कोरोना आणि पाळीव प्राण्यांची समस्या !

सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. नागरिक एकीकडे काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांमधील स्वार्थी वृत्ती, निष्काळजीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार आता सातारा शहरात पहायला मिळत आहे. नागरिक स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पाळीव प्राणी घराबाहेर सोडून देऊ लागले आहेत. यामुळे इतर नागरिकांंमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. भटक्या कुत्र्यांचीही सीमा (एरिया) ठरलेली असते. एखाद्या पाळीव कुत्र्याला त्याचा मालक गल्लीतून घेऊन जातांना त्याच्यावर भटकी कुत्री भुंकत वा त्याला त्रास देत असल्याचे सर्वांनीच पाहिले असेल. नागरिकांनी पाळीव कुत्री घराबाहेर काढल्यामुळे असे चित्र शहरातील गल्ली-बोळात पहायला मिळत आहे.

रस्त्यावर पाळीव प्राण्यांची संख्या वाढली आहे. गल्लीतील कुत्री आणि पाळीव कुत्री यांच्यातील भांडणामुळे नागरिकांना रात्र-रात्र जागरण करावे लागत आहे. घरातील पाळीव मांजरे आणि गल्लीतील भटकी मांजरे यांच्यात भांडणे जुंपली आहेत. काही जणांच्या घरात पाळीव पक्षीही असतात. त्यांनाही काहींनी सोडून दिले आहे. ‘प्राणी-पक्ष्यांमुळे आपल्याला किंवा कुटुंबियांना कोणता संसर्ग होऊ नये’, हाच यामागचा मुख्य हेतू आहे; मात्र स्वत: आणि कुटुंबीय यांच्या सुरक्षिततेचा विचार करतांना समाजातील नागरिकांचा विचार होतांना दिसत नाही. प्रत्येकालाच स्वत:चा जीव प्रिय असतो; मात्र इतरांचा जीव धोक्यात घालून स्वत:चा जीव सुरक्षित ठेवणे, याला केवळ ‘स्वार्थ’च म्हणता येईल. आपण आणि आपले कुटुंबीय याच समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, हेही लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे स्वत:च्या स्तरावर काहीतरी करून इतरांसाठी त्रासदायक कृती करण्यापेक्षा पाळीव प्राण्यांविषयी प्रशासनाकडून योग्य ते दिशानिर्देश घेऊन त्यानुसार कार्यवाही करायला हवी. प्रत्येक नागरिकाचे हेच कर्तव्य आहे.

कोरोनासारखे जीवघेणे संकट समोर असतांना प्रत्येकाने स्वत:सह समाजाचाही विचार करायला हवा. अन्यथा आपल्या कोणत्याही अयोग्य कृतीमुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. प्रशासन नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विविध सूचना देतच आहे; मात्र याच्या जोडीला वरील प्रकारे निर्माण होणार्‍या नव्या समस्यांवरही तत्परतेने सूचनावजा मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत संयम, विचारपूर्वक कृती करणे, योग्य व्यक्ती (डॉक्टर, शासकीय घटक) यांना विचारून कृती करणे, इतरांचा विचार करून समाजभान राखणे हे गुण नागरिकांनी अवलंबण्याची आवश्यकता आहे, तर तत्परता, सतर्कता, संवेदनशीलता या गुणांच्या आधारे प्रशासनाने समाजाला नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रशासन काही प्रमाणात प्रयत्नही करत आहे; मात्र समस्यांची तीव्रता पहाता या प्रयत्नांना गती यावी, हीच अपेक्षा !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा