जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गोव्यात नागरिकांच्या मोठ्या रांगा
सामाजिक अंतराच्या नियमाचे अनेक ठिकाणी उल्लंघन
पणजी, २७ मार्च (वार्ता.) – शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आजपासून उघडी ठेवण्यास अनुमती दिली होती; मात्र अनेक ठिकाणी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे आणि २ व्यक्तीमध्ये अंतर ठेवण्याच्या नियमाचे अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन झाल्याने लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी २ व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच अन्य नियमांचे पालन करावे, असे आवाहन शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे, ही मागणी जोर धरत आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील लोक आता ही मागणी करू लागले आहेत.