प्रसिद्धी आणि समाजभान !
नोंद
सध्या देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अन् जनता प्रयत्न करत आहेत. शासनाकडून समाजभान राखण्यासाठी वारंवार आवाहन केले जात असून समाजातील विविध क्षेत्रांतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. काही घटक मात्र अजूनही कळत किंवा नकळत म्हणा, स्वार्थासाठी जनतेला अडचणीत आणत आहेत.
नुकतेच ‘रेकीट बेनकिझर’ या आस्थापनाच्या ‘डेटॉल’च्या विज्ञापनाच्या विरोधात ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून एक याचिका प्रविष्ट करण्यात आली. ‘आजारांपासून दूर रहायचे असेल, तर साबण नाही, तर ‘डेटॉल’चे ‘हँडवॉश’च वापरायला हवे’, असे या विज्ञापनात म्हटले आहे. सध्या कोरोनाचे संकट असतांना अशा विज्ञापनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरू शकते. या विज्ञापनाच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनाच्या विरुद्ध प्रसार केल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही आस्थापनाला फटकारले. त्यानंतर आस्थापनाकडून हे विज्ञापन २० एप्रिलपर्यंत मागे घेण्यात आले आहे. ‘विज्ञापन मागे घेतले, तरी आस्थापनाकडून समाजोपयोगी प्रबोधन कुठे झाले ? परिस्थितीचा अपलाभ घेत भीती पसरवून स्वत:चे उत्पादन विकण्याचा प्रयत्न झाला’, असे आरोप करण्यात आले. या आरोपांचाही ‘रेकीट बेनकिझर’ आस्थापनाने विचार करायला हवा.
सध्या उन्हाळा असल्याने काही ठिकाणी शीतपेयांची विज्ञापने पहायला मिळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शीतपेये पिण्याचे टाळण्याविषयी प्रबोधन केले जात आहे. असे असतांना एखादे आस्थापन स्वतःच्या शीतपेयांचे विज्ञापन करत असेल, तर अशा आस्थापनांवरही निर्बंध घातले जायला हवेत. प्रसारमाध्यमांनाही याची जाणीव असायला हवी. केव्हा कोणते विज्ञापन दाखवले जावे ?, हेच उमगले नाही, तर समाजभान कसे राखले जाणार ? मार्चमध्ये विशेषतः रंगपंचमीच्या मुहूर्तावर ‘कोका-कोला’, ‘फंटा’, ‘स्प्राईट’, अमूल (थंडाई) आणि अन्य आस्थापनांनी नूतन विज्ञापने चालवली. सध्या अशी विज्ञापने नसली, तरी सामाजिक माध्यमे अन् प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून काही प्रमाणात त्यांचा प्रसार चालू असल्याचे दिसते. प्रबोधन करणे आणि स्वत: त्याविषयी कार्य करत रहाणे, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सर्व क्षेत्रातील उत्पादन विक्रेते, प्रसिद्धीघटक यांनी ही जाणीव ठेवून तसे कार्य करायला हवे !
– श्री. केतन पाटील, पुणे