कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी अमेरिकेत तंबू आणि ट्रक यांमध्ये वातानुकूलित शवागार बनवण्याची सिद्धता
न्यूयॉर्क (अमेरिका) – कोरोनामुळे अमेरिकेत प्रतिदिन रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. न्यूयॉर्क शहरात ३० सहस्रांहून अधिक जणांना याची बाधा झाली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार अमेरिकेत येत्या काही दिवसांत कोरोनामुळे शेकडोंच्या संख्येने मृत्यू होऊ शकतात. अशांचे मृतदेह वेगळे ठेवण्याची सिद्धता चालू झाली असून न्यूयॉर्कच्या अनेक रुग्णालयात कर्मचारी वातानुकूलित तंबू आणि ट्रक यांमध्ये शवागार बनवण्याची सिद्धता करत आहेत. अमेरिकेत ९/११ च्या आक्रमणानंतरही अशा प्रकारचे शवागर बनवण्यात आले होते.
कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ९०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा मृतदेहांना वेगळे ठेवण्यात येते, जेणेकरून हा संसर्ग आणखी पसरू नये. भारतात अशा मृत्यूनंतर मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात नाही. येत्या काही दिवसांमध्ये न्यूयॉर्कमध्ये ‘व्हेंटिलेटर’ची कमतरता निर्माण होऊ शकते. सध्या येथे ८० टक्के रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’ची आवश्यकता आहे.