कोरोनाची संख्या हळूहळू न्यून होईल ! – डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, अध्यक्ष, ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’
नवी देहली – देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्याच प्रमाणात रोखता येईल. दळणवळण बंदीच्या, म्हणजेच २१ दिवसांच्या कालावधीमध्ये भारताला स्वतःच्या आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यास वेळ उपलब्ध होईल. भारतामध्ये कोरोनाचे आणखी रुग्ण सापडतील; पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही; कारण प्रत्येक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हळूहळू ही संख्या न्यून झाल्याचेही आढळले आहे, असे मत ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
डॉ. रेड्डी पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग हा हंगामी आजार होईल. त्यावर औषधे आणि लस उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही, तरी त्यावर नियंत्रण मिळवता येईल. हा रोग ‘स्वाईन फल्यू’पेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याने आपल्याला अधिक सावध रहावे लागेल.’’