लक्षणे न दिसताही कोरोना पसरण्याची शक्यता ! – तज्ञांची माहिती
बीजिंग – कोरोना विषाणूची सर्वसामान्यपणे प्रारंभी दिसणारी लक्षणे कळताच तो झाल्याचे कळते. असे असले, तरी एखाद्या व्यक्तीमध्ये या विषाणूची लक्षणे दिसत नसली, तरीदेखील ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असू शकते, अशी माहिती ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने एका वृत्ताद्वारे दिली आहे. या वृत्तपत्राने काही तज्ञ व्यक्तींच्या माहितीच्या आधारे एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालातील माहितीनुसार, कोरोना संक्रमित एक तृतीयांश नागरिक असे आहेत की, ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा अगदी अल्प लक्षणे दिसतात. याला ‘लक्षणे नसलेला’ (asymptomatic) असे म्हटले जाते. कोरोनाचा परिपक्वता कालावधी (इनक्युबेशन पीरियड) १ ते १४ दिवसांचा असून या कालावधीत विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याची लक्षणे दिसून येतात; पण हा कालावधी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा असल्याचे समोर आले आहे. असे असले, तरी ‘लक्षणे न दिसणे’ हे देखील कोरोनाचे एक वैशिष्ट्य असून त्यामुळे तो झपाट्याने पसरतो आहे, असे मानले जाते.’ ‘युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’मधील संसर्गजन्य आजारांचे तज्ञ बेंजामिन काऊलिंग यांनी म्हटले आहे की, ‘लक्षणे न दिसणारे नागरिकही कोरोनाग्रस्त असू शकतात आणि हेच लोक अन्य निरोगी नागरिकांपर्यंत हा विषाणू पोचवतात.’