भाववृद्धी सत्संगात साधिकेने संपत्काळ आणि आपत्काळ यांची मनाशी घातलेली सांगड अन् त्यावरून मन शांत असतांना केलेल्या नामजपाच्या लाभाचे कळलेले महत्त्व
‘२७.७.२०१७ या दिवशी साधकांसाठी भाववृद्धी सत्संग चालू होता. त्यात एका साधिकेला तिच्या प्रयत्नांविषयी विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘संपत्काळात घाम गाळला, तर आपत्काळात रक्त सांडत नाही’, असा विचार करून प्रयत्न करते.’’ आपल्यापैकी अनेकांना स्थुलातील संपत्काळ आणि आपत्काळ विदित आहे; परंतु साधिकेने सांगितलेला हा संपत्काळ आणि आपत्काळ मनाशी निगडित आहे. मनाचा आपत्काळ, म्हणजे ‘मनात प्रतिक्रिया येणे आणि मनाचा संघर्ष होणार्या प्रसंगांना तोंड देणे’, तर मनाचा संपत्काळ, म्हणजे ‘आपल्या मनाला काही त्रास होत नाही किंवा मनाने नामजप करू शकतो, तो काळ.’ त्या साधिकेला पुष्कळ वेळा वाईट शक्तींच्या त्रासामुळे रात्री झोप लागत नाही. तेव्हा ती गुरुस्मरण करण्याचा प्रयत्न करते. ती पुढे म्हणाली, ‘‘आपण रात्री केलेल्या गुरुस्मरणाचा (साधनेचा) लाभ, म्हणजे त्यातून मिळणारे चैतन्य आणि शक्ती आपल्याला सकाळी उठण्यासाठी साहाय्य करते. आपण मनाच्या संपत्काळातच अधिकाधिक नामजप केला, तरच त्याचा लाभ आपल्याला मनाच्या आपत्काळात, म्हणजे संघर्षाच्या वेळी होतो.’’ सत्संगात बसलेल्या सर्वांनाच हे ऐकून चांगले वाटले आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे उत्साह वाढला.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच कृपेने आम्हाला प्रतिदिन भाववृद्धी सत्संग मिळत आहे. सहसाधकांच्या प्रयत्नांमुळे मनाला उभारी येत आहे. गुरुदेवा, आपणच आम्हाला हे भाववृद्धी सत्संग, असे सहसाधक आणि असा साधनामार्ग दिल्याविषयी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(३१.७.२०१७)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.