कौशल्यविकासाला संधी !
नोंद
कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, आस्थापने बंद असल्याने सर्वजण घरीच आहेत. दळणवळण बंदीमुळे बाहेर जाता येत नसल्याने अनेक जणांना या मोकळ्या वेळेत काय करायचे ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जण दूरचित्रवाणी संच, चित्रपट किंवा ‘वेब सीरिज’ पहाण्यात, घंटोन्घंटे व्यतित करत आहेत. जीवन मर्यादित असल्याने वेळ ही अमूल्य गोष्ट आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळून त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल ?, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
एरव्ही धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्या करायला आपल्याला वेळ मिळत नाही. अशा गोष्टी शिकण्यात सध्या मिळालेला वेळ वापरू शकतो. पाककृतीची आवड असल्यास पाककृती शिकता अथवा करता येतील. एरव्ही न करता येणारी घरातील स्वच्छता या वेळेत करू शकतो. किशोरवयीन मुले मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घरातील किरकोळ ‘इलेक्ट्रॉनिक’ दुरुस्ती शिकू शकतात. तरुण मुले-मुली घरातील चांगली पुस्तके वाचू शकतात. सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे वाचनसंस्कृती अल्प होत चालली आहे. वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी या वेळेचा उपयोग करता येऊ शकेल. शक्य असल्यास घरातील बागकाम करणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे यांसाठीही वेळ देता येईल. अनेकदा ठरवूनही जी गोष्ट अनेकांची खंडित होते, ती म्हणजे व्यायाम ! व्यायाम नियमितपणे होण्यासाठी या काळामध्ये प्रयत्न करता येतील. कोरोनासदृश आपत्तींचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. त्या दृष्टीने वैयक्तिक उपासनेच्या जोडीला कुटुंबियांनी एकत्रित रामरक्षादि स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे आदी कृती करता येऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक संगणक साक्षर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात, विश्वासू व्यक्तींकडून ‘ऑनलाईन बँकिंग’ शिकू शकतात. अशा अनेक विधायक सूत्रांमध्ये वेळ सत्कारणी लावता येईल.
आपत्काळाची तीव्रता वाढत जाईल, तेव्हा वीजपुरवठा, इंटरनेट सुविधा, पाणीपुरवठा यांसारख्या आवश्यक सेवांमध्येही खंड पडू शकेल. अशा वेळी येणार्या बंधनांमध्येही मानसिक स्थिती स्थिर आणि सकारात्मक रहाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे. त्या दृष्टीने वेळेचा सदुपयोग व्हायला हवा. भौतिक सोयीसुविधा, तसेच वैज्ञानिक साधने यांमुळे मनुष्याच्या वेळेची बचत झाली आहे; पण या वेळेचा सदुपयोग कसा करायचा ?, हे विज्ञानाने शिकवले नाही; म्हणून वेळ उपलब्ध झाला, तरी तो वाया जाण्याचेच प्रमाण अधिक आहे. एकदा गेलेला क्षण परत कधीही मिळवता येऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन वेळ घालवण्यापेक्षा तो उपयोगात आणला, तर त्यातून शिकता येईल आणि आनंदही घेता येईल !
– प्रा. (सौ.) गौरी कुलकर्णी, पुणे