काबूलमधील गुरुद्वारावरील आक्रमणामागे आय.एस्.आय.चा हात
भारतीय दूतावास होते लक्ष्य
तालिबानी आणि पाकिस्तान यांच्या विरोधात भारताने आता कठोर भूमिका घेऊन कृती करणे अपेक्षित आहे !
काबूल (अफगाणिस्तान) – येथील गुरुद्वारावर २ दिवसांपूर्वी झालेल्या आक्रमणानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाला अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. गुरुद्वारापासून ३ कि.मी. अंतरावर असणारे भारतीय दूतावास आतंकवाद्यांचे लक्ष्य होते; मात्र तेथील बंदोबस्तामुळे त्यांना आक्रमण करणे शक्य न झाल्याने त्यांनी गुरुद्वारावर आक्रमण केले. प्रथम या आक्रमणामागे ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात होते; मात्र हे आक्रमण ‘हक्कानी नेटवर्क’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांनी घडवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या आक्रमणामागे पाकच्या आय.एस्.आय. या गुप्तचर यंत्रणेचा हात असून त्यांनी या षड्यंत्राला ‘ऑपरेशन ब्लॅकस्टार’ असे नाव दिले होते, असे समोर आले आहे. या आक्रमणात २८ शिखांचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. एकूण ४ आतंकवाद्यांनी ‘एके-४७ रायफल’मधून अंदाधुंद गोळीबार केला. अफगाणी सुरक्षारक्षकांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर अन्य तिघे पळून गेले. या आक्रमणाद्वारे अफगाणिस्तानातून भारताला बाहेर काढण्याचा उद्देश होता.