देशात कोरोनाच्या मृतांची संख्या वाढणार नाही ! – डॉ. नरिंदर मेहरा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद

नवी देहली – रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही; पण हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. देशात अल्प प्रमाणात मृत्यू होण्याची ३ कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार शक्ती आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. भारतातील नागरिक हळद, आले, मसालेदार अन्न मोठ्या प्रमाणात खातात आणि तसे अन्न स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळेच इटली, स्पेन आणि अमेरिका येथे जशी मृतांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे, तसे ती भारतात वाढणार नाही, असे प्रतिपादन ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदे’चे (‘आय.सी.एम्.आर्.’चे) माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा ‘एम्स् इम्युनोलॉजी’चे माजी अधिष्ठाता डॉ. नरिंदर मेहरा यांनी केले.

कोरोनामुळे देशभरात १४ जणांचा मृत्यू, तर ६९५ जणांना कोरोनाची लागण

कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६९५ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाचे संक्रमण देशातील २५ राज्यांमध्ये झाले आहे.