देहलीतील इस्लामी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याच्या शक्यतेवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न
नवी देहली – येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक राज्यांत सरकार या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या काश्मीरमधल्या ६५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
१. या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वाधिक लोक मलेशिया आणि इंडोनेशिया येथील नागरिक होते. २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत कुआलालंपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते भारतात आले होते. देहलीत ते अनेक लोकांच्या संपर्कात आले होते. हे लोक उत्तरप्रदेश, तेलंगण, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि अंदमान-निकोबार येथेही गेले होते. आता देहली, जम्मू काश्मीर, तमिळनाडू आणि तेलंगण येथील सरकार या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे.
२. वर्ष १९२६ मध्ये हरियाणातील मेवात येथे मौलाना महंमद इलियास नावाच्या इस्लामी विचारवंताने ‘तबलीगी जमाती’ची स्थापना केली होती. ही आता १५० देशांमध्ये पसरली आहे. या संघटनेचा कोणताही पदाधिकारी अथवा सदस्य यांंची नोंद नाही. मशिदींना चालना देण्यासाठी ही संघटना काम करते.