रत्नागिरीतील काही गावांत कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय : गावकर्‍यांनी स्वत:हून केले ‘क्वारंटाईन’

रस्त्यावर चिरे, दगड, मातीचा भराव किंवा बांबू बांधून रस्ते अन् वाटा केल्या बंद

कोरोनाला रोखण्यासाठी गावकर्‍यांनी स्वत:हून केलेले प्रयत्न सर्वांसाठी आदर्शवत !

रत्नागिरी – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम आणि तोणदे या गावांतून; चिपळूण तालुक्यातील परशुराम अन् राजापूर तालुक्यातील पाचल या गावांनी स्वत:ला ‘क्वारंटाईन’ केले आहे. या गावांतून बाहेर जाणारे सर्व रस्त्यांवर चिरे, दगड, मातीचा भराव किंवा बांबू बांधून रस्ते बंद केले आहेत. काही ठिकाण ग्रामस्थ स्वत:च पहारा देत आहेत, तर काही ठिकाणी गावाच्या सीमेवर फलक लावून गावात येणार्‍या आणि गावाबाहेर जाणार्‍या गावकर्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी सूचना लिहिली आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे.  (स्वत:हून कोरोनाच्या विरोधात उपाययोजना करणार्‍या गावकर्‍यांचे अभिनंदन ! – संपादक)

मुंबई, पुणेसह अन्य भागांतून नातेवाईक आपापल्या गावी येतात; मात्र यापुढे गावात एकही नातेवाईक येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना कुटुंबांना देण्यात आल्या आहेत. तसेच गावात कोणतेही लग्न, साखरपुडा, बैठका यांसारखे अन्य कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्व गाव प्रमुखांनी गाव बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे आणि अन्य भागांतून नातेवाईक गावी येतात. त्यांच्यामुळे गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात आली आहे.

पाचल गावात येणारे सर्व मार्ग बांबूने बंद

पाचल गावात येणारे सर्व मार्ग बांबू आडवे टाकून बंद करून त्या ठिकाणी लोकांनी खडा पहारा चालू केला आहे. पाचल गावाने गावातून बाहेर जाणार्‍या आणि गावात येणार्‍या लोकांना बंदी घोषित केली आहे.

गावबंदी काळात गावातील नागरिकांना अधिक त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामध्ये कुणाला जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तू लागल्यास त्या लोकांना थेट दुकानावर जावे लागत नाही. त्यासाठी नाक्यानाक्यावर कार्यरत असलेले तरुण लोकांना आवश्यक त्या वस्तू दुकानातून खरेदी करून देत आहेत.