भारतात ८०३ कोरोनाग्रस्त रुग्ण, २० जणांचा मृत्यू
नवी देहली – देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ८०३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २६ मार्चला देशभरात ४२ नवे रुग्ण आढळले. आरंभी देशात १ मार्चपर्यंत केरळमध्ये ३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. २ मार्चपासून वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही.
दळणवळण बंदीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग स्थिरावला ! – आरोग्य मंत्रालय
नवी देहली – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली, तरी त्याच्या प्रादुर्भावाचा वेग स्थिरावला आहे. त्यामुळे आता आपण ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांमध्ये योग्य अंतर राखणे) आणि योग्य उपचार, या दोन गोष्टी काटेकोरपणे पाळल्या, तर आगामी काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तिसर्या टप्प्यापर्यंत पोचू शकणारच नाही, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लाल अग्रवाल यांनी सांगितले. केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सध्या १७ राज्यांमध्ये केवळ कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयांच्या उभारणीला प्रारंभ झाला आहे.