मालेगाव (जिल्हा नाशिक) येथे एम्.आय.एम्. आमदाराच्या समर्थकाकडून त्यांच्यासमोरच वैद्यकीय कर्मचार्यास मारहाण
राष्ट्रीय संकटाची तमा न बाळगणार्या धर्मांधांचा उद्दामपणा सदैव चालूच असतो, याचे हे उदाहरण !
मालेगाव – येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी संबंधितांना अटक करण्यात यावी आणि कर्मचार्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा देत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख घटनास्थळी आले. त्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. (पोलिसांची प्रकरण मिटवण्याची मानसिकताच यातून दिसून येते. अशा वेळी मध्यस्ती का केली जाते ? गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई का केली जात नाही ? – संपादक)
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतांना आमदारांसमक्ष त्यांच्या समर्थकाकडून मारहाण झाल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी कर्मचार्यांकडून करण्यात आली आहे.
एका खटल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका राजकीय आरोपीला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘त्या राजकीय आरोपीची स्थिती स्थिर आहे, तरीही ती व्यक्ती अजून रुग्णालयात आहे’, असा आक्षेप काही राजकीय व्यक्तींचा आहे. यावरून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी डॉ. किशोर डांगे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.