कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगून एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला
पुणे महापालिकेतून बोलत असल्याची केली बतावणी
आपत्कालीन स्थितीमध्ये समाजकंटकांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ
पुणे, २६ मार्च (वार्ता.) – ‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला. २२ मार्चला सुट्टी आणि ‘जनता कर्फ्यू’ असल्याने हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यासाठी आम्ही २३ किंवा २४ मार्चला येऊ’, असे त्या व्यक्तीने सांगितले. आधुनिक वैद्यांनी याविषयी संबंधितांकडे चौकशी केली; मात्र कोरोनाग्रस्त रुग्णाची ओळख गुप्त ठेवली जात असल्याने आणि पूर्वी पडताळलेल्या एखाद्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली असू शकेल, या विचाराने संबंधित आधुनिक वैद्य ‘होम क्वारंटाईन’ झाले. त्यांचे कुटुंबीयही ‘होम क्वारंटाईन’ झाले; पण २३ किंवा २४ मार्चलाही संबंधित व्यक्तीकडून आधुनिक वैद्यांना संपर्क झाला नाही. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी त्या व्यक्तीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यानंतर महापालिका आणि नायडू रुग्णालय येथे संपर्क साधून आधुनिक वैद्यांनी त्याविषयी चौकशी केल्यावर महापालिकेकडून अशाप्रकारे कोणताही भ्रमणभाष केला नसल्याचे सांगितले. या प्रकरणी ‘सायबर पोलिसां’कडे तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढचे अन्वेषण करत आहेत.
कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर जी औषधे घेतली जातात, त्या औषधांचे शरिरावर अन्य परिणामही (साईड इफेक्टस्) होतात. आधुनिक वैद्यांना ते कोरोनाग्रस्त रुग्णालयाच्या संपर्कात आल्याचा भ्रमणभाष आल्यावर त्यांच्या लहान मुलीने, तसेच त्यांच्या वृद्ध आईनेही काळजीपोटी (खबरदारी) औषधे घेतली. त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांमध्ये यामुळे थोडी घबराट पसरली. अशा प्रकारे खोटा संदेश देऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची आणि पोरखेळ करण्याची समाजकंटकांची विकृतीच दिसून आली.