुज्ञप्ती घ्यावी. अनुज्ञप्तीसाठी प्रत्येक तालुका स्तरावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. चिकन आणि अंडी यांचा पुरवठा करणार्यांनीही वरीलप्रमाणे वाहनाची अनुमती घेऊन घरपोच सेवा द्यावी. किरकोळ विक्रेत्यांनी दूरध्वनी, भ्रमणभाष (मोबाईल) यांद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी. आंबा आणि अन्य कृषि उत्पन्नाच्या वाहतुकीसाठी संबंधित व्यापार्यांनी तालुका कृषि अधिकारी, बाजार समिती अधिकारी यांच्याद्वारे ‘आर्टीओ’कडून सर्व माहिती आणि कागदपत्रे देऊन तालुका स्तरावरच अनुमती घ्यावी. आंबा आणि कृषिविषयक साहित्याच्या वाहतुकीचे सर्व नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी जिल्हा कृषि अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, तसेच जिल्ह्यात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या अन् आंबा, काजू या फळांची वाहतूक करणार्या वाहनांना ‘पास’ देण्याचे काम तालुका स्तरावर चालू असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सव्वा दोन लक्ष मास्कचे, तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांच्या सुरक्षिततेसाठी मागणीप्रमाणे ‘एन् १५’ या मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
गावच्या सीमा बंद करणार्यांवर गुन्हे नोंद होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात काही गावातील ग्रामस्थांनी बाहेरील लोक गावात येऊ नयेत, यासाठी त्या त्या गावच्या सीमा बंद केल्याचे समजते. अशा प्रकारे गावच्या सीमा बंद करणे कायद्याला अनुसरून नाही. त्यामुळे कोणालाही गाव बंद करता येणार नाही. असा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.
शहरातील लोक शासनाच्या उपाययोजनांना हरताळ फासतात; म्हणून कारवाई करणारे पोलीस गावात ग्रामस्थ स्वतःहून कठोर उपाययोजना करत असतांना त्यांच्यावर गुन्हे का नोंद करत आहेत ?
परप्रांतियांकडून अवैध मासेमारी चालू असल्याने पारंपरिक मासेमारांमध्ये संताप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील मासेमारी बंद असली, तरी मालवणच्या समुद्रात यांत्रिक पद्धतीने आणि प्रकाशझोतात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. शासनाने वेळीच यांचा बंदोबस्त न केल्यास मासेमार संचारबंदी मोडून संघर्षासाठी समुद्रात उतरतील, अशी चेतावणी पारंपरिक मासेमारांच्या संघटनांनी दिली आहे. पारंपरिक मासेमारांचे नेते छोटू सावजी, बाबी जोगी आणि रविकिरण तोरस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने मत्स्यव्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करूनही मासे विक्रीवर प्रशासनाने बंदी आणली आहे.
‘घराबाहेर पडू नको’ सांगणार्या भावाची हत्या
मुंबई – देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला. त्यामुळे ते गतप्राण झाले. आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !