सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने चैतन्यात न्हाऊन निघालेल्या चेन्नई सेवाकेंद्राने तुळशीच्या रूपातून अनुभवला महाविष्णूचा आशीर्वाद !
१. ‘सद्गुरूंच्या मनातील विचार संकल्परूप असल्याने ईश्वर तो पूर्ण करतो’, याची प्रचीती देवाने चेन्नई सेवाकेंद्राला देणे
‘मागील १० मासांपासून मी आणि दौर्यावरील साधक अधूनमधून चेन्नई सेवाकेंद्रात वास्तव्यास असतो. चेन्नई सेवाकेंद्र खालच्या माळ्यावर असून वरच्या माळ्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार आणि त्यांचे कुटुंब रहाते. १४.१०.२०१८ या दिवशी माझ्या मनात आले, ‘चेन्नई सेवाकेंद्राबाहेर एक तुळस ठेवावी.’ हा विचार मी सहज श्री. विनायक शानभाग यांना सांगितला. १६.१०.२०१८ या दिवशी मी यज्ञात सहभागी होण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले. १७.१०.२०१८ या दिवशी सौ. सुगंधी जयकुमार या भ्रमणभाषवर म्हणाल्या, ‘‘मी काल सायंकाळी सेवाकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर मला तेथे एक छोटे तुळशीचे रोप भूमीवर सिमेंटचे ठोकळे असलेल्या फटीतून वर आलेले दिसले.’’
सनातन संस्थेसाठी विविध अनुष्ठाने करणारे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी रामनाथी आश्रम आणि साधकांच्या रक्षणासाठी ‘दत्तमाला मंत्रपठण’ करण्यास सांगितले होते. प्रतिदिन पठण चालू केल्यानंतर काही दिवसांत आश्रमाच्या सभोवतालच्या परिसरात २०३ औदुंबराची रोपे आपोआप उगवली होती. ‘चैतन्यमय ठिकाणी दैवी वृक्ष आणि वनस्पती येतात’, त्याचीच ही प्रचीती आहे. आश्रमातील दैवी स्पंदनांमुळे दैवी वनस्पती आपोआप येतात. ‘ईश्वराने आम्हाला चेन्नई सेवाकेंद्रात रामनाथी आश्रमाप्रमाणे प्रचीती दिली’, यासाठी ईश्वराच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’
– सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१७.१०.२०१८)
२. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘श्रीकृष्ण चित्रातून बाहेर येऊन त्याचे दोन्ही हात पुढे करून मला जवळ घेत आहे’, असे वाटणे, त्यानंतर सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर आपोआप तुळशीचे रोप उगवल्याचे दिसणे आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तो महाविष्णूचा आशीर्वाद असल्याचे सांगणे
‘१६.१०.२०१८ या दिवशी सकाळी मी देवघरात श्रीकृष्णाच्या चित्रासमोर नामजपाला बसल्यावर काही घटनांची आठवण होऊन मनात अनेक विचार आले. त्यानंतर श्रीकृष्णाला प्रार्थना होऊ लागल्या. पुढच्याच क्षणी असे वाटले, ‘श्रीकृष्ण चित्रातून बाहेर येऊन त्याचे दोन्ही हात पुढे करून मला जवळ घेत आहे.’ या आधी मला अशी अनुभूती कधीही आली नव्हती. सायंकाळी मी खालच्या माळ्यावरील सेवाकेंद्रात गेले. प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर तेथे तुळशीचे एक रोप जमिनीवरील सिमेंटच्या फटीतून बाहेर आलेले दिसले. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना हे सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आपोआप तुळस उगवणे, हा महाविष्णूचा आशीर्वादच आहे.’’ श्रीकृष्णाने मला ही अनुभूती दिली, यासाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई, तमिळनाडू. (१७.१०.२०१८)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक