शासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला तिलांजली
जनता नियमांचे उल्लंघन करून स्वतःच स्वतःचे मरण ओढवून घेत आहे !
शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली. बहुतेक दुकानांमध्ये लोकांच्या मोठमोठ्या रांगा होत्या; मात्र काही दुकानांमध्येच २ व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन केले गेले. अनेक ठिकाणी लोक पोलिसांचेही ऐकत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी युवक कोणतेही काम नसतांना रस्त्यावर हिंडताना दिसत होते. यासंबंधी अनेक चलचित्रे (व्हिडिओ) सामाजिक प्रसारमाध्यमात प्रसारित झाली. यामुळे शासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला एक प्रकारे तिलांजली दिली गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय शासनाने मागे घेण्याच्या मागणीला जोर
पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात दळणवळण बंदी घोषित केलेली असतांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही नागरिकांच्या वाढत्या दबावाला बळी पडून २७ मार्चपासून राज्यातील भाजीपाला, दूध आणि किराणा दुकाने उघडी ठेवण्यास अनुमती दिली. त्यांच्या या निर्णयाविषयी सामाजिक प्रसारमाध्यमातून (सोशल मिडियात) आश्चर्य व्यक्त केले जात असून टीकाही होत आहे. ‘गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाजीपाला, दूध आणि किराणा दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवाव्यात’, अशी मागणी ‘Change.org’ या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. २० घंट्यांच्या या मागणीला ६० सहस्र लोकांनी पाठिंबा दर्शवला. ‘गोव्यात दळणवळण बंदी’ आवश्यक आहे. गोवा हे एक लहान राज्य आहे आणि त्याचे संरक्षण करूया’, असे या याचिकेत म्हटले आहे. गोव्यात एक नामवंत आधुनिक वैद्य शेखर साळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आधुनिक वैद्य शेखर साळकर म्हणतात, ‘‘गोवा हे एक लहान राज्य आहे आणि येथे कोरोनाचे संक्रमण लवकर होण्याचा धोका आहे. आपण जिवंत राहिलो, तरच आपणास खाता येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दुकाने उघडण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा.’’
जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी प्रसिद्ध केली नवीन मार्गदर्शिका
‘अंतर ठेवा, सुरक्षित रहा!’
पणजी – गोवा पोलिसांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘अंतर ठेवा, सुरक्षित रहा’ असे आवाहन करणारी नवीन मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गोवा पोलीस म्हणतात, ‘‘तुम्हाला आवश्यक वस्तू मिळवून देणे, हे आमचे दायित्व आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जातांना २ व्यक्तींमध्ये १ मीटर अंतर ठेवावे. जी वस्तू विकत घेणार आहात, त्यालाच स्पर्श करा. नाक, डोळे आणि तोंड याला स्पर्श करू नये, तर घरी गेल्यावर हात धुवावे. दुकानातून सामान घेऊन त्वरित घरी जावे आणि एकत्र राहू नये.’’