अमेरिकेत कोरोनाचे ८५ सहस्र ७४९ रुग्ण
-
जगभरात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत
-
आतापर्यंत १ सहस्र ३०१ जणांचा मृत्यू
-
एका दिवसात तब्बल १७ सहस्र रुग्ण सापडले
वॉशिंग्टन – जागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनाच्या संसर्गाचे नवे केंद्र बनल्याचे समोर येत आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. तेथे एकूण ८५ सहस्र ७४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून अमेरिकेने रुग्णांच्या आकडेवारीत चीन (८१ सहस्र ३४०) आणि इटली (८० सहस्र ५८९) यांना मागे टाकले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्यात आल्यानंतरही अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. २६ मार्च या एकाच दिवशी अमेरिकेत १७ सहस्र रुग्ण आढळले. अमेरिकेत कोरोनामुळे १ सहस्र ३०४ जणांचा, तर चीनमध्ये ३ सहस्र २९२ आणि इटलीत सर्वाधिक ८ सहस्र २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये नवीन ५५ रुग्ण आढळले आहेत.
जगभरातील कोरोनाची सद्यःस्थिती
१. जगभरात ५ लाख ५० सहस्र ३०४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एकूण २४ सहस्र ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे १ लाख २८ सहस्र ७०१ रुग्ण बरे झालेले आहेत.
२. स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या संख्या ६४ सहस्र ५९ झाली असून मृत्यू झालेल्यांची संख्या ४ सहस्र ८५८ झाली आहे.
३. इराणमध्ये ३२ सहस्र ३३२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून २ सहस्र ३७८ जणांचा मृत्यू झाला आहे.तेथे २ सहस्र ९२६ नवे रुग्ण आढळले आहेत.
४. जर्मनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले एकूण ४७ सहस्र ३७३ रुग्ण आढळले असून आतापर्यंत २८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे ३ सहस्र ४३५ नवे रुग्ण आढळले आहेत.
पाकिस्तानमध्ये २३० सैनिकांचे विलगीकरण
कराची – पाकिस्तानमध्ये १ सहस्र २५२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पाकिस्तानी सैन्यातही कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत २३० सैनिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सैनिकांमधील ४० जण ‘पॉझिटिव्ह’ आढळले असून यात सैन्याच्या अधिकार्यांचाही समावेश आहे.